मुख्यमंत्री माझे राजकीय गुरू, त्यांना अंगठा द्यायला तयार, पण... - पंकजा मुंडे #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. मुख्यमंत्री माझे राजकीय गुरू, त्यांना अंगठा द्यायला तयार, पण... - पंकजा मुंडे

मी नेहमीच माझे राजकीय गुरू म्हणून माझ्या वडिलांचा उल्लेख केला आहे. आज ते आपल्यात नाही. त्यांच्यानंतर आता माझे राजकीय गुरु हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. गुरुदक्षिणा म्हणून त्यांना मी माझा अंगठा द्यायला तयार आहे, पण तो अर्जुनासाठी असावा, असं विधान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे केलं आहे. झी 24 तासनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बीडमध्ये महाजनादेश यात्रेची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं. मुख्यमंत्र्यांनी अर्जुनासाठी अंगठा मागावा असं म्हणताना पंकजा मुंडेंचा रोख हा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याकडे होता.

बीडमधील महाजनादेश यात्रेत विनायक मेटेंच्या सहभागावरून पंकजा मुंडे आणि मेटे यांच्यामध्ये मानापमान नाट्य रंगलं होतं. न्यूज 18 लोकमतनं यााबाबत बातमीही दिली आहे. या वादाचा संदर्भ पंकजा मुंडेंच्या वक्तव्याला होता.

2. सगळीचं रसायनं चांगली नसतात - मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही दिग्गज नेते भाजपत प्रवेश करत आहेत. या पक्षप्रवेशांवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं या वादाची बातमी दिली आहे.

सुप्रिया सुळेंच्या 'वॉशिंग पावडर'ला मुख्यमंत्र्यांनी 'डॅशिंग पावडर' असं प्रत्युत्तर दिले होते. यावर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं.

मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे 'डॅशिंग केमिकल' असल्याचं म्हटलं आहे. पण सर्वच रसायनं चांगली नसतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मी सायन्सची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे रसायनांची मला चांगली माहिती आहे, असंही त्यांनी म्हटलं.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पक्ष सोडून जाणाऱ्यांनाही त्यांनी इशाराही दिला. 'भाजपवाले रसायनांची पावडर टाकत आहेत. रसायनातून काय-काय होतं, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं सांभाळून राहा,' असं त्यांनी म्हटलं.

3. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दोन वर्षांसाठी कर्जमाफी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित शेतकऱ्यांनी घेतलेलं सर्व पिकांसाठीचं बँक कर्ज माफ होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठी ही कर्जमाफी लागू होईल. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

सांगली, कोल्हापूरसह कोकण आणि इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र आधीच्या अध्यादेशात 'खरीप २०१९ च्या हंगामातील' पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येईल, असं नमूद केलं होतं.

त्यात सुधारणा करून बाधित शेतकऱ्याने प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

4. राहुल गांधींना दिशाभूल करण्याची सवय - निर्मला सीतारामण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आर्थिक वर्षात केंद्र सरकारला 1.76 लाख कोटी रुपये देणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निर्णयावर टीका करताना हा बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमेवर मलमपट्टी करण्याचा हा प्रकार आहे, असं ट्वीट केलं.

राहुल यांना लोकांची दिशाभूल करण्याची सवयच लागली आहे. पण जनतेनेच त्यांना निवडणुकीत उत्तर दिले आहे, असं म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राहुल यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. लोकसत्तानं हे वृत्त दिलं आहे.

सरकारला वरकड निधी हस्तांतरित करण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला आहे. त्यांनीच नेमलेल्या बिमल जालान समितीच्या शिफारशींनुसार हे हस्तांतरण झाले आहे. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेवर वा विश्वासार्हतेवर संशय घेणे चुकीचं आहे, असं निर्मला सीतारामण यांनी म्हटलंय.

5. दिल्लीत मेट्रो आणि बसमधून महिलांना मोफत प्रवासासाठी 290 कोटींचा निधी

मेट्रो आणि बसमधून महिलांना मोफत प्रवास करता यावा यासाठी दिल्ली सरकारनं 290 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. ही योजना ऑक्टोबर 29 पासून दिल्लीमध्ये लागू होईल. हिंदुस्तान टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

2019-20 या वर्षाच्या अर्थसंकल्पात पूरक मागण्यांचा भाग म्हणून हा निधी मंजूर झाला आहे. सोमवारी (26 ऑगस्ट) दिल्ली सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. या दिवशी महिलांना मोफत प्रवासासाठीच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने दिल्ली सरकारनं मोफत प्रवास योजना जाहीर केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)