अक्षय केळकर : रिक्षावाल्याचा मुलगा ठरला बिग बॉस मराठीचा विजेता

फोटो स्रोत, Big Boss Marathi
अभिनेता अक्षय केळकर बिग बॉस मराठी चौथ्या हंगामाचा विजेता ठरला. 100 दिवसांनंतर बिग बॉस मराठीचा यंदाचा हंगाम संपला. 19 सदस्यांमधून अखेर अक्षयने जेतेपदावर बाजी मारली. अभिनेत्री अपूर्वा नेमाळेकरने उपविजेतेपद पटकावलं.
अक्षयला 15 लाख 55 हजार एवढी बक्षीस रक्कम, ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.
रविवारी चौथ्या हंगामाचा ग्रँड फिनाले रंगला. किरण माने, अमृता धोंगडे, राखी सावंत, अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमाळेकर हे स्पर्धेक जेतेपदाच्या शर्यतीत होते. टॉप3 मध्ये अपूर्वा, अक्षय आणि किरण असे तीन स्पर्धक होते.
या पाच जणांसह यंदाच्या हंगामात तेजस्विनी लोणारी, प्रसाद जावदे, निखिल राजेशिर्के, समृद्धी जाधव, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशश्री मसुरकर, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, डॉ. रोहित शिंदे सहभागी झाले होते.

फोटो स्रोत, Facebook/Akshay Kelkar
पहिल्या हंगामात मेघा धाडेने जेतेपदाची कमाई केली होती. शिव ठाकरेने दुसऱ्या हंगामाचं जेतेपद पटकावलं होतं. विशाल निकमने शेवटच्या हंगामाचा विजेता ठरला होता.
बाकी हंगामांच्या तुलनेत यंदा चाहत्यांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याची चर्चा रंगली होती.
अक्षय केळकरने 2013मध्ये चंदेरी दुनियेत पदार्पण केलं. बे दुणे दहा या मालिकेत त्याने आपल्या अभिनायचे गुण दाखवले. कबीर नावाचं पात्र त्याने साकारलं होतं. कमला मालिकेतही तो दिसला होता. प्रेमासाठी, कान्हा, कॉलेज कॅफे, माधुरी या चित्रपटांमधून त्याने काम केलं. भाकरवडी नावाच्या हिंदी मालिकेत तो झळकला होता.
“प्रेक्षकहो, तुमच्या प्रेमामुळे, पाठिंब्यामुळे बिग बॉस मराठी सीझन4चा विजेता ठरलो आहे. मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची माझी मनीषा पूर्ण झाली आहे. बिग बॉसच्या घरात राहताना खूप मजा आली. कमाल गेम आहे. प्रचंड आनंद झाला आहे. आईबाबा हा करंडक तुमच्यासाठी”! अशा शब्दात अक्षयने जेतेपद पटकावल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोण आहे रमा?
बिग बॉसच्या घरात राहत असताना अक्षय केळकरने 8 वर्षे एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल सांगितले होते. त्यावेळी त्याने तिचे नाव रमा असल्याचेही सांगितले होते. हे तिचे टोपणनाव असून त्याला रमा माधव ही जोडी आवडत असल्याने त्याने ते ठेवले होते. यानंतर आता अक्षयने रमा आणि त्याची पहिली भेट कशी झाली याबद्दल खुलासा केला होता.
गोदावरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जितेंद्र जोशी बिग बॉसच्या घरात गेला होता. त्यावेळी त्याने घरातील सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे पत्र वाचून दाखवलं. यावेळी त्याने अक्षय केळकरला त्याच्या गर्लफ्रेंडचे पत्र वाचून दाखवलं होतं.
काय होतं पत्रात?
“हाय हँडसम, खरतंर अजिबात तुला मिस यू वैगरे लिहिणार नव्हते. पण खूप जास्त मिस यू… एक महिना होऊन गेलाय आणि अजून तुझ्या नसण्याची सवय होत नाही. तुला तिकडे खूप चांगले आणि खरच खूप चांगले मित्र मैत्रिणी भेटले आहेत. पण आम्हाला अजूनही अक्षयला रिप्लेस करणारा कोणी सापडला नाही. आता आम्ही तुझे फालतू जोक पण मिस करतोय. या सगळ्यात एक गोष्ट भारी आहे ती म्हणजे 24 तास मला तुझ्यावर लक्ष ठेवता येतं. असं तुझ्यावर 24 तास नजर ठेवण्याचं माझं स्वप्न होतंच. त्यासाठी बिग बॉस मराठीचे खूप खूप आभार.
तुला बिग बॉसच्या घरात पाहून खूप चांगलं वाटतंय. तू हसलास की मनापासून आनंद होतोय. तुला रडताना पाहून आमच्याही डोळ्यात पाणी येतं. तू खूप जास्त खरा आहेस आणि याचा आम्हाला अभिमान आहे. दसरा गेला, दिवाळी गेली, अरे आता इतकं केलंस आहेस तर नवीन वर्षही तिथेच सेलिब्रेट करुन ये. मला माहितीये तिथे राहणं, टिकणं, लढणं अजिबात सोपं नाही. पण चिते की शिकार है, ये आसान नही होगी.
तू मुळातच फायटर आहेस. तू सर्वच शून्यातून उभं केलंस. त्यामुळे माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू याही वेळी कमाल करुन दाखवशील. आम्ही एकमेकांची आणि डार्लिंग कारची काळजी घेतोय. घरात ट्रॉफीसाठी जागा ठरली आहे. आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे. जिंकून ये…….(रमा)” असे त्याच्या गर्लफ्रेंडने त्या पत्रात म्हटले आहे.
पत्राचं वाचन झाल्यावर अक्षय म्हणाला, “आठ वर्षांचं प्रेम आहे माझं. खूप कठीण आहे हे पुढे. तिच्याही घरचे हे सर्व बघत असतील. ते पुढे जाऊन कठीण आहे. पण प्रेम आहे. मला शून्यापासून तिने बघितलंय आणि ती माझ्या घरच्यांना जास्त सांभाळते. मी त्यांच्याशी जास्त बोलत नाही. ती बोलते आणि हे टोपण नाव आहे रमा… माधव ही जोडी फार आवडते. त्यामुळे मी तिला रमा म्हणतो. मी खरं नाव घेतलं तर काहीही होणार नाही. माझी आठ वर्ष तिथेच थांबतील”. त्यावेळी अक्षय भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.

