You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस, शरद पवार आज दिल्लीत: महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा सुटणार? #5मोठ्याबातम्या
आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. देवेंद्र फडणवीस, शरद पवार आज दिल्लीत
राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (4 नोव्हेंबर) दिल्लीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत. लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत मिळावी, ही मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत येत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्याच्या दृष्टिकोनातूनच ही भेट महत्त्वाची असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील सोमवारी (4 नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटणार आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का, हा या भेटीतील कळीचा मुद्दा असल्याचं सांगितलं जात आहे.
दिल्लीमध्ये या भेटीगाठी होत असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
2. अरबी समुद्रात चक्रीवादळ, महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे 6 ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. लोकसत्तानं हे वृत्त दिलंय.
रविवारी (3 नोव्हेंबर) पावसानं पुण्यात जोरदार हजेरी लावली होती.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणासह राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष यासह अनेक पिके भुईसपाट झाली आहेत.
3. पीक विमा नसलेल्यांनाही मिळणार सरकारी मदत
अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील गावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (3 नोव्हेंबर) भेट दिली. ज्यांनी पीक विमा काढला नाही, त्यांना सरकारी मदत मिळेल, असं या भेटीदरम्यान बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिलीये.
याबाबत सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
4. दिल्लीत तीन वर्षांतील सर्वाधिक वायू प्रदूषण
दिल्लीमध्ये गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक वायू प्रदूषणाची नोंद करण्यात आली असून आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसनं यासंबंधीची बातमी दिली आहे.
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के.मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (3 नोव्हेंबर) एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.
दिल्ली, हरियाणा आणि पंजाब सरकारांच्या सोबतच कॅबिनेट सचिव राजीव गऊबा प्रदूषणाच्या परिस्थितीवर दररोज देखरेख ठेवतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
5. सरन्यायाधीश रंजन गोगोईं: NRC भविष्यासाठी आधार
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीचं (NRC) समर्थन केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.
यापूर्वी राज्यातील अवैध स्थलांतरितांबाबत केवळ अंदाजच व्यक्त केला जायचा. आता NRC हा भविष्यासाठी आधार असेल, असं रंजन गोगोईंनी म्हटलं.
न्यायमूर्ती गोगोई हे NRC च्या प्रक्रियेवर देखरेख ठेवून असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाचे अध्यक्ष आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)