You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली, काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
उद्या त्यांच्याबरोबर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 मंत्री शपथ घेणार आहेत. तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचं ठरलं आहे. विधानसभेचं उपाध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकच असणार आहे.
उद्या म्हणजेच 28 नोव्हेंबरला संध्याकाळी शिवाजी पार्कात हा सोहळा होणार आहे.
रात्री 9.35 वाजता - काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री
"तिन्ही पक्षाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रावादी काँग्रेसचा असेल. तसंच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. तो एकच असेल. उद्या फक्त मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी होईल," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
रात्री 9.30 - आदित्य ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला पोहोचले
शिवसेना नेते आदित्य ठाकरे नवी दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. उद्याच्या शपथविधीचं आमंत्रण देण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे.
रात्री 8.30 : आघाडीची बैठक संपली
तब्बल साडेचार तास चालेली तिन्ही पक्षांची बैठक संपली आहे. पण बैठकीत नेमकं काय झालं हे मात्र सांगण्यास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी नकार दिला आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. सोनिया गांधींना यांना आमंत्रण देण्यासाठी ते रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे.
दुपारी 3 वाजता : अजित पवार यांच्या बाजूने घोषणाबाजी
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमधली आमदारांची बैठक संपल्यानंतर परत निघालेल्या अजित पवार यांच्या गाडीसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बाजून घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे याच ठिकाणी गेल्या शनिवारी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती.
दुपारी 2 वाजता: उद्याचा शपथविधी ऐतिहासिक - एकनाथ शिंदे
"हा ऐतिहासिक शपथविधी असणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने ठिकाणी हा शपथविधी होणार आहे, त्याचं आमंत्रण सगळ्याच पक्षांना आहे. याचा आनंद शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आहे, काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
दुपारी 1.26 वाजता अब आयेगा मजा - नितेश राणे
"आम्ही ऐकतोय की उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पुर्वी आम्ही जे प्रश्न विचारायचो त्याला बंगल्यावरून उत्तर यायचं नाही. आता आमदार म्हणून आम्ही जेव्हा विधीमंडळातून प्रश्न विचारू त्या प्रश्नांना उत्तर द्यावचं लागेल. म्हणून मी म्हटलं की, 'अब आयेगा मजा.' आमच्या लोकांचे प्रयत्न होते की भाजपचं सरकार यावं. राणेसाहेबांच्या संपर्कातले आमदार आजही आहेत. त्यातले नंतरही कामाला येतीलच," बीबीसी मराठीशी बोलताना नितेश राणे म्हणाले.
दुपारी 1 वाजता : जे झालं तो विषय संपला - धनजंय मुंडे
"अजितदादांनी जे केलं, ते चूक आहे की बरोबर हे आताचं सांगणं प्रीमॅच्युअर ठरेल. पण तो विषय आता संपला आहे. अर्थात काही गोष्टी घडल्या नसत्या तर बरं झालं असतं. "
दुपारी 12.43 : राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू
मुंबईतल्या वाय. बी. सेंटरला राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. सरकार स्थापनेबदद्लच्या महत्वाच्या गोष्टींवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सकाळी 11.40 वाजता : मी अजित पवारांना धोकेबाज मानत नाही - एकनाथ खडसे
अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय मला व्यक्तिगतरित्या पटलेला नव्हता. ज्याच्या विरोधात आपण रान उठवलं, ज्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा आपण लावून धरला त्याचे आरोप असणाऱ्या अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याची काही गरज नव्हती, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
"लोकांनी युतीला जनादेश दिला होता. आम्ही एकत्र लढलो होतो आणि आमच्या 165 जागा निवडून आल्या होत्या. पण मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले आणि दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्यामुळे भाजपकडे बहुमत उरलं नाही. पण तरीही मला असं वाटत नाही की अजित पवारांनी भाजपला धोका दिला.
सकाळी 11.30 वाजता : मी तेव्हाही राष्ट्रवादीत होतो, आताही आताही राष्ट्रवादीतच - अजित पवार
मी बंड केलंच नव्हतं. माझी राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केली नव्हती. मी तेव्हाही राष्ट्रवादीत होतो आणि आताही राष्ट्रवादीतच होतो अशा शब्दात अजित पवार यांनी शपथविधीनंतर प्रतिक्रिया दिली. "मी कालही नाराज नव्हतो, आजही नाही आणि उद्याही नसेन. बाकी मंत्रीपदाबाबत काय निर्णय घ्यायचा तो पक्ष घेईल. पक्षांचा निर्णय मला मान्य आहे," असंही ते पुढे म्हणाले.
