दरवाजे उघडेच ठेवा, सगळे जातील, तुम्ही दोघेच राहाल - मुख्यमंत्री

Published

कुणाला जायचं आहे जाऊ द्या, पक्षाचे दरवाजे उघडेच ठेवले, असं तुम्ही म्हटलं होतं. पक्षाचे दरवाजे उघडेच ठेवा, सगळे जातील, तुम्ही दोघेच मागे राहाल, हम दो, हमारे दो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

आज (रविवार, 19 मार्च) खेडमध्ये आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली.

ते म्हणाले, "ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दूर केलं, त्यांच्याबाबत कोणकोणती वक्तव्ये केली, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा काँग्रेसच्या राहुल गांधी यांना तुम्ही पंतप्रधान बनवायला निघाला आहात."

"जे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेऊ शकत नाही, ते देशाची जबाबदारी कसे घेऊ शकतील. अशा काँग्रेससाठी बाळासाहेबांचा मुलगा-नातू मते मागतात, यापेक्षा दुर्दैव कोणतं", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खेड येथील भाषण तुम्ही या लिंकवर पाहू शकता

370 कलम हटवलं नसतं तर तिरंगा फडकला नसता..

"राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील होता, काश्मीरमध्ये तिरंगा फडकावला म्हणून दिमाखात सांगता, पण 370 कलम मोदींनी हटवलं नसतं, तर तुम्ही तिथे तिरंगा फडकवण्याचं धाडस केलं असतं का?

काँग्रेसने देशाला लुटलं आहे, शिवसेनेची काँग्रेस झाली तर माझं दुकान मी बंद करेन, असं बाळासाहेबांनी म्हटलं आहे.

"आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. तुम्ही संपत्तीचे वारसदार आहात", असं मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेबांची कोणतीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आम्ही शिवसेनेच्या संपत्तीवर कधीच दावा करणार नाही.

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, मला व्हायचं नाही, असं तुम्ही म्हणालात, नंतर म्हणालात, पवार साहेबांनी सांगितलं तुम्हालाच व्हावं लागेल. पण या प्रक्रियेत जे लोक होते, त्यांनी सत्य सांगितलं.

तुम्हाला खुर्चीचा मोह झाला. हिंदुत्वाचे अनेक विषय आले तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प बसू लागला. सोनिया गांधी, शरद पवार यांच्याबाबत तुमचं काय मत होतं, मग 2019 नंतर काय झालं की ते चांगले झाले.

त्यांनी तुमच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदाचा बल्ब पेटवला म्हणून तुमच्यासाठी ते चांगले झाले का?

तुम्ही बाईट देत असताना कोण कुणाला डोळा मारत होतं, हे सगळ्यांनी पाहिलं आहे.

मिंधे गट, गद्दार असं तुम्ही म्हणता. पण एकनाथ शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे. तुम्ही सत्तेसाठी मिंधे झालात, आम्ही कधी होणार नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

'तोच तो थयथयाट, तीच ती आदळआपट'

"गोळीबार मैदानात बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती. गेल्या आठवड्यात याच मैदानावर फुसका बार येऊन गेला. मी काय त्यांना उत्तर द्यायला आलो नाही. उत्तर हे आरोप किंवा टीकेला द्यायचं असतं. पण तोच तो थयथयाट, तीच ती आदळआपट याला काय उत्तर द्यायचं", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेड इथे आयोजित सभेत म्हणाले.

"मुंबईतही गेले सहा महिने असाच खेळ सुरू आहे. त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही.

महाराष्ट्रात येत्या काळात त्यांचे सर्कशीप्रमाणे शो होतील. त्यांच्याकडे दोन-तीनच शब्द आहेत – खोके आणि गद्दार. त्या पलिकडे त्यांच्याकडे तिसरा शब्द नाही", असं ते पुढे म्हणाले.

"आम्ही गर्दीची तुलना करायला आलो नाही. खेडमध्ये जमा झालेला जनसागर पाहून काही लोकांना वाटत असेल या सभेला एवढी गर्दी कशी झाली.

या जनतेने बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. हेच प्रेम जनतेने या सभेत दाखवलं आहे. त्यामुळे आम्हाला उत्तर देण्याची गरज नाही. जनतेनेच तुम्हाला उत्तर दिलं आहे. जनता ही शिवसेनेच्याच पाठिशी उभी आहे.

त्यांच्यासमोर आम्ही जे विचार, जी भूमिका घेऊन गेलो, त्या क्रांतीमध्ये कोकणातील आमदारांनी आमची साथ दिली. ते सगळे या लढ्यातील माझे सोबती होते".

आपण निर्णय घेतला नसता तर आज काय परिस्थिती झाली असती असं मुख्यमंत्री म्हणाले.

ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले त्यांना साथ देणं ही गद्दारी, बेईमानी

"मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाला डाग लावण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. आम्ही तो डाग पुसण्याचं काम केलं आहे.

आपल्यासोबत बाळासाहेबांचा आशीर्वाद, त्यामुळेच निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिलं.

बाळासाहेबांचे विचार आपल्या नेत्यांनी केलं होतं. पण सत्तेसाठी तुम्ही एका मिनिटात भूमिका बदलली. म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.

सत्ता येते, सत्ता जाते, पण नाव गेलं की परत मिळवता येत नाही, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे.

शिवसेनेला डाग लावण्याचा प्रयत्न झाला, तो लागू द्यायचा नाही, अशी काळजी आपल्याला करायची आहे.

गद्दारी आम्ही केली नाही, तर गद्दारी 2019 ला झाली", असं मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "हिंदुत्वाचं राजकारण केलं, ही चूक झाली, असं उद्धव ठाकरेंनी विधानसभेत सांगितलं. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना चुकीचं ठरवलं.

ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले, त्यांना साथ देणारे, त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसू शकता? हीच हिंदुत्वाशी गद्दारी आहे, बेईमानी आहे".

राहुल गांधींवर तुम्ही कधी काही बोलत नाही, हे कसलं हिंदुत्व?

"मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांविरोधात भाष्य केलं, त्याचा बाळासाहेबांनी विरोध केला होता. पण सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींवर तुम्ही कधी काही बोलत नाही, हे कसलं हिंदुत्व"?

"तुम्ही खोके-खोके, गद्दार-गद्दार म्हणून कितीवेळा तुमचं पाप झाकणार, बाळासाहेब तुमचे वडील होते, हे सगळ्या जगाला माहीत आहे. पण वडील वडील करून त्यांना छोटं-संकुचित करू नका".

बाळासाहेबांचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी करू नका, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

"देशावर घराणेशाही लादणाऱ्या लोकांबरोबर आपण आहोत की देशासाठी 24 तास काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींसोबत आपण आहोत, हे विचार करण्याची गरज आहे.

बाळासाहेबांनी ज्यांना नेहमी दूर ठेवलं, त्यांच्या वाऱ्यालाही आपण उभे राहायला नको. अशा लोकांना तुम्ही जवळ करणार"? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)