You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपमध्ये आज 'मेगाभरती', हर्षवर्धन पाटील, गणेश नाईकांच्या पक्ष प्रवेशाची चिन्हं #5मोठ्याबातम्या
आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :
1) भाजपमध्ये आज 'मेगाभरती', हर्षवर्धन पाटलांसह दिग्गजांचा पक्षप्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या पक्षांतरांचं प्रमाण वाढलं असून, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची सख्या लक्षणीय आहे. हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक, कृपाशंकर सिंग आणि आनंदराव पाटील हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे अशी बातमी एबीपी माझानं दिली.
मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आज दुपारी तीन वाजता भाजपच्या 'मेगाभरती'ला सुरूवात होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल.
हर्षवर्धन पाटील आणि कृपाशंकर सिंग हे माजी मंत्री आहेत, तर आनंदराव पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. दुसरीकडं, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक हे सुद्धा भाजपमध्ये दाखल होतील असं म्हटलं जात आहे.
2) ओला, उबरमुळं वाहन क्षेत्रात मंदी : निर्मला सीतारमन
वाहन क्षेत्रातली मंदी ही लोकांच्या मानसिकतेतील बदलामुळं आणि बीएस-6 मुळं आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटलंय. तसंच, या क्षेत्रातील मंदीचं कारण ओला आणि उबरसारख्या कार असल्याचंही त्या म्हणाल्या. बिझनेस टुडेनं ही बातमी दिलीय.
"वाहन क्षेत्रातील घसरणीसाठी अनेक घटक कारणीभूत असून, बीएस-6 च्या निकषांपासून वाहन नोंदणी शुल्क आणि लोकांची मानसिकता अशा अनेक घटकांचा समावेश आहे. हल्ली कर्ज काढून गाडी घेण्यापेक्षा मेट्रो किंवा ओला-उबरमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत", असं निर्मला सीतारमन म्हणाल्या.
दरम्यान, आम्ही सर्वच क्षेत्रांबद्दल गंभीर असून, समस्यांचं निराकरण व्हावं म्हणून आवश्यक पावलं उचलू, असं आश्वासनही सीतारमन यांनी दिलं.
3) काँग्रेस-राष्ट्रवादीचा महाराष्ट्र विधानसभेसाठी 123-125 चा फॉर्म्युला: पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुक्रमे 123-125 जागा लढेल, तर 41 जागा मित्रपक्षांना दिल्या जातील, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगितलं. बिझनेस स्टँडर्डनं ही बातमी दिली.
मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या चर्चेनंतर या जागांमध्ये कमी-जास्त होऊ शकतं, असंही चव्हाण यांनी सांगितलं.
"वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी या पक्षांशी बोलणी सुरू आहे. जर या पक्षांसोबतची बोलणी सकारात्मक झाली, तर 41 जागा त्यांना देऊ." असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
4) डॉक्टरांनी ग्रामीण भागातल्या रुग्णालयात काम न केल्यास शिक्षा
ग्रामीण भागातील डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी सरकारनं नवा प्रस्ताव सादर केलाय. या प्रस्तावानुसार, राज्य सरकारनं वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात 20 टक्के, तर एमबीबीएससाठी 10 टक्के जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव दिलाय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
विशेष म्हणजे, या आरक्षणाचा लाभ घेऊन एमबीबीएसच्या शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांना पाच वर्षे,तर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांना सात वर्षे ग्रामीण भागात सेवा द्यावी लागले. जर अशी सेवा दिली नाही, तर पाच वर्षांचा तुरुंगवास आणि पदवी रद्दही केली जाऊ शकते.
फडणवीस सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. आता या प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. सुरूवातील एमबीबीएससाठी 450 ते 500 जागा आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी 300 जागा आरक्षित ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
5) मुंबईत सप्टेंबर महिन्यात गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस
यंदा मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेकवेळा मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं, लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.
पावसाची सप्टेंबरची अंदाजित सरासरी 10 सप्टेंबरपर्यंतच मोडली असून, 10 सप्टेंबरपर्यंत गेल्या 25 वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडला., असं हवामान विभागाच्या आकडेवारीवरून समोर आलंय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
सप्टेंबर महिन्यात याआधी 2016 साली 756 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला होता. हा गेल्या दहा वर्षांतील सप्टेंबरमध्ये पडलेला सर्वाधिक पाऊस होता. हा विक्रम सोमवारच्या पावसाने मोडला.
दरम्यान, सप्टेंबर महिना संपायला अजून 20 दिवस आहेत. शिवाय परतीचा पाऊस आहे. त्यामुळं आणखी पावसाचा अंदाजही वर्तवला जात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)