धुळे लोकसभा : सुभाष भामरे यांच्याविरोधात काँग्रेसच्या शोभा बच्छाव निवडणूक लढणार

लोकसभा निवडणूक
    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published

काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढत भाजपनं गेल्या तीन निवडणुकीत मतदारांना स्वतःच्या बाजूनं वळवण्यात यश मिळालेला मतदारसंघ म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ.

भाजपनं मतदारसंघात सलग दोन वेळा खासदार बनलेले डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळं खासदारकीची हॅटट्रिक करण्याच्या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजप कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.

पण दुसरीकडं महाविकास आघाडीतली परिस्थिती अद्याप याच्या पूर्ण उलट असल्याचं दिसत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आहे. नाशिकच्या माजी आमदार शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे.

मुस्लीम मतदारांची संख्या आणि एमआयएमची शक्ती यामुळं एमआयएम इथं काय भूमिका घेणार त्याकडंही लक्ष लागलेलं आहे. त्याचाही निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं याठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

लोकसभा मतदारसंघाचा विचार करता नाशिक आणि धुळे दोन जिल्ह्याचा भाग या मतदारसंघांच्या अंतर्गत येतो. तसंच बहुजन, आदिवासी, मुस्लीम अशा संमिश्र मतदारांचा प्रभाव असल्यानं या मतदारसंघाच्या निकालांकडं लक्ष लागलेलं असतं.

शिवसेनेलाही (शिंदे गट) होत्या तिकिटाच्या अपेक्षा

धुळे मतदारसंघात विद्यमान भाजपचा खासदार असला तरी याठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनंही तयारी सुरू असल्याच्या चर्चा होत्या. दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हे या मतदारसंघातून खासदारकीची तयारी करत असल्याचं सांगण्यात येत होतं.

अविष्कार भुसे यांनी मतदारसंघात प्रचंड जनसंपर्क वाढवल्याचं पाहायला मिळालं होतं. अविष्कार भुसे यांचे काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये भावी खासदार असे पोस्टर लावण्यात आले होते.

दादा भुसे

फोटो स्रोत, Dadaji Bhuse

फोटो कॅप्शन, दादा भुसे

धुळ्यातून त्यांना उमेदवारीची आशा असल्याची चर्चा होती. त्यामागं एक समीकरणही मांडलं जात होतं. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची जागा भाजपला सोडावी लागणार अशा चर्चा होत्या.

त्यामुळं नाशिकची जागा भाजपला सोडून त्या बदल्यात शिंदे यांनी धुळ्याची जागा पदरात पाडून घ्यावी, अशा प्रकारची मागणी संघटना आणि कार्यकर्त्यांकडून केली जात होती.

पण भाजपनं सुरुवातीलाच सुभाष भामरे यांचं नाव जाहीर केल्यामुळं शिंदे गटातील कार्यकर्त्यांचाही भ्रमनिरास झाला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं तिकीट न मिळाल्याची नाराजी ही प्रचार आणि मतदानातूनही झळकणार का? अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.

मतदारसंघाचा इतिहास

धुळे लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीलाच भाजप किंवा तेव्हाच्या भारतीय जनसंघाला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळवून देणारा मतदारसंघ होता. 1957 मध्ये जनसंघाचे उत्तमराव पाटील धुळ्याचे पहिले खासदार बनले होते.

पण त्यानंतर काँग्रेसनं या मतदारसंघावर वर्चस्व मिळवलं ते तीन दशकांपर्यंत कायम राहिलं. या दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये चुडामन पाटील तीन वेळा, विजयकुमार पाटील एकदा तर रेश्मा भोये या तीन वेळा खासदार बनल्या.

डॉ. सुभाष भामरे

फोटो स्रोत, Dr. Subhash Bhamre

फोटो कॅप्शन, डॉ. सुभाष भामरे

नंतरच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारांना मतदारांनी दरवेळी बदलून संधी दिली. पण 2009 नंतर मात्र मतदारसंघामधली ही परिस्थिती बदलली. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात आहे.

2009 मध्ये भाजपकडून प्रताप सोनवणे यांना इथून उमेदवारी दिली. त्यांना अंबरीश पटेलांना पराभूत करत विजय मिळवला. त्यानंतर 2014 मध्ये सुभाष भामरेंना इथून संधी मिळाली. त्यांना सलग दोन वेळा विजय मिळवत इथलं भाजपचं वर्चस्व कायम ठेवलं.

