'गंगा भागिरथी नको फक्त श्रीमती म्हणा'

Published

आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.

गं.भा. नको फक्त श्रीमती म्हणा – चित्रा वाघ

महिला आणि बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘गंगा भागिरथी’ मुद्द्यावरून काढलेल्या पत्रकासंबंधी त्यांच्यावर टीका होत आहे. महिला आयोगाच्या विनंतीनंतर असं पाऊल उचलल्याचं त्यांनी म्हटलंय.

आता भाजपमधून देखील मंगल प्रभात लोढा यांच्या कल्पनेला विरोधा झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विधवा महिलांसाठी नवीन शब्द सुचवला आहे. तसेच त्यांनी 'गंगा भागिरथी' या शब्दाचा अर्थही सांगितला आहे.

"गं.भा. म्हणजे गंगा भागिरथी… नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती. याऐवजी कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे", असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

सकाळने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

‘विरोधकांना एकत्र आणण्याची तयारी’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक पार पडली.

या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. विरोधकांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली आहे, असं विधान शरद पवारांनी केलं आहे.

बुधवारी (13 एप्रिल) राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव या नेत्यांमध्ये बैठक पार पडली होती.

या बैठकीसाठी शरद पवारांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. पण शरद पवारांना काही कामानिमित्त दिल्लीत बैठकीस हजर राहता आलं नाही. त्यामुळे शरद पवारांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली.

लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

'कर्नाटक सरकारचा मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सदोष’

ओबीसी आरक्षणातील मुस्लिमांचा चार टक्के वाटा काढून वोक्कलिगा आणि लिंगायतांना प्रत्येकी दोन टक्के आरक्षण देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय सदोष असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (13 एप्रिल) नोंदवलं.

कर्नाटक सरकारने यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला असून तोपर्यंत सरकारी आदेशावर कुणालाही प्रवेश दिले जाणार नसल्याचे सांगितलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टानं हे निरिक्षण नोंदवल्यामुळे सत्ताधारी भाजप सरकारसाठी हा फटका असल्याचं मानलं जात आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तात कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिबल, दुष्यंत दवे आणि गोपाल शंकरनारायणन यांनी मुस्लीम आरक्षण रद्द करण्यापूर्वी कोणताही अभ्यास करण्यात आला नाही, असं न्यायालयात सांगण्यात आलं आहे.

धर्म पाहून एन्काउंटर – ओवेसी

उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमदच्या मुलाचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर आता त्यावरून राजकारण केलं जात आहे.

युपी सरकार गुंडाचा धर्म पाहून त्यांचं एन्काउंटर करत असल्याचा आरोप एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांनी केला आहे. तर समाजावादी पक्षानंसद्धा या मुद्द्यावरून टीका करत भाजप सरकार सामाजिक एकोप्याच्या विरोधात असल्याचं म्हटलंय.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार अतीकचा मुलगा असदनेच 24 फेब्रुवारीला उमेश पाल यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

ज्यावेळी झाशीजवळ यूपी एटीएसकडून एन्काउंटर सुरू होतं. त्यावेळी यूपी पोलीस प्रायगराजमध्ये अतीकला कोर्टात हजर करत होते.

अमृतपाल राजस्थानमध्ये लपून बसलाय?

‘वारीस पंजाब दे,’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह राजस्थानच्या सीमावर्ती भागात लपून बसला असण्याची शक्यता भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तिथून तो पाकिस्तानात पळून जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. पाकिस्तान सीमेवरच्या श्रीगंगानगर, हनुमानगड, जैसलमेर, बीकानेर, बाडमेर या जिल्ह्यांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आल्याचं एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

गेल्या 27 पेक्षा जास्त दिवसांपासून अमृतपाल फरार आहे. त्याची माहिती देणाऱ्याला योग्य ते बक्षिस देण्याची तसंच त्याचं नाव गुप्त ठेवण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)