बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख

फोटो स्रोत, TWITTER/@RRRMOVIE
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. ऑस्कर नॉमिनेशनपासून ते पुरस्कार जिंकण्यापर्यंतची प्रक्रिया नेमकी कशी असते?
ऑस्कर हा जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कारांपैकी एक आहे. भारतीय चित्रपटांचंही ऑस्कर मिळवण्याचं स्वप्न फार पूर्वीपासून राहिलेलं आहे. 1958 पासून ते आजतागायत हे स्वप्न अद्याप स्वप्नच राहिलं.
त्यामुळेच यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळाल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
पण, ऑस्कर पुरस्कार मिळण्याची प्रक्रिया नेमकी काय असते, तुम्हाला माहीत आहे का? या प्रक्रियेबाबत लोकांमध्ये अनेक मतमतांतरं असल्याचंही पाहायला मिळतं.
चला तर मग जाणून घेऊ ऑस्कर पुरस्कारासाठीची कॅम्पेनिंग आणि लॉबिंग तसंच इतर संबंधित गोष्टींची प्रक्रिया नेमकी कशी असते.
2. गौतम अदानींनी फेटाळले घोटाळ्याचे आरोप, हिंडनबर्गविरोधात कायदेशीर कारवाईचा मानस
न्यूयॉर्क स्थित 'हिंडनबर्ग रिसर्च' नावाच्या एका गुंतवणूक विश्लेषण संस्थेने आरोप एका अहवालातून केले होते की अदानी समूहाने शेअर बाजारात “बेदरकारपणे” घोटाळा केला आहे.
अदानी समूहाने हे आरोप फेटाळात या अहवालाला “वाईट हेतूने” पसरवलेली “निवडक चुकीची माहिती” म्हटलं आहे.
हा अहवाल बाहेर आल्यानंतर बुधवारी या समूहाचं बाजारातील मूल्य तब्बल 11 अब्ज डॉलर्सने घसरलं. आता अदानी समूह हिंडनबर्ग रिसर्च विरोधात कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे.
3. गुगल भारतासाठी ऍन्ड्रॉईड सिस्टिममध्ये करणार मोठे बदल, कारण...
भारतीय सुप्रीम कोर्टातली केस हारल्यानंतर गुगलने भारतात पुरवल्या जाणाऱ्या त्यांच्या ऍन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम सेवेत बदल करत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता ऍन्ड्रॉईड फोन वापरकर्त्यांना त्यांचं डिफॉल्ट सर्च इंजिन त्यांच्या मर्जीने ठरवता येणार आहे.
काही दिवासांपूर्वीच भारतीय स्पर्धा आयोगाने म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) गुगलला 161 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे. गुगलने भारतीय बाजारात असलेल्या त्यांच्या स्थानाचा दुरूपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांना हा दंड ठोठावण्यात आला होता. ज्याला गुगलने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
पण भारतीय सुप्रीम कोर्टानं CCIचा निर्णय कायम ठेवलाय. गुगलने अयोग्य व्यापार धोरण राबवत वापरकर्त्यांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भारतातले जवळपास 97 स्मार्टफोन गुगलच्या ऍन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात.
4. तुमच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी झालंय, हे कसं ओळखाल?
तुम्हाला सतत थकवा येतो का? श्वास घेण्यात अडथळा येतो का, सारखी धाप लागते का?
तुमची त्वचा निस्तेज झाली आहे असं तुमचे मित्र तुम्हाला सांगतात का?
असं असेल तर तुमच्या रक्तामध्ये लोहाचं प्रमाण कमी झालं असण्याची शक्यता आहे.
लोहाचं प्रमाण कमी असणं ही जगभरात पोषणाच्या संदर्भातली एक समस्याच झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरातील 30 टक्के लोकांना अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय झालेला आहे.
5. महिला आयपीएल संघांची घोषणा, या पाच शहरांना मिळाला मान
महिला आयपीएल स्पर्धेत मुंबई, दिल्ली, लखनौ, बंगळुरू आणि अहमदाबाद हे पाच संघ असणार आहेत. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.
अदानी स्पोर्ट्सलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 1289 कोटी रुपये खर्चून अहमदाबाद संघाची मालकी मिळवली. मुंबई संघाचं मालकत्व इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे असणार आहे. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेतील मुंबई संघाची मालकी याच कंपनीकडे आहे.
बंगळुरुस्थित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएलमधील पुरुष संघांच्या फ्रँचाइज कंपनीनेच महिला संघासाठी आवेदन जिंकलं. त्यांनी या संघासाठी 901 कोटी रुपये खर्च केले.
दिल्ली संघांची मालकी जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे असणार आहे. 810 कोटी रुपयांच्या आवेदनासह त्यांनी संघाचं मालकत्व मिळवलं.
लखनौ संघ काप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडकडे असणार आहे. 757 कोटी रुपये खर्चून त्यांनी हक्क मिळवले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