2019 मधील परिस्थिती

भाजपनं 2014 च्या निवडणुकीत संधी दिलेल्या डॉ. सुभाष भामरे यांनी अंबरीश पटेल यांच्या विरोधात सव्वालाखांपेक्षा अधिक फरकानं विजय मिळवला होता. त्यामुळं 2019 मध्येही पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिली.

निवडणुकीच्या आधीपर्यंत डॉ. भामरे यांच्याकडं संरक्षण मंत्रालयाच्या राज्य मंत्रिपदाची जबाबदारीदेखिल होती.

कुणाल रोहिदास पाटील

फोटो स्रोत, Kunal Rohidas Patil

फोटो कॅप्शन, कुणाल रोहिदास पाटील

काँग्रेसनं मात्र 2019 मध्ये उमेदवार बदलला आणि कुणाल रोहिदास पाटील यांना मैदानात उतरवलं. पण भामरेंच्या विरोधात त्यांनाही विजय मिळवता आला नाही. सुभाष भामरेंनी त्यांचा सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

2019 मध्ये झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावामुळं विरोधकांची मतं विभाजित होऊन भाजपचा मोठा विजय होणार, अशा शक्यता व्यक्त करण्यात आल्या होत्या. तसा भाजपचा मोठा विजयही झाला. पण वंचितच्या उमेदवाराला इथं 40 हजारांपेक्षा कमी मतं मिळाली. त्यामुळं त्याचा फारसा फटका न बसताही काँग्रेसला विजय मिळवता आला नाही.

मतदारसंघात गेल्या 4 वर्षांत काय घडले?

मतदारसंघाचा विचार करता याठिकाणी धुळे ग्रामीण, धुळे शहर आणि सिंदखेडा या धुळ्यातील तर मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या नाशकातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

लोकसभा निवडणूक

लोकसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या सहापैकी दोन ठिकाणी एआयएमआयएम, दोन ठिकाणी भाजप आणि प्रत्येक एका ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

शिवसेनेचे एकमेव आमदार दादा भुसे हे शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या मुलासाठी ते या मतदारसंघातून तिकीट मिळवू इच्छित होते. पण भाजपनं इथं उमेदवार दिला.

डॉ. सुभाष भामरे यांना सलग दोन टर्म उमेदवारी मिळाल्यानं भाजप यावेळी उमेदवार बदलणार अशी अनेकांना आशा होती. पण तसं झालं नाही. त्यामुळं भुसेंबरोबरच इतरही अनेक इच्छुकांच्या मनातल्या आशा मनातच राहिल्या आहेत.

निवडणुकीत कशाचा प्रभाव पडणार?

धुळे मतदारसंघात महायुतीमध्ये प्रामुख्यानं उमेदवारीच्या मुद्द्यावरून काही प्रमाणात नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात नक्कीच आहेत. शिंदे गटाचं या मतदारसंघावर लक्ष लागून होतं असं सांगितलं जात आहे.

पण भाजपमध्येही सलग दोन टर्मनंतर पुन्हा तिसऱ्यांदा भामरेंना उमेदवारी मिळाल्यानं काही प्रमाणात नाराजीचे सूर आहेत. त्याचं कारण म्हणजे भाजपमधली इतर काही नावंदेखील या जागेसाठी प्रामुख्यानं पुढं आलेली पाहायला मिळाली होती.

तसंच भामरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर दोन आठवड्यांनंतरही भेटी-गाठींच्या कार्यक्रमांशिवाय मोठे मेळावे किंवा सभा झाल्या नसल्यानंही पक्षांअंतर्गत धूसफूस असल्याच्या चर्चांना हवा मिळत आहे.

अश्विनी पाटील

फोटो स्रोत, shwini Kunal Patil

फोटो कॅप्शन, अश्विनी पाटील

दुसरीकडं महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. काँग्रेसकडं असेल्या या मतदारसंघातून उमेदवारीसाठी अश्विनी पाटील, प्रतिभा शिंदे, डॉ. तुषार शेवाळे आणि श्याम सनेर यांची नावं आहेत. पण फारशी उत्सुकता या आघाडीतही दिसून येत नाहीये.

त्याचवेळी एआयएमआयएमची या मतदारसंघातली शक्ती पाहता इथून ते उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. एमआयएमनं आधीच त्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळं काँग्रेसपाठोपाठ त्यांचा उमेदवार जाहीर केला जाऊ शकतो.

तसं झाल्यास धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप, काँग्रेस आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यात 20 मे रोजी मतदार कुणाच्या बाजूनं निर्णय देणार याकडंच सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल.