You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्राउंड रिपोर्ट : ...आणि झिकाग्रस्त आईने दिला निरोगी बाळाला जन्म
- Author, जुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी जयपूरहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात सोमवारी झिका व्हायरसच्या संसर्गाने ग्रस्त एका महिलेने आपल्या चौथ्या बाळाला जन्म दिला. या प्रकारच्या प्रसूतीची ही जयपूरमधली पहिलीच घटना आहे.
प्रसूतीआधी आई आणि वडील दोघंही घाबरलेले होते. त्यांची भिस्त केवळ डॉ. अंजुला चौधरी यांच्यावरच होती. एवढंच नाही तर प्रशासनही या बाळाच्या जन्माची वाट बघत होतं.
सोमवारी रात्री सिझेरिअन करून बाळाचा जन्म झाला. बाळ एकदम निरोगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. स्थानिक प्रशासनानंही आनंद व्यक्त केला.
"गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांत गर्भवतीला झिकाची लागण झाली तर बाळावर त्याचा परिणाम होतो. प्रसूती अगदी जवळ आली, त्यावेळी या महिलेची झिका टेस्ट पॉझिटिव्ह आढळली होती," असं डॉ. अंजुला चौधरी या प्रसूतीनंतर यांनी बीबीसीला सांगितलं.
200 पथकांची नेमणूक
हे कुटुंब बिहारहून जयपूरला येऊन स्थायिक झालं आहे. कुटुंबात पहिल्या तीन मुलींनंतर चौथा मुलगा झाला. त्यामुळे त्यांचा आनंद आणखी जास्त आहे. जयपूरमध्ये झिका विषाणूच्या सावटात या बाळाचा जन्म झाल्याने ही मोठी बातमी ठरली.
शहरात एकूण 29 जणांना झिकाची बाधा झाली आहे. यापैकी तीन गर्भवती महिला डॉक्टरांच्या निगराणीत आहेत. डासांपासून या विषाणूची लागण होते. मात्र काही वेळा लैंगिक संबंधांतूनही याचा संसर्ग होऊ शकतो.
गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यात गर्भवतीला झिकाची लागण झाली तर जन्माला येणाऱ्या बाळात मानसिक व्यंग असू शकतं. अशावेळी बाळाच्या डोक्याचा आकार बदलतो. महत्त्वाचं म्हणजे यावर आजघडीला कुठलाही उपचार नाही.
जयपूरमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका पथकाच्या मदतीने राज्य सरकार झिकाचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न करत आहे.
राज्यभरात 200 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथकं झिकाच्या संक्रमणाची शक्यता असलेल्या भागांमध्ये जाऊन जनजागृती करत असल्याचं राजस्थानचे आरोग्य मंत्री काली चरण सराफ यांनी सांगितलं.
महिलांमध्ये संक्रमणाचं प्रमाण जास्त
झिका विषाणुच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलत असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राजस्थान सरकारनं केला आहे.
या अभियानाविषयी बोलताना राजस्थानचे आरोग्यमंत्री सराफ सांगतात, "युद्धपातळीवर झिकाचा सामना करावा, अशा सूचना आम्ही सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत."
बुधवारी झिकाचा एकही रुग्ण न आढळल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला. मात्र अजूनही ब्लड सँपल घेतले जात आहेत. त्यांची चाचणी केल्यावर ही संख्या 29 पेक्षा जास्तही होऊ शकते.
'जिथे डास, तिथे झिका' (मच्छर पनपेगा जहाँ, झिका फैलेगा वहाँ) अशा घोषणा लिहिलेली पत्रकं घरोघरी वाटली जात आहेत. प्रशासनाने विशेषकरून महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे.
अभियानाचा परिणाम
जयपूरमधला शास्त्रीनगर भाग सर्वांत जास्त लोक झिकाग्रस्त आहे. 29 पैकी 26 रुग्ण एकट्या शास्त्रीनगर भागातील आहेत.
या भागाच्या तीन किलोमीटर परिघात आरोग्य कर्मचारी तैनात आहेत आणि लोकांना झिकाची सर्व माहिती पुरवण्याचं काम करत आहेत.
मात्र नागरिकांनी खुली गटारं आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत प्रशासनच या भागात साफ-सफाई करत नसल्याचा आरोप केला आहे.
या भागात दाट लोकवस्ती आहे. घरही कच्ची आहेत. अतिशय गलिच्छ वातावरणात या लोकांना रहावं लागतं.
जवळच एक कचरा डेपो आहे. तिथे डुकरं आणि इतर प्राणी दिवसभर चरताना दिसतात. याच मैदानाजवळ लहान मुलं खेळतात.
विषाणू आला कुठून?
या कचऱ्याच्या मैदानाजवळ एक इमारत आहे. या इमारतीकडे बोट दाखवत एकाने सांगितलं की ही सरकारी शाळा आहे. मात्र कचऱ्यामुळे मुलं शाळेत जाऊ शकत नाही.
प्रशासनाला झिकाचा सामना करण्याला प्राधान्य द्यावं लागत असलं तरी या भागात स्वच्छता मोहीम राबवली नाही तर झिकाच्या फैलावाचा धोका असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे हा विषाणू आला कुठून, हे शोधणंही सरकारसाठी महत्त्वाचं आहे.
आरोग्य मंत्री सराफ यांचा दावा आहे की हा विषाणू बाहेरून आला आहे. मात्र तो कुठून आला, याची कुठलीच माहिती सरकारला नाही.
बिहार-उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा
गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये झिकाचे तीन रुग्ण आढळले होते. मात्र झिकावर त्वरित नियंत्रण मिळवण्यात गुजरात सरकारला यश आलं.
30 देशांमध्ये झिका विषाणू सापडले आहेत. तीन वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये शेकडो जणांना झिकाची बाधा झाली होती. मात्र जयपूरमधल्या झिकाग्रस्तांपैकी कुणीही कधीच परदेशवारी केलेली नाही.
त्यामुळे डॉक्टरांचा एक तर्क असाही आहे की देशांतल्या दुसऱ्या भागातून आलेल्यांमुळे झिकाचा फैलाव झाला असण्याची शक्यता आहे. या प्रवाशांमुळे झिका इतर राज्यांत पसरू नये, अशी भीती ते व्यक्त करतात.
जयपूरमध्ये राहणारा मूळचा बिहारचा असणारा एक कामगार झिकाची लागण झाल्यावर आपल्या गावी परत गेला.
बिहार आणि उत्तर प्रदेशातले हजारो मजूर जयपूरमध्ये काम करतात. त्यामुळे या दोन्ही राज्याच्या सरकारने अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)