मराठी IPS अधिकाऱ्याची कामगिरी: बडोदा शहरातील पुरामध्ये मगरी फिरत असतानाही लोकांना कसं वाचवलं?

संजय खरात
    • Author, गणेश पोळ
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

बडोद्यात गेल्या 2-3 दिवसांत मुसळधार पाऊस पडला. त्यावेळी शहरातल्या विश्वामित्री नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा जोर वाढला होता. वाटेत विजेच्या तारा पडल्या होत्या. पाण्यात मगरी फिरत होत्या. अशा परिस्थितीत मराठी IPS अधिकारी संजय खरात यांनी अनेक गुजराती लोकांना पुरातून वाचवलं आहे.

"बडोदा शहरात बुधवारी (31 जुलै) मुसळधार पाऊस पडून पाणी साचायला सुरुवात झाली होती. या शहरातूनच विश्वामित्री नदी वाहते. शहरातलं साचलेलं पावसाचं पाणी आणि नदीचं पाणी एकमेकांमध्ये मिसळलं. त्यामुळे नदीजवळच्या रहिवासी भागात पाणी घुसलं. या नदीच्या पात्रातच अपार्टमेंट्स बांधली आहेत. अशा अपार्टमेंटच्या खालच्या मजल्यांमध्ये पाणी घुसू लागलं.

400 पोलीस कॉन्सटेबल, 36 पोलीस उपनिरीक्षक(PSI), 4 पोलीस निरीक्षक (PI), 2 सहायक पोलीस उपायुक्त आणि 26 NDRF च्या जवानांनी या बचावकार्यात सहभाग घेतला होता. या सगळ्या ताफ्याचं नेतृत्व IPS संजय खरात यांनी केलं.

मूळचे सोलापूर जिल्ह्यातले संजय खरात सध्या बडोद्याचे जिल्हा पोलीस उप-आयुक्त आहेत. IPS संजय खरात यांनी प्रसंगावधान राखलं आणि स्वत: आपत्ती व्यवस्थापन जवानांच्या खांद्याला खांदा लावून अनेकांचे प्राण वाचवले.

बुधवारी संध्याकाळपासूनच मदतीसाठी पोलीस हेल्पलाईनचे फोन खणखणू लागले. अशा परिस्थितीत अनेकजणांना वाचवण्यात यश मिळालं आहे. अजूनही पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे जवान स्टँडबाय आहेत," असं बडोदा शहराचे पोलीस उपआयुक्त संजय खरात यांनी ही बीबीसीशी बोलताना सांगितलं.

बडोद्याच्या तुफान पावसातील बचावकार्याबाबत बीबीसीने IPS संजय खरात यांच्याशी संवाद साधला.

"बुधवारी 31 जुलैला पावसाचा जोर वाढल्याचं दिसल्यावर प्रशासनानं तातडीची मिटिंग घेतली. परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातून विश्वामित्री नदी जाते. या नदीवर बांधलेल्या अजवा धरण भरल्यानं धरणाचे दरवाजे बुधवारी रात्रीचं उघडण्यात आले. त्यामुळं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यादिवशी मला एका कामासाठी बडोद्याहून अहमदाबादला एका जायचं होतं. पण तो प्लॅन मला रद्द करावा लागला," असं खरात सांगतात.

'रात्रभर गस्त घातली'

बुधवारी संध्याकाळी गस्त घालत असताना पावसात एक मारुती कार अडकल्याचं दिसलं. कारच्या आतमध्ये एका आजींना पॅरालिसिसचा झटका आल्यानं त्या बेशुद्ध झाल्य़ा होत्या. तेव्हा पोलिसांनी त्या आजींना कारमधून बाहेर काढून दवाखान्यात नेलं.

आजीला वाचवताना
फोटो कॅप्शन, या आजींना पावसात कारमधून जाताना पॅरालिसिसचा झटका आला होता.

त्यादिवशी रात्रभर आम्ही शहरात गस्त घातली आणि अनेक लोकांना बडोदा पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलवलं.

गुरुवारी शहरातलं पाणी आणखी वाढल्यामुळं राष्ट्रीय आपत्ती निवारण टीमच्या दोन तुकड्या मागवण्यात आल्या. सध्या बडोदा पोलीस, NDRFची टीम आणि स्वयंसेवी संस्था संकटात अडकलेल्या लोकांना मदत करत आहेत.

'पाण्यात मगरी असतानाही रात्रीचं बोटीनं जायचं ठरलं'

"NDRFच्या टीमने शुक्रवारी (2 जुलै) दिवसभर धाडसी ऑपरेशन पार पाडलं. अनेकांचे जीव वाचवले. त्यांनतर सायंकाळी अंधार पडल्यावर 6.30 वाजता टीमने विश्रांती घ्यायचं ठरवलं. पण साधारण 7.30 वाजता शहरातल्या वडसर भागातून एक तातडीच्या मदतीचा फोन (distress call) आला. त्यावेळी मी स्वत: NDRFच्या जवानांसोबत बोटीने जाऊन अडकलेल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी आणण्याचं ठरवलं. नदीचं पाणी जोरात वाहत होतं.

