आठवड्याचे फक्त 4 दिवस काम करण्याची पद्धत काय आहे, संशोधनातून समोर आले अनेक फायदे

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सोफिया बेटिजा
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
आठवड्याचे 5 दिवस काम करा आणि वीकेंडला धमाल करा - मग पुन्हा कामावर जायच्या चिंतेसाठी स्वत:ला तयार करा. मात्र हे जर असं नसतं तर?
नेचर ह्युमन बिहेवियर या जर्नलमध्ये एक महत्त्वाचा अभ्यास प्रकाशित झाला आहे. अशा प्रकारचा हा सर्वात मोठा अभ्यास आहे. त्यात आढळून आलं आहे की, आठवड्यातून जर 4 दिवस काम केलं, तर लोकांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होते.
बोस्टन कॉलेजमधील संशोधकांनी यासाठी अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड आणि न्यूझीलंड या देशांमधील 141 कंपन्यांमधील चार इंडिकेटर किंवा निर्देशांकांचा आढावा घेतला. ते म्हणजे कामातून येणारा थकवा, कामातील समाधान, शारीरिक आणि मानसिक आरोग्य.
"आम्हाला कर्मचाऱ्यांच्या आरोग्यात मोठी सुधारणा आढळली," असं हा अभ्यास करणाऱ्या टीममधील प्रमुख वेन फॅन यांनी बीबीसीला सांगितलं.
"त्याचबरोबर कंपन्यांच्या उत्पादकतेत आणि उत्पन्नात देखील यामुळे वाढ झाल्याचं दिसून आलं. आता ही चाचणी संपली असली, तरी त्या अभ्यासात सहभागी झालेल्या 90 टक्के लोकांनी आठवड्याचे 4 दिवस काम करण्याचंच ठरवलं आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.
आठवड्यातील कामाचे दिवस कमी केल्यावर चांगलं राहणारं आरोग्य, वर्क-लाईफ बॅलन्स आणि एकूणच आयुष्याबद्दलचं वाढलेलं समाधान याचा संबंध दाखवणाऱ्या या संशोधनामुळे अभ्यासात भर पडली आहे.
अलीकडेच एका अभ्यासात आढळलं आहे की, जास्त तास काम केल्यामुळे मेंदूच्या रचनेत बदल होऊ शकतो. त्यानंतर हा आठवड्याचे 4 दिवस काम केल्यावर होणाऱ्या फायद्यांवरील अभ्यास समोर आला आहे.
मग जर याचे आरोग्याला होणारे फायदे इतके स्पष्ट असतील, तर त्याची अंमलबजावणी का होत नाही हा प्रश्न आहे.
जास्त काम करण्याची संस्कृती
चीन त्यांच्या कामाच्या '996' या पॅटर्नसाठी ओळखला जातो. यात कर्मचारी, आठवड्याचे 6 दिवस, सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत काम करतात.
भारतात कर्मचाऱ्यांना जोमानं वाढलेल्या तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रात, जागतिक स्तरावरील मागण्या पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ आणि अनियमित तास काम करण्यासाठीच्या सततच्या दबावाला तोंड द्यावं लागतं.
"चीन, भारत, अमेरिका आणि यूकेसारख्या देशांमध्ये जास्त वेळ काम करणं ही सन्मानाची बाब मानली जाते," असं प्राध्यापक फॅन म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
जपानची तर गोष्टच वेगळी आहे. जपानमध्ये ओव्हरटाईम म्हणजे अतिरिक्त काम करण्यासाठी पैसे न मिळणं ही सामान्य गोष्ट आहे. जपानमध्ये जास्त काम केल्यानं होणाऱ्या मृत्यूंसाठी एक शब्ददेखील आहे, तो म्हणजे कारोशी.
"जपानमध्ये कामाकडे फक्त काम म्हणून पाहिलं जात नाही. तो एक सामाजिक विधी आहे," असं हिरोशी ओनो म्हणतात. ते जपानमधील मनुष्यबळ आणि कार्य संस्कृतीचे तज्ज्ञ आहेत.
"लोक ऑफिसमध्ये लवकर येतात आणि खरोखर काही काम नसलं तरीदेखील उशीरापर्यंत थांबतात. फक्त कामासाठीची कटिबद्धता दाखवण्यासाठी ते असं करतात. लोक त्याची नोंद घेतात. मार्शल आर्ट्सप्रमाणे ते करण्याचा एक मार्ग आहे," असं हिरोशी ओनो पुढे म्हणतात.
जपानची वैयक्तिक इच्छांपेक्षा समाजाला महत्त्वं देण्याची सामूहिक संस्कृती या प्रकारच्या कार्यसंस्कृतीला चालना देत असल्याचं ते सांगतात.
