राहुल बजाज: अमित शाह, भाजप सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत आहे #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करतं- राहुल बजाज

उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका करताना हे सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत असल्याचं म्हटलं आहे. 'क्विंट'नं ही बातमी दिली आहे.

शनिवारी (30 नोव्हेंबर) मुंबईमध्ये पार पडलेल्या Economic Times Awards कार्यक्रमात बजाज बोलत होते. तेव्हा "आम्ही तुमच्याकडून जरा चांगल्या उत्तराची अपेक्षा करतो, फक्त गोष्टी फेटाळू नका.

"UPAच्या काळात सरकारला टीका करण्याचं स्वातंत्र्य होतं. सध्या मात्र सरकारला टीका सहन होत नाही. लोक सरकारला प्रश्न का विचारू शकत नाहीत?" असा सवाल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना केला.

बजाज यांच्या टीकेला उत्तर देताना शाह यांनी म्हटलं, की कोणी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये.

बजाज यांनी अमित शाह यांना खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबद्दल केलेल्या विधानासंबंधीही प्रश्न विचारला. "गोडसे दहशतवादी होता, यामध्ये कोणतीही शंका आहे का?" असं राहुल बजाज यांनी म्हटलं.

यावर उत्तर देताना अमित शाह यांनी पक्षानं प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, असं स्पष्ट केलं.

2. हैदराबाद खुनाच्या आरोपींना न्यायालयीन कोठडी

हैदराबादमधील शमीमाबाद भागात पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिला पेटवून दिल्याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. या आरोपींना शनिवारी (30 नोव्हेंबर) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

इंडियन एक्सप्रेसनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या घटनेविरोधात देशभरातून सोशल मीडियावर तसंच हैदराबादमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत असून आरोपींना ठेवण्यात आलेल्या शादनगर पोलिस स्टेशनच्या बाहेर शेकडो लोकांनी शनिवारी निदर्शनं केली.

या सर्व आरोपींना मृत्युदंड ठोठावावा, अशी मागणी करणाऱ्या निदर्शकांचा संताप लक्षात घेऊन पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्यांना पोलिस स्टेशनमध्ये येऊन आरोपींच्या कोठडीबाबत सुनावणी करण्याची विनंती केली होती.

3. गोव्यातही राजकीय भूकंप होणार- संजय राऊत

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही भाजपला दूर सारून सत्ता स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या नेत्याचा पाठिंबा असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मात्र, काँग्रेसने यापूर्वीच आपण गोव्यातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील नसल्याचं स्पष्ट केले आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

"गोव्यात भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक असल्याचं महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे (एमजीपी) नेते सुदिन ढवळीकर यांनी म्हटलं आहे," असं ट्वीट संजय राऊत यांनी शनिवारी केलं.

महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (29 नोव्हेंबर) सांगितलं होतं. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजप सरकार घालवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

4. उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय 22 डिसेंबरनंतर - प्रफुल्ल पटेल

राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला बहुमत चाचणी सिध्द करण्यात यश आलं आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता आहे.

मात्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी किमान 3 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं हे वृत्त दिलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं, की "उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय २२ डिसेंबरनंतर होईल."

नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच 22 डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

5. आरेतील मेट्रो कारशेडसाठी आता नवीन जागेची शोधाशोध?

आरेतील मेट्रो कारशेडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानं त्यासाठी नव्यानं जागा शोधावी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुन्हा एकदा तज्ज्ञांची समिती नेमली जाऊ शकते. समिती नेमल्याशिवाय नव्या जागेच्या निष्कर्षाप्रत येता येणार नसल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मेट्रोला नाही कारडेपोला स्थगिती दिली आहे अशी भूमिका घेतली आहे. कारशेड आणि मेट्रो परस्परांना पूरक आहेत. कारण मेट्रोचं बांधकाम पूर्ण झालं तरी कारशेड तयार न झाल्यास मेट्रो मार्ग कार्यान्वित होऊ शकत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)