You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या या फळांबाबत समोर आलं नवीन संशोधन
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजिटल हेल्थ एडिटर
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
दररोज वेगवेगळी फळं आणि भाजीचे फक्त पाच पोर्शन्स न खाता विशिष्ट प्रकारचे ताजे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे तुमचं हृदय निरोगी राहण्यास मदत होऊ शकते, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
दररोज वेगवेगळ्या फळं आणि भाज्यांचे 5 सर्व्हिंग्स सारखेच नसतात. याचा अर्थ लोकांना त्यांच्या आहारात फ्लॅव्हॅनॉल्स नावाचे महत्त्वाचे पोषक घटक कदाचित मिळत नाहीत, असं संशोधकांना वाटतं.
ब्लूबेरी, आलूबुखार (प्लम), ब्लॅकबेरी, वाल (ब्रॉड बीन्स) आणि चेरी खाणं आणि सोबत ग्रीन टी पिणं हे पोषक घटक मिळवण्याचा एक आदर्श मार्ग आहे, असं ते म्हणतात.
अमेरिका आणि युकेमधील 30,000 लोकांवर केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं की जे लोक अगदी नियमितपणे फळं आणि भाज्यांचे 5 सर्व्हिंज किंवा खातात, त्यांच्यामध्येही या पोषक घटकाची कमतरता होती.
इतर तज्ज्ञ अधिक सावधपणे हा मुद्दा मांडत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की फ्लॅव्हॅनॉलची पातळी वाढवल्यामुळे ह्रदयाच्या समस्या टाळता येतील की नाही हे स्पष्ट नाही.
ह्रदयाच्या आरोग्याला फायदेशीर असणारे अँटिऑक्सिडंट्स
फूड अँड फंक्शन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनानुसार, पाचपैकी एकापेक्षाही कमी लोकांना दररोज आवश्यक असलेलं पुरेशा प्रमाणातील फ्लॅव्हॅनॉल्स (500 मिलीग्रॅम) मिळतं.
हे अँटिऑक्सिडंट्स असतात. ते विशिष्ट अन्नपदार्थांमध्ये आढळतात. ह्रदयाचं आरोग्य, रक्ताभिसरण आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता त्यांची मदत होऊ शकते, असं अभ्यासात म्हटलं आहे.
या अभ्यासात लोकांच्या आहाराचा मागोवा घेण्यात आला आहे. अभ्यासात सहभागी लोकांच्या अन्नपदार्थांच्या सेवनावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या लघवीतील बायोमार्कर्सचा वापर करण्यात आला.
अन्नपदार्थांची निवड महत्त्वाची
डॉ. झेवियर ओटाव्हियानी हे अभ्यासाचे प्रमुख संशोधक आहेत. ते म्हणाले की अन्नामध्ये काही साधे-सोपे बदल केल्यास हे फायदेशीर घटक किती प्रमाणात शरीरात शोषले जातात, त्यामध्ये 'खरा फरक' घडू शकतो.
"बहुतांश लोकांना वाटतं की भरपूर फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे हे पोषण होऊ शकतं. मात्र या संशोधनातून दिसून आलं की तुम्ही खात असलेल्या एकूण प्रमाणापेक्षा तुम्ही कोणत्या अन्नपदार्थाची निवड करत आहात, ती विशिष्ट निवड अधिक महत्त्वाची ठरते."
रीडिंग विद्यापीठातील संशोधक प्रा. गुंटर कुन्हल म्हणाले की वेगवेगळी फळं आणि भाज्यांचे दिवसातून पाच सर्व्हिंज किंवा वाढे खाणे, हा अजूनही योग्य संदेश असला तरी फळं आणि भाज्यांचे नेमके कोणते पाच वाढे खावेत याबाबत आपण अधिक काळजीपूर्वक विचार करण्याची आवश्यकता असू शकते.
"वेगवेगळी फळं आणि भाज्यांमधून जीवनसत्त्वं आणि खनिजांपलीकडे जाऊन अतिशय वेगवेगळे पोष्टिक घटक मिळतात," असं ते म्हणाले.
"या संयुगांबद्दलचं आपलं आकलन जसजसं वाढत जाईल, तसतसं आहारासंदर्भातील मार्गदर्शन अधिक विशिष्ट किंवा निश्चित स्वरुपाचं आणि अधिक प्रभावी करण्याची खरी संधी निर्माण होईल," असं ते म्हणाले.
किती प्रमाणात फ्लॅव्हॅनॉल घेतलं पाहिजे?
नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस)नं दररोज किती प्रमाणात फ्लॅव्हॅनॉल घ्यावं याची पातळी किंवा प्रमाण निश्चित केलेलं नाही. मात्र जवळपास दररोज 500 मिलीग्रॅम घेतल्यास ते ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, असं यूएस अकॅडमी ऑफ न्युट्रिशन अँड डायएटेटिक्सनं म्हटलं आहे.
संशोधकांनी केलेल्या चाचण्यांनुसार, ज्या पदार्थांमध्ये प्रति सर्व्हिंज किंवा वाढ्यामध्ये फ्लॅव्हॅनॉलचं अधिक प्रमाण असतं, त्यामध्ये पुढील पदार्थांचा समावेश आहे.