"एखाद्या व्यक्तीनं कोणतंही योगदान न देता मोफत एखाद्या सेवेचा लाभ घेण्याला (फ्री रायडर्स) जपानमध्ये लज्जास्पद मानलं जातं. जर एखाद्या व्यक्तीनं शुक्रवारी सुट्टी घेण्यास सुरूवात केली, तर इतर विचार करतात की, त्यांना आज काम का सोडावं लागलं?"
जपानमध्ये पितृत्वाची रजा घेण्याचे कायदेशीर फायदे देखील बहुतांशवेळा वापरले जात नाहीत.
"पुरुष एक वर्षापर्यंत सुट्टी घेऊ शकतात. मात्र फार थोडेजण ती घेतात. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास होऊ द्यायचा नसतो," असं ओनो म्हणतात.
तरीदेखील प्राध्यापक वेन फॅन यांना वाटतं की, या चाचण्यांमुळे कामासंदर्भातील धारणा बदलू लागल्या आहेत. अगदी जिथे जास्त काम करण्याच्या परंपरा अगदी कठोर आहेत तिथेही.

फोटो स्रोत, Getty Images
आइसलँडमध्ये जवळपास 90 टक्के लोक आता कमी तास काम करतात किंवा आठवड्यातील कामाचे दिवस कमी करण्याचा अधिकार त्यांना आहे.
कामाचे दिवस कमी करण्यासंदर्भातील चाचण्या झाल्या आहेत किंवा दक्षिण आफ्रिका, ब्राझील, फ्रान्स, स्पेन, द डॉमिनियन रिपब्लिक, बोत्सवाना यांच्यासह अनेक देशांमध्ये सुरू आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला, जपानमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याचे चार दिवस काम करण्याची पद्धत लागू करण्याची सुरुवात झाली. दुबईमध्ये अलीकडेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असाच उन्हाळी उपक्रम सुरू करण्यात आला.
दरम्यान, ऑक्टोबर 2025 पासून दक्षिण कोरियामधील 67 कंपन्यांमध्ये आठवड्यातून 4.5 दिवस काम करण्याची चाचणी घेण्यात येईल.
कामाचा आयुष्याशी ताळमेळ नाही
कोरोनाच्या संकटापासून अधिकाधिक लोकांना वाटतं आहे की, त्यांचं काम आणि आयुष्याचा एकमेकांशी ताळमेळ नाही.
"तुम्ही हा ट्रेंड उलटा करू शकत नाही," असं केरेन लोव म्हणतात, त्या 4 डे वीक ग्लोबलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
त्यांची कंपनी, ब्राझीलपासून ते नामिबिया ते जर्मनीपर्यंत जगभरातील कंपन्यांना आठवड्यातून 4 दिवस काम करण्याच्या मॉडेलची चाचणी घेण्यास मदत करते.
त्यांच्या या कामातील यशाचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कोलोरॅडोमधील गोल्डन शहरातील 250 कर्मचारी असलेला पोलीस विभाग.
आठवड्यातून 4 दिवस काम करण्याची पद्धत सुरू केल्यापासून तिथला ओव्हरटाईमवरील खर्च जवळपास 80 टक्क्यांनी घटला आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याची संख्या निम्मी झाली.
"जर गस्त घालणाऱ्या, आपत्कालीन स्थितीला हाताळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत कामाची ही पद्धत उपयुक्त ठरू शकत असेल, तर ती पद्धत सर्वत्र काम करू शकते," असं लोव म्हणतात.
त्या पुढे म्हणतात, "2019 मध्ये आम्ही जेव्हा पहिली चाचणी केली होती, तेव्हा फक्त काही मोजक्या कंपन्यांनीच यात रस दाखवला होता. आता हजारो कंपन्या ही चाचणी करू इच्छितात."
"कामाची ही पद्धत फायदेशीर असल्याचे पुरावे समोर आहेत. यात नसलेला घटक म्हणजे समजूतदारपणा."

फोटो स्रोत, Getty Images
लोव म्हणतात की, आठवड्यातील कामाचे दिवस कमी केले म्हणजे उत्पादकतादेखील कमी होते, हा एक सर्रास आढळणारा गैरसमज आहे. किंबहुना वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे.
2019 मध्ये जपानमधील मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयात आठवड्यातून 4 दिवस काम करण्याची चाचणी घेण्यात आली. त्यात, आधीच्या वर्षाच्या तुलनेत प्रति कर्मचारी झालेल्या विक्रीत 40 टक्के वाढ आढळून आली. मात्र कंपनीनं ही कार्यसंस्कृती कायमची लागू न करण्याचा निर्णय घेतला.
