हात जळला तरी वास आल्याशिवाय या महिलेला कळत नाही..

फोटो स्रोत, mean pa
‘मर्द को दर्द नही होता’ अशी डायलॉगबाजी हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिली असेल. याच नावाचा एक चित्रपटही मध्यंतरी आला होता.
या चित्रपटातील नायकाला एका आजारामुळे वेदनांची जाणीव होत नाही, असा या चित्रपटाचा आशय आहे. वेदना न जाणवणारा नायक कशा प्रकारे या गोष्टींचा सामना करतो, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.
चित्रपटातील फिल्मी गोष्टी वगळल्या तर हा चित्रपट अंगुलीनिर्देश करतो ते ‘वेदनाशामक’ शारीरिक स्थितीकडे.
एका बाजूला, साधी सुई टोचली तरी विव्हळणारे कित्येक जण आपण पाहतो. मग वेदनाच न जाणवण्याची ही स्थिती कुणामध्ये असू शकते का? या स्थितीसोबत खरोखर कुणी जगत आहे का? तर याचं उत्तर हो, असंच आहे.
लंडनमध्ये राहणाऱ्या जो कॅमेरून नामक महिलेच्या बाबतीत ही गोष्ट लागू होते. शरीरातील विशिष्ट स्थितीमुळे जो यांना कोणत्याही प्रकारच्या वेदनांची जाणीवच होत नाही.
अशाप्रकारे वेदना न होणारी जो ही जगातील एकमेव महिला आहे, असं संशोधकांचं मत आहे.
कहर म्हणजे, जो यांचा हात जळाला तरी त्याचा वास आल्याशिवाय त्यांना ते समजत नाही, अशी स्थिती त्यांच्या बाबतीत आहे.

फोटो स्रोत, JO CAMERON
जो यांच्या शरीरातील दोन प्रकारच्या जनुकीय बदलांमुळे त्या कोणत्याही वेदना त्यांना जाणवत नाहीत, असं डॉक्टर सांगतात.
कॅमेरून यांच्या हातावर 2013 मध्ये एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी त्या 65 वर्षांच्या होत्या. तेव्हापासूनच त्यांच्या हातावर तज्ज्ञ संशोधकांकडून संशोधन सुरू आहे.
याविषयी बोलताना जो कॅमेरून सांगतात, “संधीवातामुळे माझ्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर मी भूलतज्ज्ञांशी बोलले. माझी शस्त्रक्रिया अत्यंत वेदनादायी होती. शस्त्रक्रियेच्या काही दिवसांनंतर या वेदना हळूहळू नाहीशा होतील, असं मला सांगण्यात आलं होतं.”
“पण मी म्हटलं आता मला कोणत्याच प्रकारच्या वेदना होत नाहीत. तेव्हा डॉक्टर म्हणाले, तू कोणत्याच वेदनाशामक गोळ्या खात नाही, तरीही वेदना होत नाहीत. ही सर्वसामान्य बाब नाही,” जो कॅमेरून पुढे सांगतात.
यानंतर भूलतज्ज्ञांनी माझी शिफारस युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (UCL) याठिकाणी केली.
येथील डॉक्टरांच्या पथकाने माझ्या पेशींचे तसेच रक्ताचे नमुने घेतले. माझ्या DNA चीही चाचणी करण्यात आली.
फा-आऊट जीन म्यूटेशन
अभ्यासानंतर जो कॅमेरून यांच्यात फा-आऊट जीन म्यूटेशन असल्याचं डॉक्टरांना आढळून आलं.
फा-आऊट जीन म्हणजे पेशींच्या एका समूहात निर्माण झालेली स्थिती होय. प्रजनन, वय वाढणं किंवा आजारपण यांच्यात या जनुकांची काय भूमिका असते, याबाबत संशोधन सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधकांच्या मते, या जनुकांच्या मदतीने वेदनेची जाणीव होण्याचं कार्य केलं जातं. पण यामध्ये काही बिघाड झाल्यास त्यांची जाणीव होणं बंद होतं.
शिवाय, या बदलांमुळे जो यांच्या शरीरात एन्झाईम तयार होण्याचं प्रमाणही कमी झालं.
अविश्वसनीय प्रकार
म्हणजेच, जो कॅमेरून यांच्या शरीरातील एन्झाईम योग्य पद्धतीने काम करत नसल्याचंही डॉक्टरांना दिसून आलं.
एन्झाईम हे जिवंत पेशींमार्फत तयार केले जातात. हे प्रोटीनयुक्त असतात. शरीरात विविध प्रकारचे स्त्राव स्त्रवले जाण्याचं एकत्रित कार्य यादरम्यान केलं जातं. आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेले संप्रेरक बनवण्याची क्रिया यादरम्यान होते.
कॅमेरून यांना वेदनेची जाणीव न होण्यामागे दोन बदल कारणीभूत असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्यातील पेशी या कोणतीही जखम 20 ते 30 टक्के अधिक वेगाने भरून काढतात. हा एक अविश्वसनीय प्रकार आहे. त्यांची प्रकृती सुधारणं हा त्याचाच एक पुरावा आहे, असं UCL येथील सहायक प्राध्यापक अँन्ड्रे ओकोराकोव्ह यांना वाटतं.
न्यूरोलॉजी संदर्भात काम करणाऱ्या ब्रेन या नियतकालिकेत ते सातत्याने माहितीपूर्ण लिखाण करत असतात.
ओकोराकोव्ह सांगतात, “या बदलामुळे वेदनेची जाणीव देणाऱ्या पेशी निष्क्रिय होतात. त्यामुळे वेदना होत असल्या तरी त्या जाणवत नाहीत. अशा प्रकारचे दोन म्यूटेशन असलेला दुसरा व्यक्ती या जगात माझ्या पाहण्यात तरी नाही.”
वेदनांची जाणीव न होणं चांगलं की वाईट?
आपल्या दैनंदिन जीवनात वेदना होणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. वेदनांची जाणीव न होणं हे अत्यंत धोकादायक आणि जीवघेणं ठरू शकतं. याचे परिणामही अतिशय गंभीर असू शकतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे जो कॅमेरून यांचा हात जळाला तरी ते त्यांच्या लक्षात येत नाही. हात जळून कातडी जळाल्याचा वास आल्याशिवाय त्यांना समजतच नाही.
कॅमेरून यांच्या शरीरात अशा प्रकारे काही बदल होत असतील, तर त्यांना त्याची जाणीव नसते. त्यांनी आजवर कधीच वेदनाशामन गोळ्या खाल्लेल्या नाहीत.
UCL येथील जनुकीय विभागात कार्यरत असलेले प्रा. जेम्स कॉक्स म्हणतात. आम्ही अशा प्रकारची स्थिती इतर कुठल्या रुग्णात आहे का, याचा शोध घेत आहोत. वेदनांची जाणीव न होणं हे खूप गंभीर आहे. वेदनेची जाणीव झाल्यास ते थांबवण्यासाठी प्रयत्न करता येतात. अन्यथा अतिवेदनेमुळे शरीरावर होणारे परिणाम हे बऱ्याच काळानंतर दिसतात. तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे वेदना जाणवणं हे कोणत्याही माणसाठी चांगलंच आहे.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























