You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बुलडाणा: 55 वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) बुलडाण्यात 55 वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या
बुलडाण्यात 55 वर्षीय महिलेची बलात्कार करून हत्या करण्यात आली. जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा इथं सदर महिलेचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दिलीय.
ही घटना उघडकीस येताच, स्थानिक पोलीस पाटील योगेश म्हसाळ यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.
"या घटनेचा तपास सुरू झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय," अशी माहिती बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.
हैदराबाद आणि उन्नाव येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनांनंतर देशभर संतापाची लाट आहे. हे लक्षात घेता स्थानिक पोलिसांनी तातडीनं पावलं उचलल्याचं दिसून येतंय.
दुसरीकडे, या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी एक विधान केलंय. "न्याय कधीच तात्काळ असू शकत नाही आणि त्यानं सूडाचं रूप घेतलं तर त्याचं न्याय हे स्वरूपच संपुष्टात येईल," असं ते म्हणाले.
हैदराबादमधील बलात्कार घटनेतील आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केलं. या घटनेची पार्श्वभूमी सरन्यायाधीश बोबडेंच्या वक्तव्याला आहे.
2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेळगावसाठी सरसावले
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाशी संबंधित सर्व वरिष्ठ वकिलांची तातडीनं बैठक घेण्याचे आदेश दिलेत.
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे, ठाकरे सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ या दोघांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
सीमाप्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी दिलेत. त्याचवेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी राज्यपालांना पत्र लिहिलंय.
शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ', असं करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
3) ई-महापरीक्षा पोर्टल - त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती
महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांना स्थगिती देण्यात आलीय. पोर्टलवरून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर होईपर्यंत ही स्थगिती असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आदेश दिलेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
पोर्टलच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगानं सर्व उपाययोजना करण्यात येतील. त्रुटी दूर झाल्यानंतर पोर्टलवरूनच ऑनलाईनरीत्या परीक्षा घेण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातीतल पदभरती परीक्षाही पुढे ढकलण्यात आलीय.
महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाला महत्त्व आलंय. युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही महापरीक्षा पोर्टलचा मुद्दा होता.
4) अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टमध्ये मोहन भागवत असू नये - विहिंप
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे. मात्र या ट्रस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे नसावेत, असं संघाचे माजी प्रचारक आणि विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी म्हटलंय. NDTVनं ही बातमी दिलीय.
भागवतांना ट्रस्टमध्ये का घेऊ नये, याचं कारण मात्र चंपत राय यांनी दिलं नाही.
त्यानंतर विहिंपच्याच राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानं सांगितलं की, "संघाचे सर्वोच्च पदाधिकारी कुठल्याही ट्रस्टचा भाग बनत नाहीत. संघात अशी परंपराच नाहीय. सरसंघचालकांसमोर असा प्रस्ताव ठेवला, तर तेही नकारच देतील."
5) राष्ट्रपतींच्या सुरक्षेचं कवच तरुणानं तोडलं, 6 पोलिसांचं निलंबन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद जोधपूर दौऱ्यावर असताना एका तरुणाने सुरक्षा कवच तोडून त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपती कोविंद हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राज्यपाल कलराज मिश्रा यांच्यासोबत ब्रेकफास्ट करत असताना ही घटना घडली.
सर्किट हाऊसच्या भिंतीवरून उडी मारून एक तरुण राष्ट्रपतींच्या दिशेनं आला. पोलिसांनी त्याला तात्काळ पकडून बाजूला नेलं. न्यूज 18 नं ही बातमी दिलीय.
दिनेश चंद असे या तरूणाचे नाव असून, तो अजमेरचा रहिवाशी आहे. दिनेश मानसिकरीत्या अस्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सहा पोलिसांनी तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)