नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगवरून पत्र लिहिणाऱ्या 49 कलाकारांवर गुन्हा दाखल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, PTI
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.
1. झुंडबळीविरोधात मोदींना पत्र लिहिणाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा
देशाच्या विविध भागांमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या झुंडबळींच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नऊ नामवंत लेखक, कलाकार, विचारवंतांसह 49जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नामवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून झुंडबळी रोखण्यासाठी कडक कायदा करण्याचे आवाहन केलं होतं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
बिहारमधील मुझफ्फरपूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यात अभिनेत्री अपर्णा सेन, इतिहास संशोधक-लेखक रामचंद्र गुहा, दिग्दर्शक मणी रत्नम, श्याम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन, अभिनेता सौमित्र सेन, शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल, अभिनेत्री रेवती आणि कोंकणा सेन आदींचा समावेश आहे.
2. अयोध्या प्रकरणी 17 ऑक्टोबर तारीख महत्त्वाची
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. रामजन्मभूमीच्या वादावर कोर्टाचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा शुक्रवारी केली.
अयोध्येची जागा कुणाची, यावरून ही केस कोर्टात सुरू आहे. दोन्ही बाजूंचे वाद-प्रतिवाद येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत संपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अयोध्येची ती वादग्रस्त जागा नेमकी कोणाची, याचा छडा लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा करण्यात आला. गेल्या मे महिन्यापासून अयोध्या प्रकरणावर कोर्टात नियमित सुनावणी होत आहे.
3. PMC बँक घोटाळ्याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालकास अटक
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँके'च्या (PMC) कथित गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने (EOW) आज PMC बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक केली आहे. PMC बँकेच्या घोटाळ्यातील ही तिसरी अटक आहे.
ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याआधी PMC बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. आज अटक करण्यात आलेल्या जॉन थॉमस यांना बँकेने आधीच निलंबित केले आहे.
4. पशु-पक्ष्यांचा बळी देणं धार्मिक अधिकार नाही
त्रिपुरा राज्यातील मंदिरात पशु-पक्ष्यांचे बळी देण्यावर त्रिपुरा उच्च न्यायालयाने बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
पशु-पक्ष्यांचा बळी देणं हा धार्मिक अधिकाराचा मूलभूत भाग होऊ शकत नाही, शिवाय त्यामुळे राज्य घटनेच्या कलम 21चं उल्लंघन होत आहे, कारण प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने हा निकाल देताना म्हटले.
या निकालामुळे गेल्या 525 वर्षांत यावर्षी प्रथमच येथील प्रसिद्ध दुर्गाबारी मंदिरात पशु-पक्ष्यांचा बळी दिला जाणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
दुर्गाबारी मंदिराचे धर्मगुरू दुलाल भट्टाचार्य यांनी सांगितले, की गेल्या 525 वर्षांत प्रथमच या वेळी पाच दिवसांच्या दुर्गा पूजा उत्सवात प्राण्यांचा बळी दिला जाणार नाही. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय करोल व न्या. अरिंधम लोध यांनी सांगितले, की सरकार असो किंवा व्यक्ती, कुणालाही यापुढे मंदिरात पशुबळी देता येणार नाही. निवृत्त न्यायिक अधिकारी सुभाष भट्टाचार्य यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती.
5. दोन वर्षांत 39 लाख शेतकऱ्यांचे 30 हजार 790 कोटींचे नुकसान
मागील वर्षीच्या दुष्काळ तर यावर्षीची अतिवृष्टी तसंच पुरामुळे राज्यभरातील 39 लाख शेतकऱ्यांचे 27 लाख हेक्टरवरील पिकांचे 30 हजार 790 कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सरकारच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मागच्या वर्षी 7 हजार 100 कोटींची मदत मिळाली, तर यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे दोन हजार कोटींहून अधिक नुकसान होऊनही 501 कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























