गडकरींच्या खासदारकीला पटोलेंचे उच्च न्यायालयात आव्हान #पाचमोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook / Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1.गडकरी यांच्या विजयाला उच्च न्यायालयात आव्हान
केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नितीन गडकरी यांच्या निवडणुकीतील विजयाला प्रतिस्पर्धी उमेदवार नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारा आव्हान दिले आहे, लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
निवडणूक आयोगाने सांगितलेल्या नियमांचा गडकरी यांनी भंग केल्याप्रकरणी ही याचिका दाखल केली असं नाना पटोले यांनी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. निवडणूक आयोग, निवडणूक अधिकारी आणि गडकरी यांच्याविरोधात याचिका दाखल केल्याची माहिती पटोले यांनी दिली.
नितीन गडकरींनी यांनी अद्याप यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांची प्रतिक्रिया येताच ही बातमी अपडेट करण्यात येईल.
2. दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वकील संजीव पुनाळेकरला जामीन मंजूर झाल्याची बातमी सकाळने दिली आहे.
संजीव पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या खंडपीठाने निकाल दिला होता. सीबीआयच्या कार्यालयात सोमवारी आणि गुरुवारी हजर राहणं, परवानगीशिवाय परदेशात न जाणं, साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, सीबीआयने बोलावल्यास हजर राहणं अशा अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आरोपींना शस्त्र नष्ट करण्यासंबंधी सल्ला दिल्याप्रकरणी पुनाळेकरला अटक करण्यात आली होती. त्याला पुन्हा कोठडी देण्याची मागणी सीबीआयने केली होती.
3. अल्पेश ठाकोर यांचा राजीनामा
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत मतदान केल्यानंतर लगेचच काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, मराठी हिंदुस्थान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Alpesh Thakor/facebook
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवून मी काँग्रेसमध्ये आलो होतो. पण दुर्दैवाने त्यांनी आमच्यासाठी काहीच केले नाही. पक्षामध्ये आमचा सतत अपमानच होत राहिला. यामुळेच मी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता, असे अल्पेश ठाकोर यांनी म्हटलं.
4.सीबीआयचे अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांची उचलबांगडी
सीबीआयचे अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची अग्निशमन विभाग नागरी सुरक्षा, आणि होमगार्ड या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे. हे पद यापूर्वी सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांना देण्यात आलं होतं. मात्र या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सेवेचा राजीनामा दिला होता.

फोटो स्रोत, PTI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. राव यांचा कार्यकाळ कमी करून त्यांची गृह मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे. राव 1986 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत.
5. कारगीलसारखा अतिरेक पाकिस्तान पुन्हा करणार नाही- बिपीन रावत
पाकिस्तानने १९९९मध्ये कारगील भागात घुसखोरी केली होती. मात्र, त्यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला आहे. त्यामुळे पुन्हा तशी घुसखोरी करण्याचे धाडस पाकिस्तान करणार नाही, अशी प्रतिक्रिया लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
कारगिलमध्ये झालेल्या युद्धाला वीस वर्षं पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन विजय'च्या अनुषंगाने रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. 'भारतीय जवानांची गस्त नाही. असं कोणतंही क्षेत्र अस्तित्वात नाही. सुरक्षारक्षक सर्व ठिकाणी नजर ठेवून आहेत आणि गस्तीपथकांचं कामही व्यवस्थित सुरू आहे,' असे रावत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




















