You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
30 रुपयांच्या वादावरुन दोन भावांची हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलीस चकमकीत मृत्यू, नेमकं प्रकरण काय?
- Author, एहतेशाम शामी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(सूचना: या लेखात देण्यात आलेली माहिती वाचकांना विचलित करू शकते)
पाकिस्तानातील लाहोरजवळील रायविंड येथे 30 रुपयांच्या वादाहून दोन सख्ख्या भावांचा निर्घृण करण्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक केली.
आरोपींची ओळख पटवण्यासाठी नेत असताना या दोन आरोपींच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला करुन त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, दोन्ही आरोपी जे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी पोलिसांनी ओवैस आणि तैमूर या दोघांवर गोळीबार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
अवघ्या 30 पाकिस्तानी रुपयांसाठी झालेल्या दोन हत्येची चर्चा सुरू असतानाच या हत्येतील आरोपींचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे हे तुम्ही खाली वाचू शकता.
नेमकं काय घडलं?
ते हादरवून टाकणारं दृश्य होतं. काही फळांची दुकानं आहेत. तिथे आंबे, केळी विकली जात आहेत. आजूबाजूला डझनावारी लोक उभे आहेत. यांच्या जवळच रक्तानं माखलेला, लाल कुर्ता घातलेला एक व्यक्ती त्याच्या जखमी भावाचं डोकं मांडीवर घेऊन असहायपणे बसला आहे.
व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये दोन्हीजण गंभीररीत्या जखमी झालेले दिसत आहेत.
हे सुरू असतानाच आपल्या भावाला मांडीवर घेऊन बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर क्रिकेटच्या बॅटने आघात झाला.
आता राशिद आणि वाजिद नावाच्या त्या दोन भावांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील रायविंडमध्ये ही हत्या झाली. ज्या पद्धतीने ही हत्या झाली त्यातून पाहणाऱ्याला असं वाटू शकतं की अनेक वर्षांचे भांडण, कौटुंबिक कलह किंवा जुन्या शत्रुत्वातून हे झालं असावं. पण ही घटना त्यातून नव्हती झाली.
सुरुवातीला अगदी किरकोळ वाटलेल्या गोष्टीतून भांडण झालं आणि ते अगदी विकोपाला गेलं. त्यातून त्या दोन भावांची हत्या झाली.
अवघ्या तीस रुपयांमधून सुरू झालेल्या वादातून या दोन्ही भावांचा जीव गेला.
पोलीस आणि त्या कुटुंबाचं म्हणणं आहे की या दोन भावांच्या हत्येचं कारण फक्त काही मिनिटांचा वाद आणि 30 पाकिस्तानी रुपये ( भारतीय मूल्याप्रमाणे 10 रुपये ) इतकंच होतं.
राशिद आणि वाजिद यांचे वडील सईद इकबाल यांच्या तक्रारीवरून ओवैस आणि तैमूर नावाच्या दोन भावांविरोधात पाकिस्तानातील रायविंड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
एफआयआरनुसार सईद इकबाल यांनी पोलिसांना सांगितलं की राशिद आणि वाजिद ही त्यांची दोन मुलं दुधाचा व्यवसाय करत होती. 21 ऑगस्टला ते दोघेजण घरी आले.
त्यावेळेस हे दोघे भाऊ फळं विकत घेण्यासाठी थांबले होते. तिथे त्यांचं फळं विकणाऱ्या ओवैस आणि त्याचा भाऊ तैमूर यांच्याशी भांडण झालं.
'शत्रू वरही अशी वेळ येऊ नये'
सईद इकबाल यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलांवर ओवैस, तैमूर आणि त्यांच्या अज्ञात साथीदारांनी लाठ्या आणि क्रिकेट बॅटनं हल्ला केला. त्यात या दोन्ही भावांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास करणारे एसी मोअज्जम अली यांनी सांगितलं की पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास गुन्हे नियंत्रण विभागाकडे (सीसीडी) देण्यात आला आहे.
सईद इकबाल पाकिस्तानातील कोट राधा किशन भागातील रतिपिंडी गावचे रहिवासी आहेत. इकबाल यांनी सांगितलं की ही घटना घडली, तेव्हा त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या दुकानावर दूध पोहोचवून घरी परतत होते.
ते म्हणतात, "माझ्या एका मुलाचा जीव 15 रुपयांसाठी गेला. माझी दोन वाघासारखी मुलं 30 रुपयांसाठी मारली गेली. जनावरांना देखील मारलं जात नाही अशा प्रकारे त्यांनी माझ्या मुलांना मारलं."
"एक जण त्यांना क्रिकेट बॅट वारंवार मारत राहिला आणि जवळपास उभे असलेले लोक त्यांच्या मोबाइल फोननं व्हीडिओ बनवत राहिले. हा कोणत्या प्रकारचा समाज आहे? कोणीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही."
सईद इकबाल म्हणाले, "देव करो, शत्रूच्या मुलांवर देखील अशी वेळ येऊ नये."
मृत तरुणांचा भाऊ साजिद यानं या दुहेरी हत्याकांडाची माहिती देत सांगितलं की लोकांकडून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादाची सुरुवात बाचाबाचीतून झाली.
साजिदनं बीबीसीला सांगितलं, "ज्या फळांच्या स्टॉलवर वाजिद आणि राशिद केळी विकत घेण्यासाठी थांबले होते, तो ओवैसचा होता. ओवैसचा भाऊ तैमूर याचा स्टॉलदेखील जवळच होता."
