You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या अधिकाराचे दस्तावेज चोरीला' : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या अधिकाराचे दस्तावेज चोरीला
रामजन्मभूमीबाबतचे पुरावे असणारी कागदपत्रे 1982 साली आखाड्यावर पडलेल्या दरोड्यावेळी चोरीला गेली आहेत, असा दावा निर्मोही आखाड्यानं सुप्रीम कोर्टात केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
सुप्रीम कोर्टानं आखाड्याला त्यांच्या दाव्याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं. त्यावर उत्तर देताना निर्मोही आखाड्यानं अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या अधिकाराचे दस्तावेज चोरीला गेले आहेत, त्यामुळे पुरावे मिळवण्यासाठी काही वेळ द्यावा, अशी मागणी केली आहे.
सुप्रीम कोर्टानं आखाड्याची मागणी मान्य केली आहे. सरकारच्या नियंत्रणापूर्वी विवादित जमीन आखाड्याच्या ताब्यात होती, असा दावा निर्मोही आखाडा करत आला आहे.
2. अजित डोवाल जम्मू-काश्मीरमध्ये
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेत असल्याचा व्हीडिओ सरकारनं जारी केला आहे.
भारतीय संसदेन जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्याच्या 2 दिवसांनंतर हा व्हीडिओ जारी करण्यात आला आहे.
शोपियान इथल्या नागरिकांशी डोवाल चर्चा करत असल्याचं या व्हीडिओत दिसून येत आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
दरम्यान, "कलम 370 चा निर्णय घेण्यापूर्वी फारूख अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांना विश्वासात घ्यायला हवं होतं," असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
"फारूख अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांनीही तो भाग भारतातच राहायला पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. परंतू हा निर्णय घेताना राज्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलायला हवं होतं," असं पवार म्हणाले आहेत.
3. मुख्यमंत्री ठरवण्याची जहागिरी तुमची नाही - डॉ. अमोल कोल्हे
"मुख्यमंत्री ठरवण्याची जहागिरी तुमची नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्रातील जनतेला आहे," असं मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावर व्यक्त केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"रयतेचं राज्य पुन्हा आणण्यासाठी ही राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. 5 वर्षं काम करण्यात यश न आल्यानं जनादेश द्या, हे सांगण्यासाठी महाजनादेश ही यात्रा काढली जात आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.
"भविष्य साकारण्याची संधी येत्या विधानसभा निवडणुकीत मिळणार आहे. त्याचा विचार करा. भाजपची महाजनादेश, तर शिवसेनेची जनआशिर्वाद यात्रा जनतेवर लादलेली आहे. मात्र. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा मनानं काढण्यात आलेली आहे." असंही त्यांनी म्हटलंय.
4. पुण्यात रेड अॅलर्ट
पुण्यात गेल्या 10 दिवसात पडलेल्या पावसाइतका पाऊस गुरुवारी (8 ऑगस्ट) पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवामान खात्यानं शहरात रेड अॅलर्ट जाहीर केला आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.
गेल्या 10 दिवसात पुण्यात जवळपास 200 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तेवढाच पाऊस गुरुवारी पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यंमध्येही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
5. पंजाब नॅशनल बँकेनं गरिबांकडून वसूल केले 278 कोटी रुपये
पंजाब नॅशनल बँकेनं गरीब खातेधारांकडून दंडाची रक्कम म्हणून 2018-19 वर्षांत तब्बल 278.66 कोटी रुपये वसूल केले आहेत. क्विंट हिंदीनं ही बातमी दिली आहे.
27 लाख खातेधारकांच्या खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे पंजाब नॅशनल बँकेनं दंडाच्या स्वरुपात ही रक्कम वसूल केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
मध्य प्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी ही माहिती मागवली होती. यावर्षी बँकेंन वसूल केलेली रक्कम गेल्या वर्षीपेक्षा 32 टक्के अधिक आहे, असंही समोर आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)