JSW समुहाच्या सज्जन जिंदल यांनी बलात्काराचा आरोप नाकारला, FIR मध्ये काय म्हटलं आहे?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published

उद्योगपती सज्जन जिंदल यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप ठेवला असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी FIR नोंदवलं आहे.

सज्जन जिंदल हे JSW ग्रुप या उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

वांद्रे कुर्ला संकुल (BKC) पोलिस स्टेशनमध्ये 13 डिसेंबर रोजी नोंदवलेल्या FIR नुसार जिंदल यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 376 (बलात्कार), कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या दृष्टीनं तिच्यावर हल्ला करणे) आणि कलम 506 (धमकी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सज्जन जिंदल यांनी मात्र आपल्यावरचे सर्व आरोप अधिकृत पत्रकाद्वारे फेटाळले आहेत.

पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2022 मध्ये BKC मध्ये JSW कंपनीच्या मुख्यालातील पेंटहाऊसमध्ये हा गुन्हा घडला.

फेब्रुवारी 2022 मध्ये या महिलेनं पोलिसांत तक्रार केली पण पोलिसांनी त्याकडे लक्ष दिलं नाही असा दावा या महिलेनं केला आहे.

त्यामुळे ही महिला कोर्टात गेली आणि कोर्टाच्या आदेशानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात FIR नोंदवलं आहे.

सज्जन जिंदल यांच्यावर काय आरोप ठेवले आहेत?

या FIR मध्ये पिडीत महिलेचा संपूर्ण जबाब नोंदवला आहे. 30 वर्षांची आणि पेशानं अभिनेत्री असलेली ही महिला मुंबईतल्या जुहूची रहिवासी आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये दुबईत एक IPL सामना पाहायला गेली असता, तिथे स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये तिची आरोपीसोबत पहिल्यांदा भेट झाली.

पीडित महिलेचा भाऊ दुबईत रियल इस्टेट सल्लागार आहे. तिनं म्हटलं आहे की “जिंदल यांना जागा विकत घ्यायची असल्यानं त्यांनी त्यांचा फोन नंबर दिला. मुंबईत आल्यावर मी 13 डिसेंबर 2021 रोजी त्यांना औपचारिक संदेश पाठवला.”

18 आणि 19 डिसेंबरला जयपूरमध्ये खासदार प्रफुल पटेल यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात दोघांची पुन्हा भेट झाली आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला.

जयपूरमधल्या भेटीत सज्जन जिंदल जवळीक दाखवू लागले, त्यानंतर ते मला ‘बेब,’ ‘बेबी’ अशा नावांनी हाका मारू लागले आणि आम्ही हॉटेलमध्ये भेटावं अशी मागणी करू लागले असा दावा या महिलेनं केला आहे.

जिंदल यांनी त्यांच्या पत्नीसोबत नात्यामध्ये समस्या असल्याचं वर्णन केलं, जे ऐकून तिला काहीसं विचित्र वाटलं. त्या पुढच्या भेटींमध्ये जिंदल यांनी आपल्या रोमँटिक भावना व्यक्त केल्या आणि ते स्वतः विवाहीत असतानाही पिडीत महिलेसोबत शारीर संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

मात्र आपण त्यास विरोध केला आणि केवळ लग्न झाल्यावरच असे संबंध ठेवू असं स्पष्ट केल्याचं तिनं सांगितलं आहे.

2022 च्या जानेवारी महिन्यात ही महिला एका मीटिंगसाठी कंपनीच्या BKC मधील मुख्यालयात गेली होती. जिंदल यांनी तिला पेंटहाऊसमध्ये नेलं आणि तिच्या विरोधाला न जुमानता बळजबरी केली, असं जबनीत नमूद केलं आहे.

पीडित महिलेचा दावा आहे की, तिनं यानंतर जिंदल यांच्याशी मैत्री कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तिला उत्तर देणं बंद केलं आणि तिचा नंबरही ब्लॉक केला. आपल्याला पोलिसात गेलीस तर परिणाम गंभीर होतील अशा स्वरुपाच्या धमक्या मिळाल्याचंही तिनं म्हटलं आहे.

अखेर 16 फेब्रुवारी 2023 रोजी या महिलेनं BKC पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला, पण कोर्टाच्या आदेशानंतर आता 13 डिसेंबर 2023 रोजी FIR दाखल झालं आहे.

जिंदल यांनी आरोप फेटाळले

सज्जन जिंदल यांच्या वतीनं 17 डिसेंबरला जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात हे आरोप 'निराधार आणि खोटे' असल्याचं म्हटलं आहे.

“या तपासात संपूर्ण सहकार्य करण्यासाठी ते कटीबद्ध आहेत. तपास अजून सुरू असल्यानं आम्ही सध्या यावर काही प्रतिक्रिया देण्याचं टाळत आहोत. कुटुंबाच्या खाजगीपणाचा आदर ठेवा अशी आमची नम्र विनंती आहे," असं या पत्रकात म्हटलं आहे.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)