मी बंड केलंच नव्हतं. माझी राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केली नव्हती. मी तेव्हाही राष्ट्रवादीत होतो आणि आताही राष्ट्रवादीतच होतो अशा शब्दात अजित पवार यांनी शपथविधीनंतर प्रतिक्रिया दिली. "मी कालही नाराज नव्हतो, आजही नाही आणि उद्याही नसेन. बाकी मंत्रीपदाबाबत काय निर्णय घ्यायचा तो पक्ष घेईल. पक्षांचा निर्णय मला मान्य आहे," असंही ते पुढे म्हणाले.
त्यांनी आमदार म्हणून आज शपथ घेतली.
सकाळी 11 वाजता : आमचं सरकार बनणार होतंच, ऑल इज वेल - अशोक चव्हाण
काँग्रेस नेते अशोक चव्हाण बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की आमचं सरकार बनणारं होतंच, त्यात काही अडचण नव्हती. तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम आखण्यामध्ये थोडा वेळ लागला पण ऑल इज वेल. फडणवीसांचा उतावीळपणा त्यांच्या अंगाशी आला.
सकाळी 10.21 वाजता : आदित्य ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ
ठाकरे परिवारातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
आदित्य ठाकरेंच्या रूपाने आता ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनेत नेतेपदी आली आहे. बाळ ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली होती. पण आदित्य ठाकरेंच्या निवडीनंतर त्यांनी दावा केला होता की, "ही घराणेशाही नसून घराण्याची परंपरा आहे."
सकाळी 9.52 वाजता : उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट
शिवसेनाप्रमुख तसंच महाविकास आघाडीचे संभाव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली.
सकाळी 9.48 वाजता : महाराष्ट्र कधी झुकणार नाही - संजय राऊत
नव्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे आणि नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी चालू आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले,
"महाराष्ट्र कधी झुकणार नाही, कधी तुटणार नाही. माझी जबाबदारी कमी झाली. महाराष्ट्राला नवं सरकार मिळणार आहे. सरकार आणि पक्षसंघटना या वेगळ्या गोष्टी आहेत. मी पक्षाचं काम करतोय. माझं मिशन पूर्ण झालं. आता मी उद्यापासून माध्यमांशी बोलणार नाही. इतकंच सांगेन की मी जेव्हा म्हटलं की मुख्यमंत्री आमचा असेल तेव्हा लोक आमच्यावर हसले. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आमचं सुर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार आणि तसंच झालं. आता उद्यापासून मला सामनावरच लक्ष केंद्रित करायचं आहे."
सकाळी 8.14 वाजता: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या...
"आमचं स्वप्न सत्यात आणायला आम्ही खूप संघर्ष केला आहे. आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करणार," असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
सकाळी 8.11वाजता:'जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू'
येत्या पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
सकाळी 8.05 वाजता: अभी तो पूरा आसमान बाकी - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
सकाळी 8 वाजता: विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. खासदार सुप्रिया सुळे या विधानसभेच्या दारावरच सर्व आमदारांचं स्वागत करत आहेत.
मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच आमदार त्यांचा रामराम घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि भाऊ अजित पवार यांचंही त्यांनी मिठी मारून स्वागत केलं.
गेल्या काही दिवसांतलं नाट्य
23 नोव्हेंबरला सकाळी आठच्या सुमारास शपथविधी करून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यासह देशात राजकीय भूकंप घडवला.
मात्र त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार एक-एक करून परतू लागले आणि बहुमताचे आकडे जुळवण्यात भाजपसमोरील अडचणी वाढू लागल्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज 27 नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठराव घेण्याचा आदेश दिल्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला आणि अवघ्या साडेतीन दिवसातच फडणवीस-अजित पवार सरकार कोसळलं.
त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपण राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करू असं म्हटलं. या तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदार आहेत. मात्र, या पक्षांनाही आपल्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, हे सिद्ध करावं लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)