You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ खडसे: राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिली होती - #5मोठ्याबातम्या - विधानसभा निवडणूक
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.
1. राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिली होती-खडसे
"राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यासाठी एबी फॉर्म आणला होता तसेच आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिली होती", असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी केला.
आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते भुसावळमध्ये बोलत होते.
"गेल्या काही काळामध्ये माझ्यावर अन्याय झाला मात्र मी चांगल्या संस्कृतीत जन्माला आलो आहे. जनता माझ्यासोबत आहे. तोपर्यंत मी उभा राहाणार आहे. भाजपाने मला राज्यात ओळख दिली आहे. सहावेळा आमदार, विरोधी पक्षनेतेपद दिले, गटनेतेपद दिले व 12 खात्यांचा मंत्रीसुद्धा केले. अशा पक्षाला मी ऐनवेळी सोडणे योग्य वाटत नसल्याने मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही," असंही खडसे म्हणाले. मला पक्षाकडून राज्यपालपदाची ऑफरही देण्यात आली होती असं ते यावेळेस म्हणाले. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
2. मनमोहन सिंह-रघुराम राजन काळच सर्वांत वाईट
"भारतीस सरकारी बँकांसाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि रिझर्व्ह बँकेचे रघुराम राजन यांचा काळ सर्वांत वाईट होता," अशी टीका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्समध्ये आयोजित व्याख्यानात त्यांनी ही टीका केली आहे. "नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. ते कमालीचे एककल्ली नेते होते. अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे दृष्टी नव्हती", अशा शब्दांमध्ये राजन यांनी ब्राऊन विद्यापीठात टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सीतारामन यांनी यांनी ही टीका केली.
"राजन यांच्या कार्यकाळामध्ये बँकांनी नेत्यांच्या फक्त एका फोनकॉलवर कर्जे दिली. त्यातून बसलेल्या फटक्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारी बँका आजही सरकारकडून होणाऱ्या भांडवलपुरवठ्यावरच विसंबून आहेत", असे सीतारामन म्हणाल्या. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
3. हे सरकार म्हणजे बेलगाम मस्तावलेलं घोडं- प्रकाश आंबेडकर
"हे मस्तावलेलं सरकार आहे, निवडणुकांचे निकाल आधीच जाहीर होत आहेत. जिंकणार आहात तर निवडणुका कशाला लढवत आहात, निवृत्त व्हा. हे सरकार मस्तावलेलं बेलगाम घोडं आहे, त्याचा लगाम पकडण्याची गरज आहे. त्याला वठणीवर आणणार", अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
"निवडणूका आल्या की देसाला धोका कसा निर्माण होतो आणि निवडणूका संपल्या की सर्वत्र शांतता कशी असते" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पिंपरी चिंचवड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. "अर्थमंत्री सीतारामन यांचे पती पत्नीला म्हणतात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे बसावं आणि अर्थव्यवस्थेतील धडे घ्यावेत. अजून पाच नॅशनलाइज बँक डुबणार आहेत. त्या डूबण्यापासून वाचवणे आपल्या हातात आहे". अशी माहितीही त्यांनी दिली. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
4. राज्यात वादळी पावसाचा इशारा
18 ऑक्टोबरला मान्सून माघारी फिरण्याची शक्यता असून त्यामुळे वादळी पाऊस येऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात वादळी पावसाचा तडाखा बसण्याची चिन्हं आहेत अशी बातमी लोकमत न्यूज 18 नं दिली आहे.
गेल्या काही दिवसात कोल्हापूर आणि सांगली भागात पावसाचा जोरदार तडाखा बसला होता. त्यामुळे पिकांचं नुकसान झालं होतं. या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञांनी राज्यातील शेतकऱ्यांना काळजी घेण्याची सूचना दिली आहे.
5. राज ठाकरे चांगले नेते पण त्यांना मत मिळत नाही- रामदास आठवले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचं इव्हेंट मॅनेजमेंट चांगलं असतं. परंतु त्यांचा करिष्मा भाषण ऐकण्यापुरता आहे. त्यांना मतं मिळत नाहीत, असं मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.
वंचित बहुजन आघाडीला चांगली मतं मिळाली, पण निवडून येण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे तिसरी शक्ती निर्माण होईल असं वाटत नाही. त्यामुळे तिसरा प्रयोग करुन मतं वाया घालवण्यापेक्षा त्यांनी एका आघाडीत सामील व्हावं असंही रामदास आठवले म्हणाले. हे वृत्त टीव्ही9 मराठीने दिलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)