श्रद्धा वालकर सारखं आणखी एक प्रकरण उजेडात.. मायलेकाने बापाचे केले तुकडे

Published

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि सावत्र मुलाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की, पत्नीने आणि सावत्र मुलाने अंजनदास नामक व्यक्तीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

या हत्याकांडाची तुलना दिल्लीतील मेहरौली मध्ये झालेल्या श्रद्धा हत्याकांडाशी करण्यात येत आहे. श्रद्धा तिच्या लिव्ह इन पार्टनर आफताब बरोबर राहत होती.

आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी हे तुकडे फेकून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचचे डीसीपी अमित गोयल यांनी सांगितलं की, "पाच जूनला दिल्लीच्या रामलीला मैदानात एका व्यक्तीच्या मृतदेहाचे काही भाग सापडले होते.

यानंतर सलग तीन दिवस हा क्रम चालू होता. कधी दोन पाय, कधी दोन मांड्या तर नंतर  हाताचा काही भाग सापडला.

यासंदर्भात एक एफआयआरही नोंदवण्यात आली. "या मृतदेहाची ओळख पटवणं सुरुवातीला खूप कठीण होतं. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले पण मृताची ओळख काही पटली नाही. यासाठी आमच्या सगळ्या टीम कामाला लागल्या होत्या, आणि सरतेशेवटी नवी दिल्ली रेंजच्या टीमला या प्रकरणात यश मिळालं," पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "टीमने वेगवेगळे व्हिडीओ पाहिले तांत्रिक विश्लेषण केलं, घरोघरी जाऊन माहिती घेतली. सुरुवातीला त्यांच्या हाती काहीच येत नव्हतं. पण शेवटी काही पुराव्यांच्या आधारे हा मृतदेह अंजन दास यांचा असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला.

जेव्हा टीमने अंजनदास यांच्या घरी जाऊन चौकशी केली तेव्हा ते पाच महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं समजलं. एवढं असूनही त्यांच्या घरच्यांनी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची नोंद केली नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला."

डीसीपी सांगतात त्याप्रमाणे, "या सगळ्या प्रकरणात आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो की अंजनदासची पत्नी पूनम आणि मुलगा दीपक या प्रकरणात आरोपी आहेत. कारण आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यात ते दोघेही दिसत होते. त्यानंतर चौकशीअंती त्यांनी आपला गुन्हा कबूल केला."

दिल्ली पोलिसांना पुरावे सापडले

हत्येदरम्यान जे कपडे वापरले होते ते आमच्या हाती लागल्याचं दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं.

अमित गोयल म्हणाले की, "सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचे जे कपडे दिसतायत तेच कपडे आमच्या हाती लागले आहेत. त्यासोबतच अंजनदास यांचा फोनही जप्त करण्यात आला आहे."

मृत अंजनदास हे 2011 सालापासून या महिलेसोबत राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

गोयल यांनी पुढे सांगितलं की, "अंजनदास आणि या महिलेचा विवाह 2017 मध्ये झाला होता. त्याआधी या महिलेचा विवाह कल्लू नामक तरुणाशी झाला होता, मात्र 2016 मध्ये त्याचा मृत्यू झाला. अटक करण्यात आलेला दीपक हा कल्लूचा मुलगा आहे. दीपकचं लग्न झाल्यापासून तो वेगळा राहत होता."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "अंजन दासचं बिहारमध्येही एक लग्न झालं होतं. त्याने पुनमचे दागिने विकून त्याच्या घरी पैसे पाठवले होते. हा मृत व्यक्ती पैसे कमावत नव्हता, आणि पैशांसाठी पुनमवर अवलंबून होता. पुनमला असं वाटत होतं त्याची दीपकच्या बायकोवर वाईट नजर होती.

"याच कारणावरून दीपक आणि पुनममध्ये त्याच्या खुनाचा कट शिजला. त्यांनी अंजनदासला दारू पाजली होती," पोलिसांनी सांगितले.

हेही पाहिलंत का?