शिवसेनेत गुणवत्तेवर भरती, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. शिवसेनेत गुणवत्तेवर भरती, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

"भाजपमध्ये मेगाभरती सुरू असली, तरी शिवसेनेत मात्र गुणवत्तेवर आधारित भरती होत असल्याचे", सांगून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला, हे वृत्त लोकसत्ताने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

"निवडणुकांनंतर सर्व पक्ष लोकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवतात. मात्र शिवसेना हा एकमेव पक्ष बारा महिने आणि चोवीस तास जनतेसाठी काम करत असल्याचा" दावाही त्यांनी केला.

बीड येथे रविवारी बसस्थानकाच्या पुनर्बांधणी भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

2. '...पण शिवसेनेबरोबर युती करणार'

"लोकसभा निवडणुकीपूर्वीच आम्ही विधानसभा निवडणूक एकत्रित लढवण्याचे ठरवले आहे. प्रत्येकजण पंतप्रधान मोदींसाठी आम्हाला मत देत आहेत, याची कल्पना आम्हाला आहे. पण आम्ही दररोज आपले मित्र बदलू शकत नाही.

आम्ही एकट्याने निवडणूक जिंकू शकतो. पण आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहोत. आम्ही मागील वेळेपेक्षा चांगली कामगिरी करु", असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते हिंदुस्थान टाईम्सशी बोलत होते. याबाबतचे वृत्त त्यांनी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

सध्या राज्यात शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांची आाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन स्वतंत्र यात्रा सुरू आहेत.

3. 'माझ्या भरवश्यावर राहू नका, तुमच्या बळावर जिंका'

''2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला आत्ताच लागा. स्वत:च्या बळावर निवडून येता येईल असं काम करा. मोदींच्या नावावर निवडून येऊ या भ्रमात राह नका. माझ्या भरवश्यावर राहू नका'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या अभ्यासवर्गाला जमलेल्या खासदारांना सांगितलं

''स्वत:च्या हिंमतीवर निवडून येण्याचा कानमंत्र देतानाच माझ्या हिंमतीवर जिंकलोय, असा अहंकार मनात येऊ देऊ नका. प्रत्येकाच्या विजयात इतरांचाही वाटा असतो. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांकडे दुर्लक्ष करू नका'', असंही त्यांनी सांगितलं. हे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

4. 'काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्य सिंधिया यांना द्यावी'

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सुचवली आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा तरूण नेतृत्वाकडे द्यायची असल्यास सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया यासाठी सक्षम आहेत, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

येत्या 10 ऑगस्टला काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा मंजूर केला जाणार असून त्यानंतर पुढील अध्यक्ष कोण होणार, याचं चित्र स्पष्ट होईल.

मिलिंद देवरा यांनी पायलट आणि सिंधिया यांचं नाव सुचवण्याला वेगळं महत्त्व आहे. कारण ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

5. टीम इंडियाची वेस्ट इंडीजवर 22 धावांनी मात

रोहित शर्माचं अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं 15.3 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 98 धावा केल्या होत्या.

पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. फलंदाजीसह गोलंदाजीतही चुणूक दाखवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हे वृत्त लोकमतने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)