You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचं नाटक सुरू आहे- नवनीत राणा #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाटक सुरू आहे- नवनीत राणा
"शेतकऱ्यांच्या मुद्यावर विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय पक्ष नाटक करत आहेत. राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे" असा आरोप करत नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. नेटवर्क 18ने याबाबत बातमी दिली आहे.
जे सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत. त्यामुळे आता बनावट खत कंपन्यांवर कारवाई करण्याकरता केंद्र सरकारने नियंत्रण समिती स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राज्यातील पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करताना विलंब करत असल्याचा आरोप करत शिवसेनेने मोर्चा काढला. मुंबईतील बीकेसी परिसरातील भारती अक्सा या खाजगी विमा कंपनीच्या मुख्यालयावर हा मोर्चा काढ्ण्यात आला.
2. देशाच्या इंचन इंच जमिनीवरून घुसखोरांना हाकलणार-अमित शहा
देशातील इंचन्इंच जमिनीवरून घुसखोरांना आणि अवैधरीत्या राहणाऱ्या नागरिकांना हाकलून देणार आहे. अशा लोकांची ओळख पटवून त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार देशाबाहेर काढून टाकण्यात येईल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. 'सामना'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना शहा असं म्हणाले. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी हा आसाम कराराचा भाग असल्याचंही त्यांनी सांगितलं.
3. धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी लवकरच कायदा-मुख्यमंत्री
मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत त्यांचे क्लस्टर करून तसेच पुनर्विकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
अशा इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करतानाचा सध्या जे रहिवासी अशा इमारतीत राहत आहेत त्यांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करणे तसंच तसे न करता आल्यास दोन वर्षांचे भाडे देणे तसंच रिट ज्युरिडिक्शन वगळता अन्य सर्व कायदेविषयक अडथळा दूर करणे अशा ठोस तरतुदी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, विनोद घोसाळकर उपस्थित होते.
4. अविवाहित मुलीने मोबाईल वापरल्यास वडिलांना होणार दंड
गुजरातमधील दांतीवाडा इथं ठाकोर समाजाने एक निर्णय घेतला आहे. अविवाहित मुलींच्या मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अविवाहित मुलीने मोबाईल वापरला तर वडिलांना दीड लाखाचा दंड भरावा लागणार आहे.
'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. ठाकोर समाजातील मुलीने इतर जातीच्या मुलासोबत लग्न केल्यास दीड लाखाचा दंड करण्यात येणार आहे.
14 जुलैला जगोल गावात झालेल्या ठाकोर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
5. हिमा दासने पटकावलं चौथं पदक
चेक रिपब्लिक इथं सुरू असलेल्या ताबोर अथलेटिक्स स्पर्धेत धावपटू हिमा दासने चौथ्या सुवर्णपदकाची कमाई केली. 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हिमाने अव्वल क्रमांक पटकावला. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
हिमाने 23.25 सेकंदांत ही शर्यत जिंकली. व्ही.के. विस्मयाने दुसरा क्रमांक मिळवला.
यंदाच्या महिन्यातलं हिमाचं हे चौथं सुवर्णपदक आहे.
400 मीटर शर्यतीत मुहम्मद अनासने सुवर्णपदक पटकावलं. त्याने 45.40 सेकंदात शर्यत पूर्ण केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)