काम करणाऱ्यांची चर्चा होते, अन् बिनकामाचे मोर्चा काढतात – एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. काम करणाऱ्यांची चर्चा होते, अन् बिनकामाचे मोर्चा काढतात – एकनाथ शिंदे
“आपण धडाकेबाज निर्णय घेत आहोत. पण, जे रस्त्यावर येत आहेत, ते मोर्चा काढतील. आपण काम करणारे आहोत, काम करणाऱ्यांचीच चर्चा होते आणि बिनकामाचे मोर्चा काढतात,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीकडून आज (17 डिसेंबर ) मुंबईत महाविराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षांवर टीका केली.
ते म्हणाले, “आरोप प्रत्यारोप करण्याची स्पर्धा लागली आहे. त्याला आम्ही कामातून उत्तर देऊ. पण, ज्यांना खोके माहिती आहेत, तेच खोक्याची भाषा करतात. खोके कुठून कुठे जातात हे सर्वांना माहिती आहे. जनता सुज्ञ आहे. 50 खोके नाहीतर 750 खोके आम्ही रत्नागिरीच्या विकासासाठी दिले. आम्ही घरी खोके ठेवणारे नाहीत. आम्ही घेणारे नाहीत, देणारे आहोत.” ही बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठीने दिली.

फोटो स्रोत, Getty Images
2. दारू प्राशनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई नाही – नितीश कुमार
दारू प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
बिहारमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने बिहारमध्ये 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘जे लोक बनावट दारू पितात, त्यांचा मृत्यू होणारच’ (जो पियेगा, वो मरेगा!) असं विधान केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
यासंदर्भात काल (16 डिसेंबर) विधानसभेत बोलताना नितीश कुमार यांनी मदत दिली जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
“दारू प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. आम्ही नेहमीच मद्यप्राशन करू नका, मृत्यू होईल असं आवाहन करत आहोत. मद्यप्राशनाच्या बाजूने बोलणारे तुमचं काही भलं करू शकत नाहीत,” असं नितीश कुमार म्हणाले.
तसंच, ही माझी वैयक्तिक इच्छा नसून राज्यातील महिलांच्या आक्रोशाला प्रतिसाद आहे, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.
3. ‘...तर ते थिएटरच जाळून टाका,’ बिकिनी वादावर महंत दासांचा इशारा
शाहरुख खान सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे हिंदू धर्माचा अपमान करतो, त्यामुळे ज्या चित्रपटगृहात 'पठाण' प्रदर्शित होईल ते जाळून टाका असं हनुमानगढीचे महंत दास यांनी म्हटलं आहे.
अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटातील 'बेशरम' या गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीवर अनेक हिंदू संघटना आणि हिंदू महासभा दोघांनीही आक्षेप घेतला आहे. ट्विटरवर 'पठाण' चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे.

फोटो स्रोत, twitter
याविषयी बोलताना महंत दास म्हणाले, 'शाहरुख नेहमी हिंदू धर्माची खिल्ली उडवण्यासाठी काहीतरी करतो. चित्रपटात सनातन संस्कृतीचा भाग असणारा भगवा ज्या प्रकारे दाखवण्यात आला आहे त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. भगवा रंग संतांचा आणि भारत देशाचा रंग आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणला भगव्याचं रंगाची बिकिनी घालण्याची काय गरज होती?
ते पुढे म्हणाले, “माझं म्हणणं आहे की, ज्या चित्रपटगृहात 'पठाण' प्रदर्शित होईल त्या चित्रपटगृहालाच आग लावून टाका. जोपर्यंत आपण असं काही करत नाही, असं काही घडत नाही तोपर्यंत कुणीही आपल्याला गंभीरतेने घेणार नाही. आपल्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही.” महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली.
4. राजकीय दावणीला बांधून घेतात, ते कीर्तनकार असू शकत नाहीत – सुषमा अंधारे
जे लोक स्वतःला राजकीय दावणीला बांधून घेतात ते कीर्तनकार असू शकत नाहीत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी सुनिता अंधाळे यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्रातील संतांवर कथितरित्या टीका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात अंधारे यांनी माफी मागितली तरी हे प्रकरण मिटताना दिसत नाही.

फोटो स्रोत, facebook
दरम्यान, कीर्तनकार सुनिता अंधाळे यांनी सुषमा अंधारे यांना शिवीगाळ करत टीका केली आहे. त्यांच्या टीकेला आता अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अंधारे म्हणाल्या, "मला काही लोकांनी काही व्हिडिओ दाखवले. यामध्ये कोणीतरी फार अश्लाघ्य भाषा वापरली आहे. मला हे लोक कीर्तनकार वाटत नाहीत. जे लोक अत्यंत गलिच्छ भाषा वापरतात जे आपल्या मनातून अद्याप काम-मोह-क्रोध-मत्सर अजून काढू शकलेले नाहीत.” ही बातमी ई-सकाळने दिली.
5. लोक दुसऱ्या पक्षात गेले तर दलाल? अडीच वर्षे नवीन काय घडवलं? – फडणवीस
"त्यांच्या पक्षावर लोकांचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे लोक जर दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल? या भाषेला लोकांना राग येत आहे, ते त्यांना गांभीर्यानेही घेत नाहीत," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक नुकतीच झाली होती. यामध्ये काहीच नवीन घडलं नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले, “त्यांनी अडीच वर्षे काय नवं घडवलं? एका बैठकीत नवीन घडेल, असं कधीच होत नाही. एका संवादाची सुरुवात झाली आहे. तणाव दूर करण्यासाठी ही बैठक झाली आहे.” ही बातमी लोकमतने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























