नितीन गडकरी: मी सरकार आणि देवावर अवलंबून राहणच सोडलं कारण... #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो : नितीन गडकरी

"सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो. म्हणून मी कधीच माझ्या कोणत्या कामासाठी सरकारकडे मदत मागत नाही," असं वक्तव्य करून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी पुन्हा चर्चेत आले आहेत. ही बातमी टीव्ही 9 मराठीने प्रकाशित केली आहे.

नागपुरात मदर डेअरीच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "संत वामन पै यांनी 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे' असा संदेश दिला होता. तेव्हापासून मी सरकार आणि देवावर अवलंबून राहणं सोडून दिलं. मी कधीच सरकारकडे मदत मागायला जात नाही. एक मदर डेअरीचा अपवाद सोडला तर आपल्याकडं सरकार जिथं हात लावतं तिथं सत्यानाशच होतो.

"सरकारने काही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक पण करतो. मात्र, मी कधीही सरकारकडं मदत घेत नाही. मी लोकांनाच काम करायला सांगतो," असं गडकरी पुढे म्हणाले.

"परदेशात गेल्यावर तिथं भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोललं जातं. हे ऐकून माझी मान शरमेनं खाली झुकतं. जोवर हे थांबत नाही, तोवर मी काम करत राहणार," असंही ते म्हणाले.

2. कलम 370 वर मतदान केलंच नाही - सुप्रिया सुळे

लोकसभेत कलम 370 वर मतदान होत असताना आपण सभागृहात उपस्थित नव्हतो. त्यामुळे कलम 370 विरोधात मतदान केल्याचा आरोप चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

कलम 370 वर मतदान घेतलं तेव्हा सुप्रिया सुळे यांनी त्याविरोधात मतदान केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी केला होता. याला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी आपली बाजू मांडली.

कलम 370 बाबत आपण ज्यांच्याबाबत निर्णय घेतो त्यांचं मत जाणून घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं. मात्र या चर्चेतून काहीच निष्पन्न न झाल्याने आपण सदनातून बाहेर पडलो आणि मतदानावर बहिष्कार घातला, असं सुळे म्हणाल्या. ही बातमी लोकमतने दिली आहे.

3. GST संकलनात घट

ऑगस्ट महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन एक लाख कोटी रुपयांखाली घसरलं असून मंदीसदृश वातावरणात सरकारी महसुलातही घट होत असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

ऑगस्ट महिन्यातील GST संकलन 98 हजार 202 कोटी रुपये नोंदवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील संकलनाच्या तुलनेत ते 4.51 टक्के अधिक असले, तरी मासिक एक लाख कोटी रुपयांच्या सरकारी उद्दिष्टापेक्षा ते कमीच भरले.

दरम्यान, बँकांच्या विलीनीकरणामुळे एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नसल्याचं स्पष्टीकरणही सीतारामन यांनी दिलं आहे. बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, या भीतीमुळे कर्मचाऱ्यांच्या संघटना या निर्णयाला विरोध करत असल्याच्या पाश्र्वभूमीवर सीतारामन बोलत होत्या. ही बातमी लोकसत्ताने प्रकाशित केली आहे.

4. कुलभूषण जाधव यांना मिळणार कॉन्सुलर अॅक्सेस

पाकिस्तान आज भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर अॅक्सेस देणार असल्याची बातमी ई-सकाळने प्रकाशित केली आहे. त्यानंतर भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची भेट घेता येणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आणि व्हिएन्ना करारानुसार जाधव यांना भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे, याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहंमद फैसल यांनी दिली.

5. भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी पुण्याचे मनोज नरवणे

मूळचे पुण्याचे असलेले लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी रविवारी (1 सप्टेंबर) भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रं स्वीकारली. ही बातमी पुढारीने दिली आहे.

ते मराठी कुटुंबातील असून त्यांचं शालेय आणि सुरुवातीचं शिक्षण ज्ञानप्रबोधिनीमध्ये झालं. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते लेफ्टनंट म्हणून 1980 मध्ये लष्करात दाखल झाले होते. त्यांनी जम्मू-काश्मीरमधल्या सशस्त्र गटांचा बीमोड करण्यासाठी राष्ट्रीय रायफल्सचं नेतृत्व केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)