You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद नामांतराविरोधात खासदार जलील उपोषणाला बसणार
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -
1. औरंगाबाद नामांतराविरोधात खासदार जलील उपोषणाला बसणार
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धारशिव करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला MIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे.
याविरोधात जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून 4 मार्चपासून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शनिवार, 4 मार्चपासून सकाळी 11 वाजेपासून या उपोषणाला सुरवात होईल.
याविषयी ते म्हणाले, “सरकारने आमच्या जिल्ह्याचं नाव बदललं आहे. मात्र अनेक नागरिकांना वाटत आहे की, शहराचे नाव औरंगाबादच असायला हवेत. हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. आमच्याच सरकारला या निर्णयाचा श्रेय मिळावा म्हणून, भाजप आणि शिंदे सरकराने हा निर्णय घेतला आहे.”
“हे उपोषण कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंर्तगत केले जाणार नाही. तर औरंगाबाद नावाला पसंत करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने हे उपोषण केले जाणार आहे,” असंही जलील यांनी म्हटलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
2. आता पुस्तकांमध्येच लिहिण्याची सोय, वह्यांपासून सुटका
आता पुस्तकांमध्येच वह्यांची पान देण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं घेतला आहे. इयत्ता तिसरी ते दहावीच्या पुस्तकांमध्ये हा बदल केला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची आता वह्या वापरण्याची गरजच पडणार नाही.
नव्या निर्णयानुसार, आता तिसरी ते दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तकं चार भागात विभागली जाणार आहेत. प्रत्येक धड्यामागे आणि प्रत्येक कवितेमागं एक वहीचं पान असणार आहे. यामध्ये विद्यार्थी धडा शिकत असतानाच काही नोट्स घेऊ शकणार आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना शाळेत वह्या आणण्याची गरज भासणार नाही. केवळ हे पुस्तकचं घेऊन त्यांना येता येईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल. ही बातमी ई-सकाळने दिली.
3. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा, विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता
महाराष्ट्रानंतर आता नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत.
नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीने बहुमत मिळवले आहे. 60 जागांपैकी या आघाडीने 37 जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी 25 जागांवर एनडीपीपीला आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळला आहे.
त्यानंतर खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागांवर विजय मिळाला. मागील 2018 मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही जागांवर विजय मिळवता आला नव्हता. पण यंदाच्या वेळी त्यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा केली. दुसरीकडे काँग्रेसला मात्र यंदा एकही जागा मिळवला आली नाही. ही बातमी झी न्यूजने दिली.
4. गौतमी पाटील यांच्या व्हायरल व्हीडिओची महिला आयोगाकडून दखल
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत असता लपून व्हिडीओ काढण्यात आला. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असल्याचं आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
याविषयी बोलताना चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाला याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्यातील असे व्हिडीओ व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा ही जबाबदारी सायबर सेलची आहे. सायबर शाखेने यातील गुन्हेगारांवर कडकर कारवाई करावी.”
“महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे. केवळ एका व्यक्तिचा विषय नाही, तर महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आयोगाकडे याच्या तक्रारी आल्या आहेत आणि आतापर्यंत आयोगाने प्रत्येकवेळी या तक्रारींची दखल घेतली आहे,” अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला असाच उद्ध्वस्त करू – संजय राऊत
पुण्यातील कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. येथील पराभवाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला असाच उद्धवस्त करू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
कसब्यात रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवल्यानंतर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “कसबा हा त्यांचा बालेकिल्ला आहे, असं त्यांना आतापर्यंत वाटत होतं. येथील विशिष्ट वर्गाच्या मतांवर आपलं एकतर्फी वर्चस्व आहे, असं त्यांना वाटायचं. पण पेठांमधील सगळ्यात जास्त मते महाविकास आघाडीला मिळाली.”
“आजपर्यंत भाजपसोबत शिवसेना उभी होती, म्हणून त्यांचे बालेकिल्ले भक्कम राहिले होते. आता त्यांना प्रत्येक बालेकिल्ला आम्ही उद्ध्वस्त करू,” असं राऊत म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)