You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेतील शाळेत झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू , 9 जण जखमी, अल्पवयीन हल्लेखोराला अटक
अमेरिकेतील जॉर्जियामध्ये एका हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या आरोपात 14 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. हा मुलगा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे.
बुधवारी (4 सप्टेंबर) झालेल्या या हल्ल्यातील मृतांमध्ये दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे, असं जॉर्जियातील तपास यंत्रणांनी म्हटलं आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हल्लेखोर विद्यार्थ्यानं शरणागती पत्करली.
अटक करण्यात आलेल्या या हल्लेखोराचं नाव कोल्ट ग्रे असं आहे. हा विद्यार्थी त्याच शाळेमध्ये शिकत होता. हल्लेखोरावर अल्पवयीन म्हणून नव्हे तर प्रौढ म्हणूनच खटला चालवण्यात येणार आहे.
कोल्ट ग्रेच्या हालचालींवर एफबीआयला आधीपासूनच संशय होता. गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये एफबीआयने त्याच्या निकटवर्तीयांचीही चौकशी केली होती.
त्यावेळी त्याने शाळेमध्ये गोळीबार करण्याबद्दल सोशल मीडियावर धमकी दिली होती. मात्र, तेव्हा त्याला अटक करण्यात आली नव्हती.
त्याच्या वडिलांनीही अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांच्याकडं शिकारी बंदुका असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्याकडं त्यांचं लक्ष होतं, असंही ते पोलिसांना म्हणाले होते.
या शाळेमध्ये जवळपास 1900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सोशल मीडियावर केली होती पोस्ट
हल्ल्यातील मृतांमध्ये क्रिस्टीना इरीमी आणि रिचर्ड ऍस्पिनवॉल या शिक्षकांचा तर मेसन शेर्महॉर्न आणि ख्रिश्चन अँगुलो या 14 वर्षीय दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे डायरेक्टर ख्रिस होसी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारासाठी एआर-प्लॅटफॉर्म पद्धतीच्या शस्त्राचा वापर करण्यात आला आहे.
या घटनेतील आरोपी असलेल्या विद्यार्थ्याने एका वर्षापूर्वी म्हणजेच मे 2023 मध्ये सोशल मीडियावरुन गोळीबाराची निनावी धमकी दिली होती. त्याने केलेल्या पोस्टमध्ये बंदूकीची छायाचित्रे होती. तसंच शाळेमध्ये गोळीबार करणार असल्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये त्याने सर्व आरोप फेटाळून लावले होते.
एफबीआयने म्हटले आहे की, नॅशनल थ्रेट ऑपरेशन्स सेंटरने स्थानिक पोलिसांना मे 2023 मध्येच हल्लेखोराच्या सोशल मीडियावरील धमकीच्या पोस्ट्सबाबत सावध केले होते.
पोलिसांनी तात्काळ जाऊन त्या विद्यार्थ्याची आणि त्याच्या वडिलांची चौकशी केली होती. त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपल्याकडे शिकारी बंदूका असल्याचे सांगितले होते. मात्र, या बंदूका वापरण्याची परवानगी मुलाला दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले होते, अशी माहिती एफबीआयने दिली.
त्यावेळी, या 13 वर्षीय विद्यार्थ्याने आपण सोशल मीडियावर अशा प्रकारची कोणतीही पोस्ट टाकली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, तरीही पोलिसांनी शाळेला सावध केलं होतं आणि या प्रकरणावर लक्ष ठेवलं होतं.
"त्यावेळी या मुलाला अटक करण्यासाठी पुरेसे कारणही उपलब्ध नव्हते," असेही एफबीआयने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
शाळेमध्ये गोळीबाराची तेविसावी घटना
लायला सायरथ ही विद्यार्थीनी संशयित आरोपीच्या वर्गात शिकते. तिने सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार, गणिताचा तास सुरु झाल्यावर तो वर्गातून बाहेर पडला.
त्यानंतर तो परत आला आणि ऑटोमॅटीक दरवाजा ठोठावला. मात्र, जेव्हा त्याच्याकडे बंदूक असल्याचे लक्षात आले, तेव्हा दुसऱ्या एका विद्यार्थ्याने हा दरवाजा उघडण्यास नकार दिला.
लायलाने सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार, हा हल्लेखोर त्यानंतर दुसऱ्या वर्गाच्या दरवाजाकडे गेला आणि तिथंच त्याने गोळीबार सुरू केला.
14 वर्षीय मार्क्स कोलमन या विद्यार्थ्याने म्हटले की, गोळीबार सुरुवात होण्यापूर्वी त्याने त्याच्या हातात एक मोठी बंदूक पाहिली.
"मी उठलो आणि धावू लागलो. त्याने किमान दहा तरी गोळ्या झाडल्या. त्यानंतर माझ्या शिक्षकांनी डेस्कचा वापर करुन दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला," असं मार्क्स कोलमननं सीबीएस न्यूजशी बोलताना म्हटलं.
पुढे त्यानं सांगितलं की, त्याला त्याचा एक मित्र रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसला. दुसऱ्या एका मुलीच्या पायाला गोळी लागली होती तर आणखी एका मित्राच्या पोटावर गोळी लागली होती.
एज्युकेशन वीक या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये शाळेमध्ये अशाप्रकारचा गोळीबार होण्याची ही तेविसावी घटना आहे. वर्षभरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये 11 मृत्यू झाले असून 38 जण जखमी झाले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.