You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोथरूडमधूनचंद्रकांत पाटील विजयी, मनसेचे किशोर शिंदे पराभूत
आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून जात असलेले चंद्रकांत पाटीलांनी यंदा विधानसभेची निवडणूक लढवली तेही कोथरूड मतदारसंघातून. या लढतीत त्यांनी मनसेच्या किशोर शिंदेंचा पराभव केला.
चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष होतं. या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होणार होती पण पावसामुळे ती झाली नाही.
कशी झाली ही लढत?
पूर्ण प्रचारादरम्यान स्थानिक विरुद्ध-बाहेरचा हा मुद्दा गाजला होता.
2009 मध्ये शिवाजीनगरमधून वेगळा होऊन कोथरूड मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर कोथरूडमधून शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे निवडून गेले.
त्यांनी मनसेच्या किशोर शिंदेंना पराभूत केलं होतं. 2009 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र 2014 मध्ये युती झाली नव्हती. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला.
याच सगळ्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वांत सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. म्हणूनच चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघाला पसंती दिलेली आहे.
आधी ब्राह्मण उमेदवार हवा या मागणीमुळे गाजलेली ही निवडणूक नंतर स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशा वादानेही रंगली.
एकूण 11 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे. पण इथं दुरंगीच लढत होण्याची चिन्हं जास्त आहेत. यंदाच्या निवडणुकीत इथे 48.17 टक्के मतदान झालं.
याठिकाणी प्रबळ स्थानिक उमेदवार आहेत मनसेचे किशोर शिंदे आणि त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह त्यांच्या सहकारी पक्षांनी पाठिंबा दिलाय.
या 11 उमेदवारांमध्ये एकही ब्राह्मण उमेदवार रिंगणात नाही हे विशेष. सर्व ब्राह्मण संघटनांचा पाठिंबा मिळवण्यात भाजपला यश आलं आहे. सर्व संघटनांनी एक संयुक्त पत्रक जारी करून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आधी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केलेल्या ब्राह्मण उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.
पण त्याचवेळी या मतदारसंघातल्या ब्राह्मण समाजाचा मलाच पाठिंबा असल्याचा दावा मनसे उमेदवार किशोर शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना केला होता.
या मतदार संघाचं विश्लेषण करताना वरिष्ठ पत्रकार संजय जोग सांगतात, "मेधाताई त्याच पक्षातून निवडून आलेल्या होत्या. भाजपचं नेटवर्क तयार होतं. त्यांच्या सुदैवानं विरोधी पक्ष खिळखिळा झालेला आहे. पक्षानं ठरवलं की चंद्रकांत पाटलांना उमेदवारी द्यायची. मग समोर किशोर शिंदे असले तरी नेटवर्किंग, पोल मॅनेजमेंट आणि चंद्रकांत पाटील या तिन्ही मुद्द्यांचा परिणाम होणारच आहे."
"पूर्वी कोथरूड म्हणजे भाजपचा मतदारसंघ होता. पण किशोर शिंदेनं चांगली फाईट दिलेली आहे. मनसेचं पुण्यात प्रस्थ आहे. महापालिकेत त्यांचे 29 नगरसेवक निवडून आलेले होते. त्यांना लोकांचा सपोर्ट आहे. त्यामुळे ही लढाई भाजपला सोपी जाणार नाही," राही भिडे यांनी सांगितलं.
सचिन परब यांच्या मते, "भाजपला टीकेला तोंड द्यावं लागलं हे खरं आहे. पण टीका करणारा भाजपचा वर्षांनुवर्षाचा मतदार आहे. त्यामुळे टिकेचा परिणाम होईल असं वाटत नाही. मला तर ही प्रचंड टफ फाईट होईल असं वाटत नाही."
किरण तारे यांच्या मते, "भाजपचे प्रदेशाध्यक्ष जिथून लढतायंत तिथून जिंकण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार यात शंकाच नाही. किशोर शिंदेंचं फार काही आव्हान आहे, असं मलातरी वाटत नाही. चंद्रकांत पाटलांवर टीका, मस्करी जरूर झाली आहे. पण याचा अर्थ मतदार त्यांना मत देणार नाही, असं होणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)