सत्यजित तांबे म्हणतात, ‘जेव्हा सत्य सांगेन, तेव्हा चकित व्हाल’

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1) सत्यजित तांबे म्हणतात, ‘जेव्हा सत्य सांगेन, तेव्हा चकित व्हाल’
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये गोंधळ झाला आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे अपक्ष रिंगणात उतरले. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईसाठी पावलंही उचलली गेली.
काँग्रेसचा अंतर्गत गोंधळ नेमका का झाला, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र, यावर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, “नाना पटोले जे सांगत आहेत त्याविषयी आम्ही लवकर सविस्तरपणे राजकीय भूमिका मांडू. नाना पटोले जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. जेव्हा मी सत्य मांडेन तेव्हा सगळेच चकित होऊन जातील.”
“मी काँग्रेसचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. गेल्या 22 वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आलो आहे. आमच्या परिवाराला 2030 साली काँग्रेस पक्षात 100 वर्षे पूर्ण होतील. आम्ही काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागितली होती. मात्र, एबी फॉर्म न मिळाल्यामुळे माझी उमेदवारी अपक्ष झाली आहे,” असे सत्यजित तांबे यांनी सांगितले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
तर उमेदवारीवरून तांबे कुटुंबात वाद आहे, असा दावा नाना पटोलेंनी केला.
“नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दोन कोरे एबी अर्ज पाठवले होते. ऐनवेळी अशी धोकेबाजी होईल, याची कल्पना नव्हती. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध केला नव्हता. तसे असते तर कोरे अर्ज पाठवले नसते,” असं पटोले म्हणाले.
2) विधानपरिषद : क्षीरसागरांचा शेवटच्या क्षणी भाजप उमेदवाराला पाठिंबा
शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मराठवाडा शिक्षक संघ निवडणुकीत अखेर भाजपच्या उमेदवारालाच पाठिंबा दिला आहे. यावरुन जयदत्त क्षीरसागर यांची भाजप सोबतची जवळीकता वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आता जयदत्त क्षीरसागर यांनी शेवटच्या क्षणी किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानं हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळेंना मोठा धक्का मानला जात आहे.

फोटो स्रोत, Facebook
या मतदारसंघात माजी मंत्री आणि शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले नेते जयदत्त क्षीरसागर हे नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होते.
भाजपा निवडणूक प्रभारी राणा जगजितसिंह पाटील यांनी बीडमध्ये येऊन क्षीरसागरांच्या नवगण महाविद्यालयात समर्थक, संस्था चालकांसोबत बैठक घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर उपस्थीत होते.
3) ज्यांचा जन्म भारतात झाला, ते सर्व हिंदूच – केरळचे राज्यपाल
“ज्यांचा भारतात जन्म झाला आहे, ज्यांनी भारतातील अन्न खाल्लं आहे. त्या सर्वांना हिंदू म्हणण्याचा हक्क आहे,” असं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे (एएमयू) संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी एका हिंदू परिषदेदरम्यान सांगितलेल्या शब्दांची आठवण करून देताना खान यांनी हे विधान केले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
यावेळी आरिफ मोहम्मद खान यांनी सांगितले की, “सर सय्यद यांनी आर्य समाजाच्या सदस्यांना सांगितले होते की, ते त्यांना हिंदू का म्हणत नाहीत आणि ते ‘हिंदू’ शब्दाला धार्मिक शब्द मानत नाहीत. तर हिंदू या शब्दाला मी धार्मिक संज्ञा मानत नाही तर हिंदू ही भौगोलिक संज्ञा आहे.”
4) आमदारांना झोप लागावी म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर – कडू
“सर्वच आमदारांना आनंदाची झोप लागली पाहिजे, यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जातोय,” असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं. मिश्कील स्वरुपात केलेल्या या टिप्पणीवरुन बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळाच्या लांबत असलेल्या विस्ताराबाबत शिंदे-फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिलीय.
मंत्रिमंडळाबाबत बच्चू कडू म्हणाले, “मी नाराज आहे असे माझ्याकडे पाहून वाटते का, सर्वच आमदारांना आनंदाची झोप लागली पाहिजे, यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जातोय.”

फोटो स्रोत, Facebook
तसंच, बच्चू कडू म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांनी कालच नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. त्यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि भाजपची युती होईल.”
सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी दोघेच मंत्रीमंडळात होती. त्यानंतर विरोधकांकडून डागण्यात आलेल्या टिकास्त्रांनंतर 20 मंत्र्यांचा शपथविधी करण्यात आला. मात्र, तेव्हापासून पुढील मंत्रीमंडळ विस्तारासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
5) ते ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणतात, ‘ख्रिश्चन राष्ट्रवादी’ कधी म्हणतात का? – जयशंकर
“परदेशी वृत्तपत्र भारत सरकारला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणतात, पण अमेरिका, युरोपमध्ये कधी ‘ख्रिश्चन राष्ट्रवादी’ म्हणतात का? तर नाही. कारण हा शब्द आमच्यासाठीच राखीव ठेवलाय,” असा प्रश्न भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी विचारला. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Twitter
पुण्यात ‘भारत मार्ग’ या त्यांच्या ‘द इंडिया वे’च्या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात एस. जयशकंर बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
गेल्या 9 वर्षांची देशाची वाटचाल पाहता, आपल्या देशातील सरकार आणि राजकारण हे अधिक राष्ट्रवादी झालंय, यात शंका नाही आणि यात चूक काहीच नाही, असंही एस. जयशंकर म्हणाले.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























