देवेंद्र फडणवीस: पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यानंतर फडणवीस म्हणतात भाजप हा ओबीसींचाच पक्ष #5मोठ्या बातम्या

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1.भाजप हा ओबीसींचाच पक्ष-फडणवीस

भाजप हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहील असं विरोधी पक्षनेतेप्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सर्वाधिक ओबीसी मंत्री भाजप सरकारमध्ये होते. ओबीसी मंत्रालय स्थापन झालं तेदेखील भाजप सरकारच्याच काळात. आमच्या काळात ओबीसी मंत्री झाले तेव्हा ते ओबीसी होते म्हणून झाले नाहीत, तर त्यांच्या क्षमतेमुळे ते मंत्री झाले. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

भाजपमध्ये मी माझा एकही गट तयार केला नाही. भाजपचे सगळे आमदार आमचेच आहेत. पंकजा मुंडे यांना टार्गेट करण्यात आलं तेव्हा त्यांच्या बाजूने मी कायमच उभा राहिलो. पंकजा यांच्याबाबत माझ्या मनात आदरच आहे. एकनाथ खडसे यांनी गोपीनाथगडावर ज्या गोष्टी बोलून दाखवल्या त्या त्यांनी मांडायला नको होत्या असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

2. बलात्काऱ्यांना 21 दिवसांत फाशी; आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय

महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश विधानसभेत दिशा विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. 'टीव्ही9'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

तेलंगणात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण पसरले होते. भारतीय दंड संहितेनुसार बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद अद्याप नाही. दिशा विधेयक मंजूर झाल्यानंतर आंध्र प्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.

बलात्कारासारख्या गंभीर गुन्हयाचा तपास सात दिवसात पूर्ण करावा लागणार आहे. खटलाही 14 दिवसात पूर्ण करून 21 दिवसात गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

3. मंत्रालयाला सुट्टी नाही; रोज सुरू राहणार

राज्याचा गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयाला आता सुट्टी असणार नाही. तब्बल 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच दररोज मंत्रालयीन कामकाज सुरू राहणार असल्याने राज्यातील जनतेला आठवडाभरात कधीही येऊन मंत्र्यांकडे त्यांचं गाऱ्हाणं मांडता येईल. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे होते. त्यामुळे कामकाजाच्या दिवसांनंतर विदर्भ दौऱ्यावर असायचे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हेही मुंबईचे नव्हते. परिणामी मंत्रालयाचं कामकाज तीन ते चार दिवस सुरू असायचं. मनोहर जोशी आणि नारायण राणे यांचं मुंबईत वास्तव्य होतं. ते दोघेही दररोज मंत्रालयात यायचे. आता त्याचीच पुनरावृत्ती 25 वर्षांनंतर होते आहे, असं महाराष्ट्र टाइम्सने म्हटलं आहे.

4. निर्मला सीतारमण फोर्ब्सच्या प्रभावशाली स्त्रियांच्या यादीत

फोर्ब्स संस्थेने तयार केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली शंभर महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश करण्यात आला आहे. त्या या यादीत 34व्या स्थानी आहेत. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्कल सलग नवव्या वर्षी यादीत पहिल्या स्थानी आहेत.

युरोपीय सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लगार्ड दुसऱ्या स्थानी तर अमेरिकेतील लोकप्रतिनिधी नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सीतारमण यांचा पहिल्यांदाच या यादीत समावेश झाला आहे. भारताच्या पहिल्या अर्थमंत्री असलेल्या सीतारमण यांनी देशाचे संरक्षणमंत्रीपदही भूषवले आहे.

रोशनी मल्होत्रा 54व्या क्रमांकावर आहेत. त्या शिव नाडर फाऊंडेशनच्या विश्वस्त आहेत. किरण मझुमदार-शॉ यादीत 65व्या स्थानी आहेत.

5. फिरोदिया करंडक आयोजकांची विषय निर्बंधातून माघार

फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत सादरीकरणासाठी विषय निवडण्यावर घालण्यात आलेले निर्बंध आयोजकांनी अखेर हटवले. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत यंदा हिंदू-मुसलमान, जम्मू काश्मीर, अनुच्छेद 370, भारत-पाकिस्तान, राम मंदिर बाबरी मशीद याबाबत कुठलेच विषय तसंच कोणत्याही जाती धर्माबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय स्पर्धेत सादर करण्यास परवानगी दिली जाणार नाही असं नियमावलीत नमूद करण्यात आलं होतं.

रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेत्यांनी याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर आयोजकांनी माघार घेत विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होणार नसल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)