- आलूबुखारा (500 ग्रॅमची एक टोपली) - 450 मिलीग्रॅम
- क्रॅनबेरीज (250 ग्रॅमची एक टोपली) - 300 मिलीग्रॅम
- ब्लॅकबेरीज (200 ग्रॅमची टोपली) - 250 मिलीग्रॅम
- ग्रीन टी ( 250 मिलीचा एक कप) - 200 मिलीग्रॅम
- वाल (ब्रॉड बीन्स) (मूठभर 80 ग्रॅम) - 140 मिलीग्रॅम
- चेरीज (400 ग्रॅमची टोपली) - 130 मिलीग्रॅम
- सफरचंद (एक मध्यम आकाराचं, सालीसह) - 110 मिलीग्रॅम
- स्टॉबेरीज (200 ग्रॅमची एक टोपली) - 90 मिलीग्रॅम
- ब्लूबेरीज (150 ग्रॅमची एक टोपली) - 80 मिलीग्रॅम
- पिंटो बीन्स (2 टेबल स्पून) - 70 मिलीग्रॅम
संशोधक 'मार्स इन्कॉर्पोरेशन' या चॉकलेटच्या मोठ्या कंपनीसोबत 'फ्लॅव्हॅनॉल'वर अभ्यास करत आहेत. ही कंपनी कोको फ्लॅव्हॅनॉलच्या सप्लिमेंट्सवर अभ्यास करते आहे.
फ्लॅव्हॅनॉलचं अन्नपदार्थांमधील वेगवेगळं प्रमाण
ब्रिटिश हार्ट फाउंडेशन (बीएचएफ)चं म्हणणं आहे की व्यावसायिक चॉकलेटमधील फ्लॅव्हॅनॉलचं वास्तविक प्रमाण आणि इतर अन्नपदार्थांमध्येही हे प्रमाण खूप वेगवेगळं असू शकतं किंवा बदलू शकतं.
डार्क चॉकलेट हा मिल्क चॉकलेटच्या तुलनेत अधिक आरोग्यदायी पर्याय मानला जातो. कारण त्यामध्ये साखर कमी प्रमाणात असते आणि कोको अधिक प्रमाणात असतो. कोको हा फ्लॅव्हॅनॉल्सचा एक स्त्रोत असतो.
डार्क चॉकलेटच्या दोन-तीन तुकड्यांमध्ये 22-73 मिलीग्रॅम फ्लॅव्हॅनॉल असतं. तर मिल्क चॉकलेटच्या काही तुकड्यांम्ये 3-7 मिलीग्रॅम फ्लॅव्हॅनॉल असतं.
ग्लासगो विद्यापीठातील ह्रदयविकार तज्ज्ञ प्रा. नवीद सत्तार म्हणाले की काही छोट्या चाचण्यांमधून रक्तदाबावर काही सकारात्मक परिणाम दिसून आले असले तरीदेखील त्यामुळे ह्रदयविकाराशी संबंधित समस्यांमध्ये प्रत्यक्षात घट झाल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही.
ते म्हणाले की ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या 'ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित गंभीर आजारांचं प्रमाण कमी करण्याचा' उपाय म्हणून याची शिफारस करण्यापूर्वी आणखी चाचण्या होण्याची आवश्यकता आहे.
अनेक गोष्टींवर फ्लॅव्हॅनॉलचं प्रमाण अवलंबून
प्राध्यापक ॲना रॉड्रिग्ज-मॅटोस किंग्ज कॉलेज लंडनमध्ये पोषणतज्ज्ञ आहेत. ते म्हणाले की फळं आणि भाजीपाल्यातील फ्लॅव्हॅनॉलचं प्रमाण मोठ्या प्रमाणात बदलू शकतं. कारण त्यातील फायबरचं प्रमाणदेखील वेगवेगळं असतं. त्यामुळे यासंदर्भात पुढे आणखी अभ्यास झाला पाहिजे.
बीएचएफमधील डेल स्टॅनफोर्ड म्हणतात की वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये किती प्रमाणात फ्लॅव्हॅनॉल असेल हे त्या पदार्थाचं उत्पादन कुठे झालं आहे किंवा तो कुठे उगवलं जातं, हवामान, पिकण्याची स्थिती किंवा पक्वता आणि त्याची साठवणूक कशी केली आहे किंवा त्यावर प्रक्रिया कशी केली आहे आणि ते अन्न कोण खातो आहे, या गोष्टींवर अवलंबून असतं.
"छोट्या प्रमाणातील घटक थेट शोषले जातात. आपल्या पचनसंस्थेतून जिवाणू फ्लॅव्हॅनॉल्सचं रुपांतर अशा स्वरुपात करतात की जेणेकरून शरीराला त्यांचा वापर करता येतो. मात्र प्रत्येकाच्या पचनसंस्थेतील जिवाणू वेगवेगळे असतात. त्यामुळे लोकांना फ्लॅव्हॅनॉलपासून मिळणारे फायदेदेखील वेगवेगळे असू शकतात."
बीएचएफ आणि ब्रिटिश न्युट्रिशन फाऊंडेशनचं म्हणणं आहे की तुमच्या ह्रदयाचं आरोग्य सांभाळण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेण्यासंदर्भातील स्थापित किंवा प्रमाणित सल्ला अंमलात आणणं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)