You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर राजकीय नेते काय म्हणत आहेत?
भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर भाजप आणि विरोधी पक्षाचे नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
देशाच्या सर्वच स्तरातून भारतीय सैन्य दलाला एकमुखाने पाठिंबा देण्यात येत आहे.
दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय सैन्यदलाचं कौतुक केलं, पण युद्ध हे आपलं उत्तर नसावं असं म्हटलं आहे.
ते म्हणाले, "दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नसतं."
भारताने 7 मेच्या पहाटे पाकिस्तानातील काही ठिकाणांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबद्दल ते बोलत होते.
"अमेरिकेचे दोन ट्वीट टावर्स पडले, पेंटागॉनवर हल्ला केला. म्हणून त्यांनी युद्ध नाही केलं. त्यांनी ते अतिरेकी ठार मारले," राज ठाकरे पुढे म्हणाले.
पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे. आपण त्याला अजून काय बरबाद करणार? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
"ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला तेच अजून हाती सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक इतकी वर्ष जिथं जात आहेत तिथं सुरक्षेची काळजी का घेतली गेली नव्हती हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं.
"आपल्या देशांत कोम्बिंग ऑपरेशन करून या लोकांना शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. हवाई हल्ले करून लोकांना भरकटवणं हा पर्याय असू शकत नाही," ते पुढे म्हणाले.
याबाबत जाहीर केलेल्या सरकारी निवेदनात म्हटलंय, "या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मिरमधल्या अतिरेकी ठिकाणांवर हल्ले केले होते. या ठिकाणाहूनच भारतावरच्या दहशतवादी हल्ल्याची योजना बनवली गेली आणि अंमलात आणली गेली होती."
एकूण नऊ ठिकाणी हे हल्ले केल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
दुसरीकडे पाकिस्तानच्या सरकारी वृत्तसंस्थेने लष्कर प्रवक्तांच्या हवाल्याने सांगितलं की पाकिस्तानातल्या तीन जागांवरच भारताने क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
या मुद्द्यावरून भारतातले अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत.
भाजपचे नेते काय म्हणाले?
"न्याय झाला आहे. जय हिंद," भारतीय लष्कराचे प्रवक्ते 'ऑपरेशन सिंदूर'वर बोलताना म्हणाले.
केंद्रातले सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह 'एक्स' (पुर्वीचं ट्वीटर) या सोशल मीडियावर लिहितात, "भारत माता की जय."
तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोस्टमध्येही भारताचा आणि लष्कराचा जयजयकार दिसतो. "जय हिन्द. जय हिन्द की सेना," असं त्यांनी पोस्ट केलं.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर लष्कराच्या मोहिमेबद्दल लिहिताना म्हणतात, "जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णूता दाखवणं गरजेचं आहे."
जम्मू-काश्मीरमधले भाजपचे नेते अल्ताफ ठाकूर लष्कराच्या कारवाईबाबात एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, आज पार पाडण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. त्यात अनेक आतंकवादी मारले गेले असल्याचं म्हटलं जात आहे. हे अतिशय चांगलं पाऊल आहे.
"भारताने आणि भारतीय लष्कराने केलेला दहशतवाद संपवण्याचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा आहे. भारत मोठी कारवाई करून दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात आणेल अशी आशा आहे."
जम्मू-काश्मिरमधले जनता दल युनायटेड या पक्षाचे अध्यक्ष जी.एम. शाहीन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "योग्य वेळी घेतलेला हा योग्य निर्णय होता. हल्ले योग्य ठिकाणी केले गेले. दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला, असं ते म्हणाले.
विरोधी नेत्यांचाही पाठिंबा
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "पाकिस्तान आणि पीओकेमध्ये जन्म घेणाऱ्या दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपासाठी भारताकडे एक दृढ राष्ट्रीय धोरण आहे. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी ठिकाणांवर भारताच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यांचा आम्हाला गर्व आहे."
तर काँग्रेसचे नेते आणि लोकसभा सदस्य राहूल गांधी यांनीही यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे, "आम्हाला आमच्या लष्कराचा अभिमान आहे. जय हिंद."
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दीर्घ प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मिरमधल्या दहशतवादांची सगळी ठिकाणं पूर्णपणे नष्ट करणं आवश्यक आहे. तीच भारताची ठाम आणि अढळ भूमिका अशी असली. ही भूमिका सदैव सर्वोच्च राष्ट्रीय हिताने प्रेरित असली पाहिजे."
"ही वेळ ऐक्य आणि एकजूट दाखवण्याची आहेे. 22 एप्रिलच्या रात्रीपासूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्पष्टपणे सांगत आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात देश जे पाऊल उचलले, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. काँग्रेस पक्ष लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे."
त्याच वेळी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी लिहितात, "लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांचं मी स्वागत करतो. पाकिस्तानी सरकारला असा कठोर धडा शिकवला गेला पाहिजे की पुन्हा एकदा दुसरा पहलगाम होऊ नये. पाकिस्तानच्या दहशतवादाच्या संपूर्ण यंत्रणेला नष्ट केले गेले पाहिजे. जय हिंद!"
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, "दहशतवादी ठिकाणांवर अचूक लक्ष्य साधून हल्ला करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात मी याच विचाराची वकिली केली होती - कठोर प्रहार करा, पण चतुराईने करा. या कारवाईचं मी कौतुक करतो आणि आपल्या लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं नमूद करतो."
"आपण आपलं कर्तव्य पार पाडलं आहे आणि आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक पावलं उचलली आहेत. आता प्रत्येक संबंधित व्यक्तीने शहाणपणानं वागलं पाहिजे, जेणेकरून हा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाऊ नये," असंही ते पुढे म्हणाले.
भारत सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा - कम्युनिस्ट पक्ष
केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीत दहशतवादाला आळा घालण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना सर्वांनी पाठिंबा दिला असल्याचं भारतीय. कम्युनिस्ट पक्षाच्या निवेदनात म्हटलं आहे.
"या कारवाईसोबतच पहलगाममध्ये निर्दोष लोकांच्या हत्येसाठी जबाबदारर असलेल्यांना भारताकडे सुपूर्त करण्यासाठी आणि त्यांच्या हद्दीत कोणताही दहशतवादी तळ काम करणार नाही याची खात्री करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणायला हवा."
'लोकांची एकता आणि देशाची अखंडता सुरक्षित रहावी याची भारतीय सरकारने काळजी घ्यावी', असंही या निवेदनात पुढे म्हटलं आहे.
पाकिस्तानकडून प्रत्युत्तराचा इशारा
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्यूत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बीबीसी उर्दूशी बोलताना म्हणाले, "ते (भारत) असा दावा करत आहेत की त्यांनी दहशतवादी ठिकाणांवर बल्ले गेले. आंतरराष्ट्रीय माध्यमाशी बोलताना मी असं म्हणेन की त्यांनी स्वतः येऊन पहावं की हि दहशतवादी ठिकाणं होती की नागरी वस्ती.
त्यात आमच्या दोन मशिदीही होत्या. एक मुलगा शहीद झाला. एक महिलाही मारली गेली. माझ्याकडे शहिदांचे ताजे आकडे उपलब्ध नाहीत."
सात ठिकाणी हल्ले झाल्याचं नक्की झालं असल्याचं ते सांगत होते. त्यातले दोन काश्मिरमध्ये तर पाच पाकिस्तानात आहेत. ही सगळी ठिकाणं नागरी वस्ती असलेली होती."
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी भारताच्या हल्ल्यांवर बीबीसीशी बोलताना म्हणाले, "त्यांनी आमची सीमा ओलांडली आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)