धनंजय मुंडे प्रकरण: शरद पवार यांचा महिला आयोगावर निशाणा #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. धनंजय मुंडे प्रकरणावरून शरद पवारांचा महिला आयोगावर निशाणा

पंकजा मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांनी केलेल्या कथित वक्तव्याची दखल घेत राज्य महिला आयोगानं त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला आयोगाच्या या कृतीवर उपरोधिक वक्तव्य केलं आहे.

"महिला आयोग हा स्वतंत्र आयोग आहे. त्याला घटनात्मक महत्त्व आहे. या पदावर असताना आपण भाजपचे प्रतिनिधी आहोत, हे दाखवलंच पाहिजे असं नाही," असं शरद पवार यांनी म्हटल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्स मराठीने दिलं आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर आहेत, ज्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षाही आहेत.

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाने ट्वीट केलं होतं की, "मंत्री व परळीमधील उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांचे विधान धक्कादायक व अशोभनीय आहे. महिला आयोग या विधानाची स्वतःहून दखल घेणार आहे. मुंडे यांचे हे विधान महिलांनाच लज्जा उत्पन्न निर्माण करणारे आहे, असे आयोगाचे सकृतदर्शनी मत बनले आहे.

"महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा येणारी विधाने राजकीय नेत्यांनी करू नयेत. यापूर्वीही महिला आयोगाने अनुचित विधाने केल्याबद्दल राम कदम, प्रशांत परिचारक यांच्याविरुद्ध कारवाई केली होती. तसेच प्रियांका गांधी, उर्मिला मातोंडकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी कारवाई केलेली होती," असं महिला आयोगाने म्हटलं आहे.

2. PMC बँकेच्या खातेधारकांनी NOTA ला मत

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह (PMC) बँकेत पैसे अडकलेल्या खातेधारकांची नाराजी विधानसभा मतदानामध्ये पहायला मिळाली. PMCच्या अनेक खातेधारकांनी मतदान केलं, पण आपलं मत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला न देता NOTA ला दिलं, अशी बातमी मुंबई मिररने दिली आहे.

शंकर कोटियन, त्यांची पत्नी मंजुला आणि मुलगी अमृताचा यांनी NOTAला मत देऊन आपला राग व्यक्त केला. 50 वर्षीय शंकर हे बॉलिवुडमध्ये स्टंटमॅन होते. पैसे बँकेत अडकल्यामुळं त्यांची चांगलीच आर्थिक ओढाताण होत आहे.

नोटाला पसंती देणाऱ्या इतर खातेधारकांमध्ये 70 वर्षीय क्लिफॉर्ड डिसोझा, विश्वनाथ शेट्टी आणि त्यांच्या पत्नी नंदा यांचाही समावेश आहे.

3. एक्झिट पोलचे आकडे राज ठाकरेंसाठी निराशाजनक

सोमवारी (21 ऑक्टोबर) राज्यात पार पडलेल्या मतदानानंतर आलेले सर्व एक्झिट पोलचे आकडे राज ठाकरे आणि मनसेसाठी मात्र निराशाजनक आहेत, कारण एक्झिट पोलमध्ये मनसेला कुठेही जागा पाहायला मिळाली नाही. लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेनं राज्यभरात 101 उमेदवार उभे केले होते. राज यांनी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी सभा घेतल्या होत्या. प्रचारात राज ठाकरेंनी सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला साथ द्या असं आवाहन केलं होतं. मात्र त्याचा कोणताही फायदा पक्षाला झाला नसल्याचं एक्झिट पोलमधून दिसून आलं.

कारण काही या एक्झिट पोलनुसार मनेसेनं माहिम, कल्याण ग्रामीण आणि कोथरूडमध्ये कडवी लढत दिली असली तरी तिथेही त्यांना विजय मिळण्याची शक्यता कमी आहे.

4. सांगलीत पूरसदृश परिस्थिती

परतीच्या पावसाने गेल्या काही दिवसांत जोरदार हजेरी लावल्याने कृष्णा नदीकाठी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या तडाख्यातून सांगली सावरत असल्यामुळं प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या असून ग्रामीण भागातील ओढे-नाले यांना पूर आल्याने काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

रविवारी रात्रीपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस सुरू झाला होता. सोमवारी (21 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेपर्यंत थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे एका रात्रीत कृष्णा नदीची पाणी पातळी 31 फूट 7 इंचावर पोहोचली.

5. इंटरनेट हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका

इंटरनेटच्या माध्यमातून लोकशाही राज्यव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

'सोशल मीडियाचा गैरवापर होऊ नये तसंच इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्तिगत अधिकार आणि राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशानं सरकार काही नियम आखत आहे. त्यासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.' अशी माहिती केंद्र सरकारकडून सोमवारी (21 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं.

दरम्यान, सोमवारीच वर्ल्ड फोन इंटरनेट सर्व्हिसेस प्रा. लि. या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीनं दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं, की फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्स अॅप राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)