बारावीचा निकाल जाहीर, मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी; 'इथे' पाहता येईल निकाल

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी
  • Published

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज म्हणजे मंगळवारी 21मे रोजी ला बारावीचा निकाल जाहीर केला आहे.

21 मे 2024 ला दुपारी एक वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला.

यंदा 93.37 टक्के इतका निकाल लागला आहे, तर पुन्हा परीक्षा देणाऱ्यांपैकी 59.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97 टक्के इतका लागला, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे 91 टक्के इतका लागला.

2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारी-मार्च मध्ये 1433371 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 1329684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राज्यातील 9 विभागीय मंडळांमधून 7932 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 6581 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बारावीच्या परीक्षेत विद्यार्थिनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 95 टक्के, तर विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 91 टक्के इतकं होतं.

या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबतच विषयानुसार गुणांचा तपशीलही या संकेतस्थळांवर पाहता येईल. तसंच, निकालाची प्रिंटही घेता येईल.

विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबरोबरच त्यासंदर्भातील इतर माहिती किंवा आकडेवारी www.mahresult.nic.in या संकेतस्थळावरून मिळवता येईल.

गुणपडताळणी आणि छायाप्रती

ऑनलाईन माध्यमातून निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात मिळवलेल्या गुणांबाबत शंका असेल तर त्यांना त्यासाठी गुणपडताळणीचा अर्जही करता येईल.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती आणि पुनर्मुल्यांकनासाठीही अर्ज करता येईल. त्यासंबंधीच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना 22 मे 2024 ते 05 जून 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी श्रेणी किंवा गुणसुधार साठी अर्ज करायचा असेल त्यांना जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 अशा दोनच संधी उपलब्ध असतील असं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यासाठी 27 मे पासून ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शिक्षण मंडळाच्या वतीनं लवकर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं पुढील सर्व प्रक्रियांसाठीही त्याची मदत होणार आहे.

असा पाहता येईल निकाल

  • निकाल मिळवण्यासाठी सर्वात आधी वर देण्यात आलेल्या बेवसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर वेबसाईटवरील 12 च्या निकालाची लिंक ओपन होईल.
  • निकालाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल.
  • परीक्षा, सीट क्रमांक, आईचे नाव अशा प्रकारची माहिती टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करावे लागले.
  • त्यानंतर तुम्हाला संबंधित परीक्षार्थ्याचा निकाल स्क्रीनवर दिले.
  • त्याबाबतचे पीडीएफ डाऊनलोड करता येईल किंवा त्याचे प्रिंटही काढता येईल.