रेल्वेमध्ये 50% पदांवर महिलांची भरतीः पीयूष गोयल #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. रेल्वेत 50% पदांवर महिलांची भरतीः पीयूष गोयल

रेल्वेत 9 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती हवालदार आणि पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी असेल. यामध्ये महिलांना 50 % टक्के स्थान देण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत केली आहे.

पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून यासंबंधी माहिती दिली आहे.

रेल्वेत 9 हजार पदांची भरती करण्यात येणार असून त्यात महिलांना 50 टक्के संधी देण्यात येणार आहे.

2019 ते 2021 पर्यंत 10 टक्के आरक्षणांतर्गत 4 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

2. भारतीयांच्या हज कोट्यात तब्बल 30 हजारांची वाढ

सौदी अरेबियानं भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यात 30 हजारांची वाढ केली आहे. यामुळे दरवर्षी हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या 1 लाख 70 हजारांहून 2 लाखांवर पोहोचणार आहे.

या वर्षापासून 30 हजार अन्य भाविकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-20 परिषदेच्या निमित्तानं जपानमध्ये आहेत.

मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये नुकतीच द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी हज कोट्यावर चर्चा झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. NDTVनं ही बातमी दिली आहे.

3. चारा छावण्यांसाठी फसवणूक; 84 संचालकांविरूद्ध गुन्हा

दुष्काळाच्या काळात चारा छावण्या सुरू करण्यासाठी खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 8 संस्थांच्या 84 संचालकांविरूध्द सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

सांगोल्यातील मंडल अधिकारी रवींद्र ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुष्काळाची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या सांगोला तालुक्यात यंदा मुक्या जनावरांना जगविण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याबाबत प्रस्ताव मागवले होते.

यंदा चारा छावण्यांचे प्रस्ताव मागवल्यानंतर त्यात 8 संस्थांच्या आलेल्या प्रस्तावांची छाननी केली असता, त्यात या सर्व 8 संस्थांनी यापूर्वी 2012-13 आणि 2013-14 मध्ये दुष्काळात चारा छावण्या चालविताना आर्थिक घोटाळा केल्याची माहिती समोर आली.

या सर्व संस्थांविरुद्ध त्यावेळी चौकशीअंती फौजदारी कारवाई झाली होती. परंतु ही माहिती यंदा चारा छावण्यांचे प्रस्ताव सादर करताना दडवून खोटे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आल्याचे दिसून आले.

4. देशात 5 वर्षांत हत्तींमुळे 2300 बळी

गेल्या 5 वर्षांत हत्तींमुळे देशभरात 2398 जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी लोकसभेत दिली आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या 5 वर्षांत सर्वाधिक म्हणजेच 403 मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल नागालँडमध्ये 397 आणि झारखंडमध्ये 349 जणांचा मृत्यू झाले आहेत.

गेल्या वर्षी हत्ती आणि मनुष्य यांच्या संघर्षात 494 जणांचा बळी गेला आहे.

5. नागपूर विद्यापीठात 3 प्राध्यापकांचा 2 दिवसांत 1.5 लाख रुपयांचा चहा-नाश्ता

नागपूर विद्यापीठातील 3 प्राध्यापकांनी 2 दिवसांत 1.5 लाख रुपयांचा चहा-नाश्ता केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. विद्यापीठात बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

बिलानुसार, हे प्राध्यापक दोन दिवसांमध्ये नाश्त्याशिवाय 99 कप चहा आणि 25 कप कॉफी प्यायले.

बैठकीचे हे बिल पास करण्यासाठी विद्यापीठाच्या अकाउंटस विभागाकडे पाठवण्यात आलं. विभागाने रक्कम पाहून बिल पास करण्यास नकार दिला. त्यानंतर ते बिल कुलगुरूंकडे पाठवण्यात आलं. त्यानंतर कुलगुरूंनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)