लोव म्हणतात की, मोठ्या कंपन्यांमध्ये अधिक गुंतागुंत असते. कारण त्यांचे वेगवेगळे विभाग असतात, त्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये काम करत असतात.
प्राध्यापक फॅन यांच्या अभ्यासात, कंपन्यांनी कमी महत्त्वाची कामं कमी केल्यामुळे उत्पादकता मोठ्या प्रमाणात राखली गेली. अनावश्यक बैठकांची जागा फोन कॉल किंवा संदेशांनी घेतली.
आठवड्यातून कमी दिवस काम करण्याबाबत असलेला आणखी एक गैरसमज म्हणजे, कमी झालेल्या एक दिवसाच्या कामाच्या भरपाई करण्यासाठी त्यांना अधिक मेहनत करावी लागेल.
"यातील महत्त्वाचा मुद्दा, 5 दिवसांऐवजी 4 दिवस काम करणं हा नसून अनावश्यक बाबी कमी करणं हा आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक कामांमध्ये ऑटोमेशन होत असल्यामुळे, आपण त्या अकार्यक्षमता आपल्याला अधिक सहजपणे लक्षात येऊ शकतात", असं त्या म्हणाल्या.
आरोग्याचा मुद्दा प्रभावी ठरतो
चार्ल डेविड्स केप टाऊनमधील स्टेलेनबॉश विद्यापीठात समुपदेशन केंद्राचे संचालक आहेत. त्यांच्यासाठी आठवड्यातून 4 दिवस काम करणं हा फक्त कामाच्या ठिकाणी झालेला बदल नव्हता, तर एक लाईफलाईन होती.
त्यांची टीम 30,000 हून अधिक विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यासाठी मदत करते. कार्यसंस्कृतीत हा बदल होण्याआधी कर्मचाऱ्यांची प्रचंड दमछाक होत होती.
"कर्मचारी गैरहजर राहण्याचं प्रमाण खूप जास्त होतं. लोक सतत आजारी असल्याचं सांगत होते. ते आळशी होते म्हणून नाही, तर ते कसंतरी आयुष्य ढकलत होते म्हणून. ते अतिशय थकले होते," असं ते सांगतात.
जगात सर्वाधिक मानसिक तणाव किंवा मानसिक समस्या असलेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिकेची गणना होते.

फोटो स्रोत, Getty Images
चार्ल यांची 56 कर्मचाऱ्यांची टीम आहे. सततचा तणाव, रुग्णांची अधिक संख्या आणि त्या तुलनेत संसाधनांची कमतरता यामुळे त्यांची टीम भावनिकदृष्ट्या खचली होती.
त्यामुळेच त्यांनी आठवड्यातून 4 दिवस काम करण्याची पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला त्यांच्या वरिष्ठांचा विरोध होता. तसंच त्यांच्या स्वत:च्या टीममध्येदेखील याविषयी शंका होती. मात्र तरीदेखील त्याला न जुमानता त्यांनी हा बदल करण्याचं ठरवलं.
"त्यांना वाटलं होतं की, ही कार्यसंस्कृती यशस्वी ठरणार नाही. मात्र ती यशस्वी ठरली आणि त्याचे परिणाम अभूतपूर्व होते," असं ते म्हणतात.
चाचणी घेण्याच्या आधीच्या वर्षात, त्यांच्या टीमनं आजारपणासाठीच्या 51 सुट्ट्या नोंदवल्या. आठवड्यातून 4 दिवस काम करण्याची चाचणी होत असतानाच्या 6 महिन्यांच्या कालावधीत त्या कमी होऊन फक्त 4 वर आल्या.
"चांगली झोप, अधिक व्यायाम आणि छंद जोपासण्याची संधी मिळाल्याचं त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. वीकेंडला कामात गुंतण्याऐवजी त्यांनी तो कुटुंबासोबत घालवला," असं चार्ल म्हणतात.
ते पुढे म्हणतात, "मला वाटलं होतं की, त्यांच्यातील बहुतांश जण, जो अतिरिक्त वेळ मिळेल तो जास्त पैसे कमावण्यासाठी वापरतील. मात्र त्यांच्यापैकी फक्त एकानंच तसं केलं."
चार्ल यांना वाटतं की, त्यांच्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य सुधारल्यामुळे त्यांच्या कामातदेखील सुधारणा झाली.
"ते कामावर अधिक लक्ष केंद्रीत करत होते, अधिक उत्साही होते. त्याचा परिणाम होत ते विद्यार्थ्यांची अधिक चांगली काळजी घेत होते," असं ते म्हणतात.
सर्वांसाठी एकच उपाय नाही
तरीदेखील या प्रकारचा बदल सर्वत्र होणं शक्य नाही.