अंध व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी नेताना
फोटो कॅप्शन, अंध व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी नेताना

वाटेत विजेच्या तारा पडल्या होत्या, पाण्यात मगरी फिरत होत्या. अशा परिस्थितीत 10 वर्षांचा मुलगा आणि त्याचे आई-वडील यांना वाचवण्यात आम्हाला यश मिळालं." त्या तिघाजणांचा जीव वाचवल्याचा आनंद IPS खरात यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता.

"दोन दिवस मी संपूर्ण बचावकार्य राबवत होतो. पण शुक्रवारी स्वत: पाण्यात उतरून जवानांसोबत काम केलं. तेव्हा NDRFची टीम किती आव्हानात्मक परिस्थितीत काम करते याची जाणिव झाली," असं खरात सांगतात.

एका शेतकऱ्याचा जीव वाचवताना...

असाच एका शेतकऱ्याच्या मदतीच्या हाकेला धावून जातानाचा प्रसंग खरात सांगतात. "वडसरच्या कुटुंबाला संध्याकाळी 8 वाजता सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यानंतर रात्री 10 वाजता शहराजवळच्या तसदन गावच्या सरपंचांनी मदतीसाठी फोन केला. गावातले एक शेतकरी सकाळी शेतात गेलेले अजून परतले नाहीत, असं सागंण्यात आलं.

मदत कार्य
फोटो कॅप्शन, बडोड्यातल्या स्वयं-सेवी संस्थांनी मदत कार्यात मोलाचा वाटा उचलला, असं IPS संजय खरात सांगतात.

रात्री बचावकार्य करणं शक्य नसल्यानं NDRF टीम विश्रांती घेत होती. तरीही जवान विनंती करताच ते तयार झाले. याआधी SDRF ची टीम गावाकडे रवाना झाली होती. पण त्यांच्या लहान बोटींचा वेगाने वाहणाऱ्या पाण्यासमोर टिकाव लागणार नव्हता. त्यामुळे आम्ही NDRFच्या जवानांनी तसदन गावाकडे आगेकूच केली.

काही अंतर गाडीने पार केल्यानंतर बोटीने पुढं जायचं ठरलं. पण अर्ध्या वाटेत असताना SDRFच्या जवानांनी त्या शेतकऱ्याशी संपर्क झाल्याचं सांगितलं आणि आमचा जीव भांड्यात पडला."

लोकांवर जेव्हा आपत्ती येते तेव्हा पोलीस आणि NDRF जवान यांच्यावरचा तणाव आणि जबाबदारी अधिक वाढते, असं खरात म्हणाले.

"तणावात शांतपणे काम करणं आणि लोकांना कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची NDRF जवानांची पद्धत वाखाणण्याजोगी आहे," असं खरात अभिमानाने सांगतात.

बडोदा: किल्ल्यासारखं शहर

बडोदा शहर आणि परिसर एक किल्ल्यासारखा आहे. या शहराला जुन्याकाळी 4 मोठे दरवाजे होते. ते म्हणजे लहरीपुरा दरवाजा, पाणीगेट दरवाजा, गेंडी दरवाजा आणि चापानेर दरवाजा. सध्या बडोदा शहराची लोकसंख्या 22 लाख आहे.

बचावकार्य

अगदी कमी कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे 6 बडोदेकरांना प्राण गमवावे लागले आहेत. पाण्यात बुडून आणि विजेच्या धक्क्याने हे मृत्यू झाले आहेत. तसच तब्बल 1 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती खरात यांनी दिली.

संस्थानी काळात शहरात याच 4 दरवाजांमधून प्रवेश मिळत असे. शहरातून विश्वामित्री नदी जाते. मधल्याकाळात नदीपात्रात घरं बांधल्यामुळं ती अरूंद झाली आहे. त्यामुळेच शहरात पाणी घुसलं.

पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे इथून NDRFची टीम आली

बडोदा शहर जलमय झाल्यावर मदतीसाठी IPS खरात यांनी सरकारला NDRF आणि SDRFच्या तुकड्या पाठवण्याची विनंती केली. तेव्हा पुण्यातल्या तळेगाव दाभाडे इथून NDRFच्या 2 तुकड्या हवाईमार्गाने बडोद्याला रवाना झाल्या.

बचावकार्य

देशाच्या पश्चिम भागात येणाऱ्या आपत्ती निवारणासाठी तळेगाव दाभाडे इथं NDRFचं एक तळ उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तळेगाव दाभाडे येथून NDRFच्या तुकड्या रवाना केल्या जातात.

सोलापूरच्या अकलूजचे IPS संजय खरात

जिल्हा परिषद शाळेत शिकलेले संजय खरात सध्या गुजरात केडरचे IPS अधिकारी आहेत. खरात याचं शालेय शिक्षण माळशिरस (सोलापूर) तालुक्यातल्या वटपळी गावात झालं आहे.

माध्यमिक शिक्षण अकलूजच्या सदाशिवराव माने महाविद्यालयात घेतलं. तर पुण्यातल्या अॅग्रीकल्चर कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं आहे.

शेतकरी कुटुंबात जमलेले संजय खरात 2014 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

--