You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे, कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांमध्ये पुराने घेतले 16 बळी
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून या पुराने 16 लोकांचा बळी घेतला आहे.
कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 51 हजार लोकांना पुरामुळे विस्थापित व्हावे लागले आहे. तर सांगली जिल्ह्यात 53 हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
पुरामुळे सर्वाधिक बळी सातारा जिल्ह्यात गेले आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात 7, पुणे जिल्ह्यात 4, कोल्हापूर जिल्ह्यात 2, सांगली जिल्ह्यात 2 तर सोलापूर जिल्ह्यात 1 मृत्यू पावसामुळे झाला आहे.
कोल्हापूरमध्ये गेले काही दिवस सतत कोसळत असलेल्या पावसामुळं पूरस्थिती उद्भवली आहे.
अनेक गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचं काम सुरू आहे. कोस्ट गार्ड, NDRF ची पथकं पोहोचली असून बचावकार्य सुरू झाली आहे. पाऊस थांबला असून राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. पावसानंही काही प्रमाणात उघडीप घेतलीये. कोल्हापूरमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना 9 ऑगस्टपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळपासूनच नौसेनेची दोन विमानं आणि एका बोटीसह 22 जणांचं पथक दाखल झालं.
NDRF आणि लष्कराच्या बोटींनी पूरग्रस्तांना हलविण्यास सुरुवात केल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाईंनी दिली.
मंगळवारपासून (6 ऑगस्ट) 204 गावातील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आल्याचंही देसाईंनी सांगितलं. 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.
महामार्गावरील पाण्यामुळे बचावामध्ये अडथळे
मंगळवारी रात्री लष्कराचं एक पथक दोन बोटींसह तसंच NDRFचे आणखी एक पथक चार बोटींसह शहरात दाखल झाले. परंतु महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे अडचण निर्माण झाली.
बुधवारी (7 ऑगस्ट) पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह बचाव पथक रवाना झालं तर शहरासाठी दोन बोटींची मदत घ्यायला सुरुवात झाली. सकाळी नौदलाच्या दोन विमानांमधून एका बोटीसह 22 जणांचे पथक शहरात दाखल झालं. नौदलाकडून आणखी 14 बोटीही देण्यात येतील.
प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदत पाठविली गेली आहे. आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टिंग सुरू करण्यात येणार आहे.
"आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येणार आहेत. प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये," असं आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 55.1 फूट आहे तर सध्या 111 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती बिकट झाल्यामुळे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आयर्विन पुलावर पाण्याची पातळी 55 फूट 6 इंच झाली आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार तसंच कोयना आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा, कडेगाव आणि शिराळा तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व मार्ग बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेली लोकं भेदरलेल्या अवस्थेत आहेत. घरं पुराच्या पाण्यात बुडल्याने सर्व साहित्य धान्य नष्ट झाल्याने, जनावरं वाहून गेल्याने पुन्हा उभं कसं राहायचं हा प्रश्न लोकांसमोर आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)