You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नंदादेवी शिखर सर करण्यासाठी गेलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले
गेल्या महिन्यापासून हिमालयामध्ये हरवलेल्या सात गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठव्या गिर्यारोहकाचा शोध अद्याप सुरू आहे.
उंचीनुसार भारतातले दुसऱ्या क्रमांकाचं नंदादेवी शिखर सर करण्यासाठी 8 जणांचा चमू हिमालयात गेला होता. यामध्ये 4 ब्रिटिश, 2 अमेरिकन, एक भारतीय आणि एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा समावेश होता.
नंदादेवी जवळील दोन हिमनद्यांच्यामध्ये असणाऱ्या एका घळईमध्ये हे गिर्यारोहक गेल्या महिन्यात हरवले होते. या भागाची उंची 5,380 मीटर्स इतकी आहे. याच काळामध्ये या परिसरात पर्वतांवरून मोठ्या प्रमाणात बर्फाचे लोट खाली आल्याचे सांगितलं जातं.
26 मे रोजी त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता.
ब्रिटिश गिर्यारोहक मार्टिन मोरान या संघाचे नेतृत्व करत होते. त्यांच्या स्कॉटलंडमधील मोरान माऊंटेन कंपनीने हिमालयात अनेक यशस्वी मोहिमा पार पाडल्या होत्या.
त्यांच्याबरोबर जॉन मॅकलारेन, रुपर्ट व्हेवेल, रिचर्ड पायन, अँथनी सुडेकुम, रोनाल्ड बायमेल, रुथ मॅक कान्स आणि चेतन पांडे यांचा समावेश होता.
या गिर्यारोहकांचे मृतदेह भारतीय बचावपथकाला जून महिन्याच्या सुरुवातीला दिसले होते. परंतु बचावपथकातील लोकांना तिथं उतरवण्यात वारंवार अपयश आल्यामुळे ही प्रक्रीया लांबली.
इंडो-तिबेटियन पोलीस दलाच्या 25 जणांच्या चमूने या सात मृतदेहांना गोळ केल्याचे पिठोरगडचे वरिष्ठ अधिकारी व्ही. के. जोगदंडे यांनी सांगितलं.
त्याठिकाणी एक कॅम्प तयार करण्यात आला असून हे तिथं मृतदेह ठेवण्यात आले आहेत. आठवा मृतदेह लवकरच सापडेल असं त्यांनी सांगितलं.
हे मृतदेह बेसकॅम्पला आणण्यासाठी किमान तीन दिवस लागतील, असंही जोगदंडे यांनी सांगितलं.
या गिर्यारोहकांच्या शोधासाठी दोन चमू कार्यरत होते. त्यात सुमारे 50 गिर्यारोहक, हमाल, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे लोक आयटीबीपी आणि भारतीय गिर्यारोहण संस्थेचे होते.
या महिन्याच्या सुरुवातीला मार्क थॉमस, इयान वेड, केट आर्मस्ट्राँग, झेशरी कुऐन या गिर्यारोहकांना वाचवण्यात आलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)