You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार बारामतीत विजयी, भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा पराभव : विधानसभा निवडणूक निकाल
बारामतीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या गोपीचंद पडळकर यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये नव्याने सामील झालेल्या गोपीचंद पडळकर यांना तिकीट देऊन भाजपने चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण पडळकर अजित पवारांना टक्कर देऊ शकले नाही.
मतमोजणीत सकाळपासूनच अजित पवार यांनी मोठी आघाडी घेतली होती. फेरीनिहाय ही आघाडी वाढतच गेली. अखेरच्या फेरीपर्यंत अजित पवार यांना 1 लाख 95 हजार 641 मते मिळाली. तर पडळकर हे 30 हजार 282 मतांपर्यंतच मजल मारु शकले.
अजित पवार आणि पडळकर यांच्यातील मतांचं अंतर तब्बल 1 लाख 65 हजार 365 इतकं आहे. बारामतीत झालेल्या एकूण मतदानापैकी अजित पवार यांना 83.24 टक्के मतं मिळाली.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. 1967पासून या मतदारसंघात पवार कुटुंबीयांचाच दबदबा आहे. 1967 ते 1990 या कालावधीत शरद पवारांनी या मतदारसंघावर वर्चस्व गाजवलं. 1991 पासून अजित पवार याच मतदारसंघातून निवडून येत आहेत. तब्बल 52 वर्षांपासून पवार कुटुंबीयांनी या मतदारसंघावर वरचष्मा राखला आहे.
2014 निवडणुकीत अजित पवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. 2009 मध्येही अजित पवारांनी दणदणीत विजय मिळवला होता. सलग सहावेळा ते जिंकून येत आहेत. अजित पवार राज्यात प्रचाराच्या निमित्ताने व्यग्र असल्याने त्यांच्या पत्नी सुनेत्रा आणि मुलगा जय यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
अजित पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीत असणाऱ्या पडळकरांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गोपीचंद यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
धनगर आरक्षणाचा मुद्दा बारामतीत संवेदनशील ठरू शकतो. धनगर समाजाला दिलेल्या सवलती, आरक्षणासाठी प्रयत्न असे प्रचाराचे मुद्दे आहेत.
बारामती तालुक्यातील जिरायती आणि बागायती भागात विषमता असल्याचा मुद्दा विरोधकांकडून मांडण्यात येतो.
गोपीचंद पडळकर बारामतीत नवे आहेत. तयारीसाठी पुरेसा वेळ त्यांना मिळालेला नाही. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पवार कुटुंबीयांनी केलेलं काम, राष्ट्रवादीचे पारंपरिक समर्थक ही अजितदादांसाठी जमेची बाजू आहे.
निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर अजितदादा थेट शेवटच्या दिवशी बारामतीत प्रचाराला आले. अर्ज दाखल करतानाच आपण एक लाखाहून जास्त मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास त्यंनी व्यक्त केला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)