"त्या देशातील औद्योगिक रचना आणि ते विकासाच्या कोणत्या टप्प्यावर आहेत, ते महत्त्वाचं ठरतं," असं प्राध्यापक वेन फॅन म्हणतात.
"आफ्रिकेत, अनेक कामगार कृषी, खाणकाम आणि असंघटित क्षेत्रात काम करतात. कामातील लवचिकता या मुद्द्यासंदर्भातील चर्चा त्यांच्या जवळपास देखील नाही," असं केरेन लोव म्हणतात.
"कमी कुशल, ऑटोमेशन नसलेल्या क्षेत्रात माणसांकडून केल्या जाणाऱ्या कामांची किंवा नोकऱ्यांची पुनर्रचना करणं कठीण असतं. तसंच अशा क्षेत्रातील कंपनीचे मालक, व्यवसायांचे मालक कार्यसंस्कृतीत बदल करण्याऐवजी जास्तीत जास्त नफा कमावण्याचा प्रयत्न करतात," असं लोव म्हणतात.
मात्र कार्यसंस्कृतीत बदल होण्यासंदर्भात थोडी प्रगती होते आहे.
प्राध्यापक फॅन यांच्या अभ्यासात, बांधकाम, मॅन्युफॅक्चरिंग आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता. त्यातील काही कंपन्यांनी कार्यसंस्कृतीत बदल केल्यामुळे फायदा झाल्याचं नोंदवलं.
"हे सर्व क्षेत्रांमध्ये फायदेशीर ठरू शकतं. मात्र आठवड्यातून 4 दिवस काम करण्याला एक अचूक उपाय म्हणून मला सादर करायचं नाही. सर्वांसाठी हा एकच उपाय ठरू शकत नाही," असं त्या म्हणतात.
तरुण पिढ्या घडवत आहेत बदल
तरुण पिढी ही कार्यसंस्कृतीतील बदलामागील सर्वात मोठी शक्ती असेल, यावर तज्ज्ञांमध्ये एकमत आहे.
2025 च्या एका जागतिक सर्वेक्षणात आढळलं की, काम आणि आयुष्यातील ताळमेळ हा घटक पहिल्यांदाच पगारापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरला आहे.
दक्षिण कोरियात अनेक तरुण कामगार म्हणतात की, आठवड्यातून कमी दिवस काम करण्यासाठी ते पगारातील कपात स्वीकारतील.
"तरुण पिढ्या याबाबतीत करत असलेला प्रतिकार वाढत असल्याचं आम्हाला दिसतं आहे. काम का करायचं आणि आयुष्याकडून काय हवं आहे, याबद्दलच्या त्यांच्या कल्पना मूलभूतपणे वेगळ्या आहेत," असं प्राध्यापक फॅन म्हणतात.
त्या म्हणतात की, ग्रेट रेझिग्नेशन (कोरोनाच्या संकटानंतर झालेले सामूहिक राजीनामे), क्वायट क्विटिंग (कामाच्या ठिकाणी आवश्यक आहे तेच करणं) आणि चीनमधील 'लाईंग फ्लॅट' (जास्त काम करण्याची संस्कृती नाकारणं) यासारख्या चळवळींमधून दिसतं की, तरुण कामगार त्यांचा असंतोष मांडण्याचे आणि अति काम करण्याची संस्कृती नाकारण्याचे मार्ग शोधत आहेत.
कालांतरानं, या बदलांमुळे कामाच्या ठिकाणी असलेल्या नियमांची नव्यानं रचना होऊ शकते.
जपानमध्ये, हिरोशी ओनो यांना आधीच काही बदल होताना दिसत आहेत.
"30 टक्के जपानी पुरुष आता पितृत्वाची रजा घेत आहेत. पूर्वी हे प्रमाण जवळपास शून्य होतं. त्यातून दिसतं की, लोक आता त्यांच्या आरोग्याला, आयुष्य जगण्याला अधिक प्राधान्य देत आहेत," असं ते म्हणतात.
केरेन लोवदेखील याच्याशी सहमत आहेत. त्या म्हणतात, "पहिल्यांदाच, कर्मचारी खरोखरच प्रतिकार करू लागले आहेत. कर्मचारी जितके तरुण असतील तितकेच ते बदलाची अधिक मागणी करत आहेत."
त्यांना वाटतं की, या बदलांना गती मिळते आहे.
"कोरोनाचं संकट हे या बदलांची नांदी ठरलं. तिथून याची सुरुवात झाली. मला आशा आहे की, यातील पुढचा टप्पा आठवड्यातून 4 दिवस काम करण्याचा असेल," असं केरेन लोव म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























