You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सनी लिओनी: मला माहिती आहे तू सनीच आहेस, प्लीज माझ्याशी एकदा बोल ना
- Author, भूमिका रॉय
- Role, बीबीसी हिंदी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अर्जुन पटियाला या सिनेमात सनी लिओनीने भूमिका वठवली आहे. या चित्रपटाच्या दृश्यात ती तिचा फोन नंबर एका जणाला देते. पण हा नंबर खरा आहे आणि लोक सनीचा नंबर समजून यावर कॉल करत आहेत.
हाच फोन नंबर 26 वर्षांच्या पुनीत अगरवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरलाय.
कारण हा पुनीत यांचा फोन नंबर आहे आणि सनी लिओनीचा नंबर समजून आता त्यावर सतत येणाऱ्या फोन कॉल्सनी ते हैराण झाले आहेत.
"मला आता स्वप्नंही पडत नाहीत, कारण माझा फोन पहाटे चारपर्यंत खणखणत राहतो," ते सांगतात.
या फोन कॉल्समुळे त्यांच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली आहे की आता या सिनेमामध्ये बदल करून फोन नंबरच्या ऐवजी 'बीप' ऐकू यावा, यासाठी ते कायदेशीर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत.
पूर्वी पोर्न स्टार असलेली सनी लिओनी गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवुडमध्ये स्थिरावली आहे. एक 'सेक्स सिम्बॉल' म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.
म्हणूनच सिनेमातला फोन नंबर खरा मानून त्यावर लोक फोन करत आहेत.
पुनीत अगरवाल यामुळे हैराण झाले आहेत, "त्यांनी (फिल्म निर्मात्यांनी) फोन करून हा नंबर प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, हे तपासून घ्यायला हवं होतं." बीबीसी हिंदीच्या भूमिका राय यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं.
अर्जुन पतियालाचे दिग्दर्शक रोहित जुगराज यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून गेला आठवडाभर अगरवाल यांना ना काम करता आलंय, ना त्यांना शांतपणे जेवता किंवा झोपता आलं.
आणि अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे असलेला हा नंबर ते बंद करून टाकू शकत नाहीत. ते म्हणतात, "या नंबर माझ्या व्यवसायाशी निगडीत आहे आणि माझ्या सगळ्या जुन्या मित्रांकडेही हाच नंबर आहे."
ज्या दिवशी ही फिल्म रिलीज झाली त्याच दिवशी त्यांना पहिला कॉल आला. फोन करणाऱ्याला सनी लिओनीशी बोलायचं होतं. आणि हा राँग नंबर असल्याचं अगरवाल यांनी सांगितल्यावर त्याचा यावर विश्वास बसला नाही.
वैतागून अगरवाल यांनी शेवटी फोन कट केला.
"पहिले दोन - तीन, अगदी 10 कॉल्स आले तेव्हाही मला असं वाटत होतं, की कोणीतरी माझी थट्टा करतंय. मला वाटलं माझा एखादा मित्र हे करत असावा."
पण हे कॉल्स येतच राहिले. आणि प्रत्येक कॉलर सारखाच प्रश्न विचारायचा, "मी सनी लिओनीशी बोलू शकतो का?"
अनेक कॉलर्सनी फिल्मचा उल्लेख केल्यानंतर नेमकं काय घडतंय हे त्यांच्या लक्षात आलं. "म्हणून मग मी तो सिनेमा पाहिला आणि त्यामध्ये खरंच माझा नंबर होता. यामध्ये कॉल करणाऱ्यांचा दोष नाही. त्यांनी खरंच माझा नंबर देऊन टाकला."
त्यांनी पोलीस तक्रार करण्याचाही प्रयत्न केला पण फोन करणारे हे लोक कोणताही गुन्हा करत नसल्याने याप्रकरणी पोलीस काही करू शकले नाहीत. त्याऐवजी त्यांनी अगरवाल यांना कोर्टात जायचं सुचवलं.
त्यानंतर फिल्ममधून आपला फोन काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका अगरवाल यांनी दाखल केली आहे.
त्यांना निर्मात्यांवर केस करायची नाही पण यानंतर फिल्म स्ट्रिमिंग सर्व्हिसवर येईल तेव्हा पुन्हा त्यांचा फोन नंबर जाहीर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलल्याचं ते सांगतात.
"सकाळी 8:30पर्यंत शांतता असते," ते सांगतात. मग कॉल्स सुरू होतात.
त्यानंतर दिवसभर फोन दर दोन-तीन मिनिटांनी वाजत राहतो. म्हणूनच दुसरं काहीही करणं त्यांच्यासाठी अशक्य झालंय.
पंजाब आणि हरियाणामधून बहुतेक कॉल्स येतात, कारण फिल्मचा मुख्य अभिनेता दिलजित दोसांज हा या भागात लोकप्रिय आहेत.
पण अगरवाल यांना इटली, दुबई, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामधूनही कॉल्स आले आहेत.
पण त्यांना सतत फोन करणारी व्यक्ती आहे न्यूझीलंडमध्ये. अगरवाल यांनी फोनला उत्तर दिल्याने या व्यक्तीने त्यांना व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवायला सुरुवात केली आणि व्हिडिओ कॉलला उत्तर द्यावं म्हणून त्रास देऊ लागला. त्या माणसाने स्वतःचे फोटो पाठवत ते सनी लिओनीला दाखवायला सांगितलं. आणि तिचे फोटोही पाठवायला सांगितले.
यातले फक्त दोनच कॉल्स असे होते जे करणारे पुरुष नव्हते. या बायकांना लिओनी नाही पण कोणत्याही ऍक्टरशी बोलायचं होतं. "मी याबाबत मदत करू शकत नाही असं सांगितल्यावर त्यातल्या एका महिलेने मलाच थोडावेळ अजून तिच्याशी बोलायची विनंती केली. ते शक्य नसल्याचं सांगून मी कॉल कट केला," त्यांनी हसत सांगितलं.
पण हे कॉल्स पटकन वेगळं वळण घेऊ शकतात. आणि फोनवर बोलणारा वाट्टेल ते बोलू लागतो, "सुरुवात सभ्यपणे होते. पण मी तिला ओळखत नाही असं सांगितल्यावर ते वाईट बोलू लागतात. ते म्हणतात आम्हाला माहीत आहे तू कुठे राहतोस, आम्ही तुला धडा शिकवू."
ते म्हणतात की हे सगळं इतकं अगम्य आहे की आता त्यांच्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांची चेष्टा करायला सुरुवात केली आहे. "दिल्लीची सनी लिओनी" असं म्हणतं ते तिची हिट गाणी म्हणायला लागतात.
"आता हा थट्टेचा विषय झालाय, पण असं पुन्हा व्हायला नको. मी हे हसण्यावारी न्यायचा प्रयत्न केला पण आता प्रकरण हाताबाहेर गेलंय."
हे कॉल्स लवकरच थांबतीय अशी त्यांना आशा आहे. पण दरम्यान ही संभाषण थोडक्यात संपवण्याचा ते प्रयत्न करतायत, "मी त्यांना सांगतो की ती आंघोळीला गेली असून आता बोलू शकत नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)