साजिद म्हणाला, "ओवैसनं एक डझन केळ्यांसाठी 130 रुपये मागितले. राशिद त्याला म्हणाला की त्याच्याकडे फक्त 100 रुपये आणि पाच-पाच हजाराच्या नोटा आहेत. त्यावर ओवैस त्याला म्हणाला की त्यानं 100 रुपयांना डझनभर केळी घ्यावीत."
साजिदनं दिलेल्या माहितीनुसार, स्वस्तात केळी विकण्याची बाब तैमूरला आवडली नाही. त्यानं 'अपशब्द' वापरण्यास सुरुवात केली. त्यावर या दोन्ही भावांनी आक्षेप घेतला.
त्यानंतर याचं रूपांतर भांडणात झालं. राशिद आणि वाजिदच्य भावानं सांगितलं की जोरदार वादावादी झाल्यानंतर ओवैस आणि तैमूरनं त्या दोघांवर क्रिकेट बॅट आणि लाठ्यांनी हल्ला चढवला.
साजिद म्हणाला, "त्यावेळेस तिथे जवळपास 250 लोक होते. मात्र हे भांडण थांबवण्याची माणुसकी कोणीही दाखवली नाही."
पोलिसांनी काय सांगितलं?
बीबीसी प्रतिनिधी उमर दराज नांगियाना यांच्याशी बोलताना सदर सर्कलचे पोलीस अधीक्षक मोअज्जम अली म्हणाले की पैशांवरून वाद सुरू झाला होता.
मोअज्जम अली यांच्यानुसार, दोन्ही मृत भावांनी जेव्हा फळं विकत घेतली, तेव्हा त्यांच्याकडे एक 100 रुपयांची नोट आणि एक 5 हजार रुपयांची नोट होती.
ते म्हणाले, "फळ विक्रेत्यानं त्यांना 30 रुपये सुट्टे देण्यात सांगितलं. त्यावर हे दोघे भाऊ म्हणाले की त्यांच्याकडे सुट्टे पैसे नाहीत. ओवैस म्हणाला की मग 30 रुपयांची केळी परत करा. त्यावर या दोन्ही भावांनी अपशब्द वापरले आणि त्यातून भांडण वाढत गेलं."
मोअज्जम अली म्हणाले की दोन्ही बाजूनं शिवीगाळ सुरू झाली आणि त्याचं रूपांतर मारहाणीत झालं.
ते म्हणाले, "सुरुवातीला या दोन्ही भावांनी मिळून त्या फळ विक्रेत्याला मारहाण केली. मात्र परिस्थिती चिघळली तर जवळपासच्या विक्रेत्यांनी त्या फळ विक्रेत्याच्या भावांना बोलावून घेतलं."
"ते आले आणि त्यांच्यासोबत जवळपासचे विक्रेते देखील या मारहाणीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी या दोन्ही भावांना मारहाण केली."
पोलीस अधीक्षक मोअज्जम अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंतर आलेल्या लोकांनी या भावांना लाठ्यांनी मारहाण केली. त्यामुळे या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे या दोघांचा मृत्यू झाला.
राशिद आणि वाजिद यांना मारहाण झाल्याची माहिती कुटुंबाला कोणी दिली?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओचा संदर्भ देत मृत तरुणांच्या वडिलांनी सांगितलं, "घटनेनंतर समोर आलेल्या व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वाजिद त्याचा भाऊ राशिदचं डोकं मांडीवर घेऊन त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच वेळेस एकजण त्याच्या मोबाइलवरून फोन करण्याचा प्रयत्न करतो आहे."
सईद इकबाल म्हणाले की त्याच व्यक्तीनं त्यांच्या मुलाकडून घरचा फोन नंबर घेतला आणि आसिफ या त्यांच्या दुसऱ्या मुलाला फोन करून या घटनेची माहिती दिली.
इकबाल म्हणाले, "मला या घटनेची माहिती मिळताच, मी दुकान उघडं टाकून मोटरसायकलनं तिथे पोहोचलो. थोड्याच वेळात आमचे इतर नातेवाईकदेखील तिथे पोहोचले."
सईद इकबाल यांनी सांगितलं की ते त्यांच्या मुलांना रुग्णवाहिकेतून रायविंडच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना लाहौरच्या जनरल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा.
इकबाल म्हणतात, "लोक सांगतात की राशिदचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर दुसरा मुलगा वाजिदचा जीव मात्र नक्की वाचवता आला असता. वेळीच उपचार न मिळाल्यानं आणि एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात वेळ गेल्यानं त्याचा मृत्यू झाला."
पोलिसांना देखील वाटतं की दोन्ही भावांवर प्रथमोपचार करण्यात उशीर झाला.
'लिटल मॅक्सवेल'
मृतांचा भाऊ साजिद त्याच्या भावांची आठवण करत सांगतो की वाजिद त्याच्यापेक्षा लहान होता आणि सर्वांचा लाडका होता.
साजिद म्हणतो, "वाजिद एक क्रिकेटपटू होता आणि तो अनेक क्रिकेट क्लबसाठी खेळायचा. लोक त्याला स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी बोलवायचे. ते त्याला 10,000-15,000 रुपयेदेखील द्यायचे."
साजिद म्हणतो की त्याच्या भावाच्या खेळण्याची शैली ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याच्यासारखी होती. त्यामुळेच लोक त्याला 'लिटल मॅक्सवेल' म्हणायचे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.