फोटो स्रोत, Big Boss Marathi
आईबाबांचा वाटतो अभिमान
अक्षय केळकरचे वडील रिक्षा चालवतात. बिग बॉसच्या सेटवर तो वडिलांच्या रिक्षातूनच पोहोचला होता.
अक्षय सांगतो, “माझे आई बाबा नववी नापास आहेत, रिक्षावाला घरं सांभाळतो आहे, इतका फ्रिडम दिला दोन्ही मुलांना की ते बरोबर मार्गावर चालत आहेत. शिक्षित राहून अशिक्षित राहण्यापेक्षा अशिक्षित राहून शिक्षित राहणं गरजेचे आहे.
आईबाबांचा अभिमान वाटतो. मी अभिनेता असलो तरी बाबा रिक्षा चालवतात”.
'पहिलं प्रेम आईनेच मिळवून दिलं होतं'
बिग बॉसच्या घरातील वास्तव्यादरम्यान अक्षयने पहिल्या प्रेमाची आठवण सांगितली होती.
अक्षयने सांगितलं, “मी सुरुवातीला खूप लाजत असे. मुलींशी फारसा बोलत नसे आणि नात्यातली एक मुलगी मला मेसेज करत होती. मी ते मेसेजेस इग्नोर केले. त्यावेळी आई माझा फोन चेक करायची आणि आईने मात्र सांगितले कि, मुलगी तुला मेसेज करत आहे, तिला तू आवडत असावास. नात्यातील होती म्हणून मी तिच्या घरी रहायला गेलो. आमच्यात बरीच चर्चा झाली. तिने मी तिला आवडत असल्याची कबुली दिली. सगळं छानचं होतं. पण ते प्रेम टिकलं नाही. ब्रेकअप झाला. पण माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईने जुळवून दिलं होतं.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























