खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटलं, जलसंधारण मंत्र्यांचा अजब दावा : #5मोठ्याबातम्या

तिवरे धरण

फोटो स्रोत, BBC/SWATIPATILRAJGOLKAR

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. खेकड्यांमुळे फुटले धरण, मंत्र्यांचा अजब दावा

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ तिवरे धरणात खेकड्यांची मोठी अडचण आहे, त्यातूनच धरणाला गळती लागली, असा दावा राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरणाचं काम शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीनं केलं आहे.

धरणाबद्दल बोलताना तानाजी सावंत यांनी काही गोष्टी विधीलिखित असतात त्यामुळे सदानंद चव्हाण यांना दोष देणे योग्य नाही, असं विधान केलं आहे.

तिवरे धरणाच्या कामाबद्दल जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी साशंकता व्यक्त करत या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

धरणाबद्दल सावंत म्हणाले, या धरणात खेकड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली त्यातून गळती झाल्याचं निदर्शनास आलं. ही गळती बंद करण्याचं काम अधिकाऱ्यांनी केलं होतं. हे वृत्त लोकमतनं प्रसिद्ध केलं आहे.

2. नितेश राणे यांना अटक

उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी नितेश राणे आण त्यांच्या समर्थकांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकला. शेडेकर यांच्या फिर्यादीनंतर नितेश राणे यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

नितेश राणे यांनी केलेल्या चिखलफेकीबद्दल नारायण राणे यांनीही निषेध व्यक्त केला होता.

नितेश राणे यांचं वर्तन चुकीचं होतं. मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या चिखल आणि खड्ड्याविरोधातील राग आणि आंदोलन समजू शकतो, मात्र नितेश यांच्या समर्थकांनी केलेली हिंसा चुकीची आहे. मी याला आजिबात पाठिंबा देत नाही, अशा शब्दांत नारायण राणेंनी निषेध नोंदवला होता. एबीपी माझाने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

3. दाभोलकर हत्येप्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयला आवश्यक सहकार्य करत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारलं.

विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जाणाऱ्या गुन्ह्यांचा विचार न करता, राज्यामध्ये अशीच स्थिती कायम ठेवायची आहे की सुधारायची याचा विचार राज्य सरकारने करावा, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले.

दाभोलकर

फोटो स्रोत, FACEBOOK

दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांनी या दोन्ही हत्या प्रकरणाबाबत असामाधान व्यक्त करत उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल ठाणे खाडीत टाकल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येणार होती. ते शोधण्यासाठी पाणबुड्यांसाठी तात्पुरता पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियमन प्राधिकरणाने बऱ्याच अटी घातल्याचं सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितलं. यावर न्यायालयाने नापसंती व्यक्त करत अशा कारवायांमुळे पर्यावरणाला धक्का पोहोचेल असे सांगितलं.

सरकारने सीबीआयला सहकार्य करावं. जर सरकारी विभाग तसं सहकार्य करत नसतील तर त्यांना न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश देण्यात येतील असंही न्यायालयानं सांगितलं. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. कुलभूषण जाधव यांच्या खटल्याचा 17 जुलै रोजी निकाल

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातल्या तुरुंगात असलेल्या माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याचा 17 जुलै रोजी निकाल येणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. 17 जुलै रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता ही सुनावणी होणार आहे.

कुलभूषण जाधव

फोटो स्रोत, PAKISTAN FOREIGN OFFICE

न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलकवी अहमद युसुफ त्यांचा निकाल वाचून दाखवतील. एप्रिल 2017मध्ये जाधव यांना अटक करण्यात आली होती. तसंच त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 मे 2017 रोजी पाकिस्तानच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती. सामनानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

5. पावसाळा सुरु झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच

जून महिन्यात कोकण आणि मुंबईत पाऊस पडला असला तरी राज्याच्या अन्य भागांमध्ये पाऊस पडलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये सरासरीपेक्षा 46 टक्के आणि सांगलीत सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे.

जुलै महिना सुरू होऊनही मराठवाड्यातली धरणं कोरडीच आहेत.

उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये सर्वांत कमी पाऊस पडला आहे. तिथं सरासरीच्या केवळ 35 टक्के पाऊस पडला आहे. विदर्भाच्या 11 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी प्रमाणात पडला आहे. लोकमतनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)