MumbaiRains: पुढील 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर न पडण्याचा महापालिकेचा इशारा

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि परिसरात शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे ठाणे परिसरातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला असून उपनगरीय रेल्वेसेवा कासवगतीने सुरू आहे.

पाऊस पडण्याची शक्यता असल्याने 24 तासांसाठी घराबाहेर पडू नका असा इशारा बृहन्मुंबई महानगर पालिकेने दिला आहे. आज दुपारी 1 वाजेपासून ते उद्या दुपारी 1 पर्यंत (4 ऑगस्ट) घराबाहेर पडू नका असं महापालिकेनं म्हटलं आहे.

अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करून पुढील 24 तासांत कल्याण आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं अशी सूचना त्यांनी दिली आहे.

वेधशाळेने आज दिवसभर तसंच उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सकाळपासून ठाणे परिसरात 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तसंच येत्या 48 तासांत कोकण तसंच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. कोकण तसंच नाशिक विभागात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता आहे.

पावसामुळे उद्भवणाऱ्या अनुचित घटनांना सामोरं जाण्यासाठी एनडीआरएफ तसंच एसडीआरएफच्या पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

खबरदारी म्हणून ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे.

शाळांना सुट्टी

दरम्यान संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी पालिका हद्दीमधील सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.

वेधशाळेने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण परिसरात पुढील चार तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे दुपारी ३ वाजून ३५ मिनीटांनी ४.५८ मीटरची भरती असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट राहून स्थानिक नगरसेवकांच्या समन्वयाने नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने दूर करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी दिले आहेत.

शहरात ज्या ठिकाणी पाणी साचलं आहे त्या ठिकाणी तात्काळ आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यानुसार महापालिकेचे अधिकारी त्या त्या परिसरात कार्यरत आहेत.

रेल्वे वाहतूक मंदावली

मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर पावसाचा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे वाहतूक संथपणे आणि उशिराने सुरू आहे. मात्र अजूनही रेल्वेसेवा बंद करण्यात आलेली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने ट्विट करून दिली आहे.

पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांनीही जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये पोलादपूरजवळ दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

दहिसर, वसई, विरार, नालासोपारा, अंधेरी, सांताक्रूढ, नवी मुंबई, गोरेगाव यांसह पूर्ण पश्चिम उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)