पैलवान अभिजीत कटके 'हिंदकेसरी'

फोटो स्रोत, Facebook
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...
1) पैलवान अभिजीत कटके 'हिंदकेसरी'
तेलंगणा राज्यात सुरू असलेल्या हिंद केसरी किताबाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोनूवीर याचा 5-0 गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटकेने यापूर्वी 2017 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
या स्पर्धेत अंतिम सामन्यात हरियाणाच्या सोनूवीर विरुद्ध अभिजीत कटके यांचा सामना झाला. यामध्ये कटके याने 5 - 0 ने सोमविर याचा पराभव करून हिंद केसरी किताब पटकावला आहे. दोघांच्या लढतीनंतर तेलंगणामध्ये सुरू असलेल्या हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे जाते की हरियाणाकडे यासाठी सर्वजण उत्सुक होते. या स्पर्धेमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. त्यामुळे सर्वांची नजर अभिजीतवर होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
2017 भूगावमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीतने किरण भगतला पराभूत करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला होता.
अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे. दरम्यान, अखिल भारतीय ॲमॅच्युअर रेसलिंग फेडरेशनतर्फे हिंदकेसरी हा किताब देण्यात येतो. हा किताब या फेडरेशन तर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या विजेत्यास दिल्या जातो. याआधी 2013 साली पुण्याचा अमोल बराटेने हा किताब पटकावला होता.
2) ...तर राजकारणातून बाहेर पडणं चांगलं - पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Facebook
“राजकीय क्षेत्रात स्वाभिमानाने जे काही मिळेल ते घ्यायचे. स्वाभिमान सोडून काही मिळणार असेल तर बाहेर पडणे केव्हाही चांगले”, असं मत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रविवारी वंजारी युवा सन्मान आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात मुंडे यांची मुलाखत झाली. 'झी न्यूज मराठी'ने ही बातमी दिली आहे.
त्या म्हणाल्या, “संयमातून हवे ते मिळेल आणि आपली परिस्थिती बदलेल, यावर विश्वास आहे. राजकारणात आतापर्यंत खूप काही मिळवले आणि मिळवायचे आहे. आणि ते आपण मिळवणारच”.
“राजकारण आणि समाजात वावरताना बरीच कसरत करावी लागली. मात्र, तुम्ही जे बोलता तसेच वागत असाल तर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. याचा अनुभव सध्या आपण घेत आहोत. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी आपण कुठल्याही क्षणी वाकणार नाही. वडिलांचा हा बाणा आजही आपल्यात कायम आहे. महाभारतातील भीष्म पितामह यांची भूमिका सध्या आपण वठवित आहोत”, असेही त्यांनी नमूद केलं.
3) मी दिलेला शब्द पाळतो, म्हणून मुख्यमंत्री झालो-मुख्यमंत्री
“मी दिलेला शब्द पाळतो म्हणून 50 लोकांनी म्हणजेच आमदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो”, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्याचं गुपित सांगितलं. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचा महाअधिवेशन पार पडलं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, facebook
बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “एक बार जो मैने कमिटमेंट कर दी की मै खुद की भी नहीं सुनता”.
शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून शरद पवार हे मोठे नेते आहे. मात्र, आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ते म्हणून काम करत आहे, उद्याही कार्यकर्ते म्हणून काम करू, महाराष्ट्राच्या जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करतोय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
4) औरंगजेब, अफझलखानाचे उदात्तीकरण करणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडावा - शिवेंद्रराजे
औरंगजेब,अफजल खानाचे उदात्तीकरण करणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडावा असे स्पष्ट मत आ. शिवेद्रसिंहराजे यांनी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “अफजलखान हा काही देव नव्हता, स्वराज्यावर चालून आलेला तो एक सरदार होता. स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला”.
“औरंगजेब आणि अफजल खान महाराष्ट्रात येताना त्यांनी अनेक देवळे तोडली होती. अत्याचार करतच ते महाराष्ट्रात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज अथवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल इतिहास तोडून मोडून बोलणे की एक फॅशन झाली आहे. खरा इतिहास सोडून आपले काहीतरी मांडत राहणे ही सवय लोकांना लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
“इतिहासाच्या नोंदी, खरा इतिहास बाजूला ठेवून सध्या काही लोकांकडून चर्चा सुरू आहे. अशा चर्चा सुरू करून आपण खरा इतिहासाला कमी लेखत आहोत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. औरंगजेब आणि अफजलखानाचा उदात्तीकरण, दैवतीकरण करणे हे चुकीचेच आहे. राजकीय हेतू समोर ठेवून जर असे कोण करत असेल तर त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्र सोडून जावे”, असं त्यांना वाटतं.
5) पवारांच्या दोन नातवांमध्ये निवडणूक; रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
गेली अनेक दशके महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) राजकारणापासून दूर राहिलेल्या शरद पवार यांना अखेर आपल्याच दोन नातवांमधील म्हणजेच रोहित पवार आणि अभिषेक बोके यांच्यातील लढत थांबविण्यासाठी रविवारी मैदानात उतरावे लागले. त्यांच्या प्रयत्नांनंतरही या दोन नातवांमध्ये निवडणूक झालीच. त्यामध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये या संघटनेचे अध्यक्षपदही रोहित पवार यांनी मिळविले. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
रविवारी एमसीएची निवडणूक गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या स्टेडियममध्ये पार पडली. आमदार रोहित पवार (शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू) आणि अभिषेक बोके (पवार यांच्या भगिनीचे नातू) यांच्याबरोबरच माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी अर्ज दाखल केले होते.

फोटो स्रोत, Getty Images
ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे सर्व मंडळी गेली होती. पवार यांनी गेल्या आठवड्यात या संघटनेतील सुमारे चाळीस मतदारांची बैठक घेऊन त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्नही केला होता.
दुसऱ्या बाजूला रोहित पवार कोणत्याही परिस्थितीत ही संघटना ताब्यात घेण्यासाठी आग्रही होते. अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर सूत्रे हलली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यामध्ये लक्ष घातले. त्यानुसार अभिषेक बोके यांनी माघार घ्यावी, असा आदेश दिला गेला.
एकूण चोवीस मतदारांपैकी पवार यांना २२, तर मुथा यांना २१ मते पडली. बोके यांना तीन, तर सुगवेकर यांना दोन मतांवर समाधान मानावे लागले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























