बकरी ईदला कोल्हापूरमध्ये बोकडाची कुर्बानी नाही, पूरग्रस्तांना मदत करणार : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. ईदला बोकडाची कुर्बानी नाही, पूरग्रस्तांना मदत करणार

कोल्हापूर जिल्हा गेल्या आठवड्याभरापासून पाण्याखाली आहे. पुराने वेढलेल्या कोल्हापुरात सर्वधर्मिय सलोखा आणि माणुसकीचंही दर्शन घडतंय.

ईदच्या दिवशी बोकडाची कुर्बान न देता, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीचा निर्णय कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने घेतलाय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

विविध समाजघटकातील लोक कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यात मुस्लीम समाजाने सणवार बाजूला सारून मदतीसाठी पुढाकार घेतल्याने या निर्णयाचं कौतुक होत आहे.

बकरी ईदला बोकड खरेदीसाठी सुमारे 20 हजार रूपयांचा खर्च येतो. यंदा हा खर्च टाळून हीच रक्कम कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी, असं आवाहन कोल्हापुरातील मुस्लीम समाजातील तरूणांनी केलंय.

2. 'जायकवाडी'त 80 टक्के पाणीसाठा, विसर्ग सुरू करणार

मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडला नसला, तरी अहमदनगर आणि नाशिकमध्ये पडलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण 80 टक्के भरलं आहे. त्यामुळे जायकडवाडीतून 1500 क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एबीपी माझाने ही बातमी दिली.

जायकवाडी धरणातील पाणी गोदावरी पात्रातून आपेगाव आणि हिरडपुरी या बंधाऱ्यात सोडलं जाईल.

गोदावरी नदीच्या काठावरील गावांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रात प्रवेश न करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय.

नाशिक, अहमदनगरमधील पावसाच्या पाण्याची जायकवाडीत अशीच आवक सुरू राहिल्यास येत्या पाच ते आठ दिवसात धरण 100 टक्के भरेल, असा अंदाज आहे.

3. मोदी-शाह म्हणजे 'कृष्ण-अर्जुन' - रजनीकांत

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय अत्यंत योग्य पाऊल असल्याचं मत ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी व्यक्त केलंय.

यासोबतच, मोदी-शाह म्हणजे 'कृष्ण-अर्जुन' आहेत, अशा शब्दात त्यांनी कौतुकही केलं. डीएनएने ही बातमी दिलीय.

व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात रजनीकांत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अमित शाह हे सुद्धा उपस्थित होते.

अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'साठी अभिनंदन, सलाम तुम्हाला, असंही रजनीकांत यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी अमित शाह म्हणाले, "खरंतर कलम 370 याआधीच काढून टाकायला हवं होतं. ते कलम आता रद्द केल्याबद्दल गृहमंत्री म्हणून माझ्या मनात कुठलाही गोंधळ नाहीय. या निर्णयामुळे काश्मीरमधील दहशतवाद संपून विकासाला सुरूवात होईल, असा मला विश्वास आहे"

4. 'झोमॅटो'चे कर्मचारी संपावर, कंपनीविरोधात एल्गार

कोलकात्यातील हावडा येथील 'झोमॅटो'च्या कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात संप पुकारला आहे. आमची इच्छा नसतानाही बीफ आणि पोर्कचे पदार्थ डिलिव्हरी करण्यास सांगितलं जातं, असा आरोप या कर्मचाऱ्यांचा आहे. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिलीय.

"हिंदू कर्मचाऱ्यांना बीफचे पदार्थ नेण्याची इच्छा नाहीय, तर मुस्लीम कर्मचाऱ्यांना पोर्कचे पदार्थ नेण्याची इच्छा नाहीय. अशा पदार्थांची आम्ही डिलिव्हरी करणार नाही. ही भूमिका घेऊन आम्ही संपावर आहोत," असं संपकरी मौसिन अख्तर यांनी सांगितलं.

दुसरीकडे, कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या धर्माविरोधात काम करण्यास भाग पाडू नये, असं पश्चिम बंगालचे सिंचन मंत्री राजीव बॅनर्जी यांनी म्हटलं.

झोमॅटोने मात्र यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

5. काश्मिरी खेळाडूंसाठी धोनीचा पुढाकार

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काश्मिरी खेळाडूंसाठी पुढाकार घेणार आहे. तो जम्मू-काश्मीरमधील खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

धोनीने सध्या क्रिकेटमधून दोन महिने विश्रांती घेतलीय. तो सैन्यदलातल्या तुकडीसोबत दक्षिण काश्मीर परिसरात गस्त घालतोय.

जम्मू-काश्मीर क्रीडा क्षेत्रात पुढे यावं, यासाठी धोनी स्वत: केंद्रीय क्रीडामंत्र्यांशी चर्चा करणार असून, त्यानंतर क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचं पाऊल उचलणार आहे.

धोनीच्या योजनेला केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास लवकरच जम्मू-काश्मीरात क्रिकेट अकादमी सुरू केली जाईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)