अभिनेत्री पूनम पांडे जिवंत, व्हीडिओ जारी करून दिली माहिती

अभिनेत्री पूनम पांडे हिचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन

फोटो स्रोत, Getty Images

Published

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं काल (2 फेब्रुवारी) निधन झाल्याची बातमी तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली होती. मात्र 24 तासांतच ती जिवंत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

वयाच्या 32 व्या वर्षी पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सरने अर्थात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने निधन झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता 24 तासांनी पूनम पांडेने स्वत: लाईव्ह येत ती जिवंत असून तिने हे निधनाचं नाटक केवळ गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबाबत जगजागृती करण्यासाठी केलं असल्याचं म्हटलं आहे.

शनिवारी, पूनम पांडेने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत म्हटलंय की, "तुम्हा सर्वांसोबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणं मला महत्वाचं वाटतं. मी जिवंत आहे."

पूनम पांडे व्हिडीओमध्ये म्हणाली, "जागरूकता पसरवून एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक महिलेला आवश्यक असणारी माहिती मिळेल याची खात्री करू या. या आजाराचा विनाशकारी प्रभाव संपवण्यासाठी एकत्र काम करूया."

यावेळी पूनम पांडेने सर्वांची माफी मागितली असून निधनाचं नाटक मी पैशांसाठी नव्हे तर सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी केलं असल्याचं म्हटलं आहे.

शुक्रवारी पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेकांचा या बातमीवर विश्वास बसला नव्हता.

शिवाय पूनम पांडेच्या कुटुंबीयांनी याबाबत जाहीरपणे काहीही सांगितलेलं नव्हतं. तिचा मृत्यू कुठे झाला याबाबतही कोणती माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळेच शुक्रवारी संध्याकाळपर्यंत संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं.

32 वर्षीय पूनम पांडे हे सोशल मीडिया आणि मॉडेलिंगच्या जगतातलं एक प्रसिद्ध नाव आहे. तिने याआधी देखील प्रसिद्धीसाठी वादग्रस्त पद्धतींचा अवलंब केला होता.

पूनमची व्यवस्थापक निकिता शर्मा हिने ही बातमी जाहीर केली होती.

हॉटरफ्लायशी बोलताना निकिता म्हणाल्या, आजारपणातही तिची लढण्याची चिकाटी वाखाणण्यासारखी होती.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे Cervical Cancer. जगभरात स्त्रियांमध्ये सामान्यत: हा कॅन्सर चौथ्या क्रमांकावर आढळून येतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी 3 लाखांपेक्षा जास्त महिलांचा मृत्यू होतो. यातील 85 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये होतात.

तज्ज्ञ सांगतात, Cervical Cancer चा धोका कमी करण्यासाठी 'लस' उपलब्ध आहे. पण लोकांमध्ये या लशीबाबत जनजागृती नाही. अनेक महिलांना लस घेतल्याने 'Cervical Cancer' टाळता येणं शक्य आहे याची माहितीच नाही.

गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे 'Cervix' (सर्व्हिक्स) किंवा ग्रीवा.

हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. स्त्रीयांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची खालील लक्षणं सामान्यत: आढळून येतात,

  • मासिकपाळीच्या दिवसात अति-रक्तस्राव होणं
  • पाळी वारंवार येणं
  • लैंगिक संबंध ठेवल्यानंतर होणारा रक्तस्राव
  • योनीमार्गातून सतत निघणारा पांढरा द्रव (याला White Discharge म्हणतात)
  • योगीमार्गातून निघणाऱ्या द्रवाला वास येणं
  • वारंवार योनीमार्गाचं इंन्फेक्शन

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)