You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सांगली कोल्हापूर पाऊस: देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांचा प्रश्न, 'धोक्याची पातळी वाढूनही प्रशासनाने कार्यवाही का नाही केली?'
जेव्हा धोक्याची पातळी वाढू लागली होती तेव्हाच प्रशासनाने कार्यवाही का केली नाही? असा प्रश्न पत्रकार परिषदेदरम्यान विचारला गेला असता मुख्यमंत्री म्हणाले सुरुवातीला पाऊस किती आहे याचा अंदाज न आल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
पाऊस पडू लागल्यावर दोनच दिवसानंतर एनडीआरएफला बोलवण्यात आलं होतं. माझं हेलिकॉप्टर उतरण्याची देखील परवानगी दिली नव्हती. इतकी परिस्थिती गंभीर होती असं मुख्यमंत्री म्हणाले.
ब्रह्मनाळ दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कडक कारवाई करणार
ब्रह्मनाळच्या दुर्घटनेत 12 जण मृत्युमुखी झाले आणि 8 जण बेपत्ता आहेत तर 2 जण जखमी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ब्रह्मनाळच्या स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्र्यांना विचारलं गावच्या सरपंचाने वारंवार तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तहसीलदारांकडून वेळेवर मदत पोहचली नाही. तुम्ही तहसीलदारांवर कारवाई करणार का? त्यावर मुख्यमंत्री म्हणाले ब्रह्मनाळ दुर्घटनेची चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरसंकटासाठी 153 कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. प्रत्येक तालुक्याला 25 कोटी रुपये देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
101 गावातले लोक विस्थापित झाले आहेत. आतापर्यंत 1 लाख 43 हजार लोक विस्थापित झाले आहेत. विविध ठिकाणी 117 कॅंप लावण्यात आले आहेत.
पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. 27,467 हेक्टरवरील पीकं खरडली गेली आहेत. बांधकाम विभागानं सांगितलं आहे की 484 किमीचे रस्ते पुरामुळे खराब झाले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचे 2615 रोहित्र (डीपी) खराब झाल्या आहेत.
याआधी मृतांच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये दिले जायचे. आता 5 लाख रुपये दिले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. जे अपंग होतील त्यांना 2 लाख रुपये दिले जातील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)