You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार: निवडणुका पुढे ढकलण्याची गरज नाही #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया :
1) निवडणुका पुढे ढकलण्याची गरज नाही : शरद पवार
महापूर तीन राज्यातील असल्याने संपूर्ण राज्याच्या निवडणुका पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही, असं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कोल्हापुरात म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
पूरग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आचारसंहितेची अडचण येऊ शकते. त्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्या, अशी मागणी महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र, राज ठाकरे यांची मागणी संयुक्तिक नाही, असंही शरद पवार म्हणाले.
कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात आलेल्या भीषण पुराची पाहणी करण्यासाठी शरद पवार गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत आपली भूमिका मांडली.
त्याचवेळी, "पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळ घालवून चालणार नाही. विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळं आचारसंहिता लागू होण्याआधीच लवकर निर्णय व्हावेत." असंही पवारांनी नमूद केलं.
2) मराठवाड्यातील 11 धरणं जोडणार, 'जलसंजाल' योजनेची घोषणा
मराठवाड्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेता, राज्य सरकारने 16 हजार कोटींची 'जलसंजाल' योजनेची घोषणा केलीय. या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील प्रमुख 11 धरणं एकमेकांना जोडली जाणार आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
प्रमुख धरणं जोडण्यासाठी हजारो किलोमीटरची बंद पाईपलाईन टाकण्यात येणार असून, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपिंग स्टेशन सुविधांचाही यात समावेश असेल.
जलसंजाल योजनेची पहिली निवादा आठवड्याभरात निघणार असून, पहिल्या टप्प्यात 4,527 कोटींच्या कामाचा समावेश आहे.
इस्रायलची मेकोरोट ही राष्ट्रीय पाणीपुरवठा कंपनी या योजनेत सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. 2050 पर्यंतच्या पाण्याची गरज पाहून आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे.
3) बीएमसीचे 58 हजार कोटींची एफडी, तरी मुंबई पाण्यात बुडते : गडकरी
मुंबई महानगरपालिकेचे 58 हजार कोटी रूपये बँकेत फिक्स डिपॉझिट आहेत. तरीही दर पावसात मुंबई पाण्यात बुडालेलीच दिसते, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. एबीपी माझानं ही बातमी दिली.
मी मुंबईत कमी येत असलो, तरी मी स्वत:ला मुंबईकर समजतो, असं गडकरींनी नमूद केलं.
मुंबईचा समुद्रकिनारा मॉरिशसप्रमाणे काचेसारखा स्वच्छ होऊ शकतो. तसेच, इटलीतल्या व्हेनिसप्रमाणे मुंबईतही 'वॉटर टॅक्सी' सुरू करायला हवी, त्यातच भविष्य आहे, असंही यावेळी गडकरी म्हणाले.
अंदमान निकोबार नंतर देशांतर्गत पहिलं कांदळवन उद्यान मुंबईत तयार होतंय. बोरीवलीतील गोराईत हा प्रकल्प उभा राहणार आहे. या उद्यानाचं भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं.
4) सरकारी धोरणात आमचा हस्तक्षेप समाजहितासाठी : मोहन भागवत
सरकारी धोरणात आम्ही हस्तक्षेप करतो, पण तो हस्तक्षेप समाजहितासाठी आहे. संघाचा प्रभाव दाखवण्यासाठी नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
संघाच्या लघु उद्योग भारती या संस्थेच्या नागपुरातील सोहळ्यात मोहन भागवतांनी उपस्थितांशी संवाद साधला.
"सत्तेत आपल्या विचारांची लोक आहे. पण ते एका तंत्रात आहे, त्यांच्या मनात योग्य विचार असूनही त्यांनी केलेली सर्व कामं योग्य असतीलच असे नाही," असंही मोहन भागवत म्हणाले.
तसेच, संघ हा नियमांनुसारच चालतो. इथे शिस्त आहे. मी सरसंघचालक नसेन, तेव्हा संघाचा सर्वसामान्य स्वयंसेवक असेन, असं भागवत म्हणाले.
5) अण्वस्त्रांबाबत 'नो फर्स्ट यूज' धोरणात बदल होऊ शकतो - राजनाथ सिंह
काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण असताना भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अण्वस्त्र वापराबाबत अत्यंत मोठं विधान केलंय. अण्वस्त्रांबाबत 'नो फर्स्ट यूज' हेच भारताचं धोरणं राहिलं आहे, मात्र पुढे काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
"अटल बिहारी वाजपेयींनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्यांनी 'नो फर्स्ट यूज' हे धोरणही निश्चित केलं. भारत हे धोरण कसोशीने पाळत आहे. मात्र, भविष्यात काय होईल, हे परिस्थितीवर अवलंबून असेल." असं राजनाथ सिंह म्हणाले.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या स्मृतिदिनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरण येथे जाऊन आदरांजली वाहिली.
जबाबदार अण्वस्त्रधारी देश अशी भारताची ओळख आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानास्पद गोष्ट असून, वाजपेयींमुळेच आपल्याला हा सन्मान मिळाला आहे, असंही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)