'गांधी' : महाराष्ट्रातील या व्यक्तीला सुचली होती चित्रपटाची कल्पना, रिचर्ड ॲटनबरो यांनी या चरित्रपटातून नेमकं काय मांडलं?

रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित गांधी चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचं छायाचित्र
फोटो कॅप्शन, रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित गांधी चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचं छायाचित्र
    • Author, प्रकाश मगदूम
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 11 मिनिटे

श्रद्धा, झपाटलेपण आणि जबरदस्त प्रेरणा असलेलीच एखादी व्यक्ती गांधींची असामान्य जीवनकथा पडद्यावर आणू शकतो. मोतीलाल कोठारी हे असेच एक व्यक्तिमत्त्व.

गांधींवरील चित्रणं शोधण्यासाठी जगभर फिरलेल्या आणि नंतर त्यांच्यावरील पहिलावहिला चरित्रपट घडवणाऱ्या ए. के. चेट्टियार यांच्याप्रमाणेच, मोतीलाल कोठारी यांनाही गांधींची जीवनकथा एका भव्य चित्रपटातून जगासमोर मांडण्याच्या स्वप्नानं झपाटलं होतं.

ते चित्रपटसृष्टीतले कुणी दिग्गज नव्हते, ना त्यांच्याकडे अमाप पैसा होता. हा प्रकल्प हाती घेतला तेव्हा त्यांनी आयुष्यात एकदाही चित्रपट-स्टुडिओची पायरीही चढली नव्हती. तरीही त्यांनी हे स्वप्न पाहिलं.

आपलं ध्येय साधण्यासाठी कोठारींनी वर्षानुवर्षे पछाडल्यासारखे आकाशपाताळ एक केले. हे बळ त्यांना केवळ गांधीच देऊ शकत होते, इतकी निष्ठा आणि समर्पण त्यामागे होते.

अन्यथा, तोवर एकही चित्रपट दिग्दर्शित न केलेल्या रिचर्ड ॲटनबरो या अभिनेता-निर्मात्याकडे जाऊन गांधींवर चित्रपट करण्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी ते प्रवृत्त झाले नसते!

कोठारींची कल्पना पुढे ॲटनबरोंचे जीवितकार्य झाली, पण त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात यायला आणि दोघांची ही भव्य दृष्टी जगाला पडद्यावर दिसायला जवळजवळ वीस वर्षे लागली.

तीन भेटी आणि एक अपराधभाव

मुंबई प्रांतातील सातारा जिल्ह्यातील तासगाव इथे जन्मलेले मोतीलाल कोठारी गांधींनी भारावून गेले होते.

विद्यार्थीदशेतच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता आणि गांधींना तीनदा भेटण्याची संधी त्यांना मिळाली होती.

या भेटीबाबत गांधी चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी इन सर्च ऑफ गांधी या चित्रपटात लिहिलंय.

"1925 साली महात्मा गांधी निधी संकलनाच्या दौऱ्यावर सातारा जिल्ह्यातील फलटण इथे आले, तेव्हा त्यांची गांधींशी पहिली भेट झाली. स्थानिक जैन समाजाने गांधींच्या स्वागतासाठी उभारलेल्या दिमाखदार मंडपात हा कार्यक्रम झाला, पण एवढा थाटमाट आणि दिखावा गांधींना अजिबात रुचला नाही."

"गांधीजी म्हणाले तुम्ही ज्याला महात्मा म्हणता तो स्वतः अर्धनग्न राहणं पसंत करतो, त्याचा सन्मान करण्यासाठी तुम्ही एवढं परदेशी कापड का वापरलंत?"

1932 साली सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान गांधी तुरुंगात असताना कोठारी त्यांना पुन्हा भेटले.

"1946 साली मुंबईतील बिर्ला हाऊसला ही तिसरी भेट झाली, तो सोमवार होता, गांधींच्या मौनाचा दिवस, तरीही त्यांनी लेखी चिठ्ठ्यांमधून अर्ध्या तासाहून अधिक वेळ संवाद साधला. वीस वर्षांत झालेल्या या तीन भेटींनी मोतीलाल कोठारींवर खोलवर प्रभाव पाडला."

रिचर्ड ॲटनबरो गांधी चित्रपटाच्या पोस्टरसह
फोटो कॅप्शन, रिचर्ड ॲटनबरो गांधी चित्रपटाच्या पोस्टरसह
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गांधींच्या हत्येनंतर कोठारी लंडनला गेले आणि त्यांनी भारतीय उच्चायुक्तालयात नोकरी स्वीकारली. पण हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता.

आपण पळ काढतो आहोत, असंच त्यांना वाटत राहिलं. याबाबत 5 मार्च 1965 च्या फिल्मफेअर मॅगझीनमध्ये एक नोंद आहे.

"भारत सोडताना विमानतळावर माझ्या अंतरात्म्यानं विचारलं, तू पळून तर जात नाहीस ना? आणि का?" काही वर्षांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा तोच आवाज पुन्हा त्यांच्यासमोर उभा राहिला, "आणि आता तू कुठे पळून जाणार?"

त्याच क्षणी कोठारींनी ठरवलं की गांधींची जीवनकथा एका शक्तिशाली माध्यमातून जगासमोर यायला हवी. सिनेमाहून चांगलं माध्यम दुसरं कोणतं असणार?

"मी ठरवलं की काहीतरी करून पाहायचं, कितीही लहान असो; मानवतेसाठी टाकलेलं ते एक सकारात्मक पाऊल असेल, असा मला विश्वास होता," असं कोठारी म्हणतात. या प्रकल्पासाठी सुरुवातीलाच एक शुभ संकेत मिळाला, अशी नोंद फिल्मफेअर मध्ये आहे.

अमेरिकन लेखक लुई फिशर यांचं, गांधींवरच्या सर्वोत्तम चरित्रांपैकी एक मानलं जाणारं चरित्र, त्याचे चित्रपट व दूरदर्शन हक्क मिळणं हे एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नव्हतं. फिशर यांनी एक पैसाही न घेता हे हक्क कोठारींना देऊन टाकले.

ॲटनबरो नावाचा जुगार

जुलै 1962 मध्ये कोठारी रिचर्ड ॲटनबरो यांना भेटले. ॲटनबरो त्यावेळी एकोणतीस वर्षांचे होते, दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअर फोर्समध्ये सेवा केल्यानंतर ते एक बऱ्यापैकी यशस्वी अभिनेता आणि निर्माता बनले होते.

कोठारींनी गांधींवर चित्रपट काढण्याची कल्पना मांडली, तेव्हा ॲटनबरो चांगलेच चकित झाले. "महात्मा गांधींवरचा चित्रपट अंगावर घ्यावा की नाही, याबाबत मी खूपच साशंक होतो, पण त्या विषयानं माझ्या मनात आधीच एक जबरदस्त ओढ निर्माण केली होती," असं ॲटनबरोंनी आपल्या पुस्तकात म्हटलंय.

हा चित्रपट दिग्दर्शित करण्याची आपली योग्यता नाही, असं सुरुवातीला ॲटनबरो यांना वाटलं. पण सुट्टीवर असताना फिशरकृत गांधीचरित्र वाचल्यावर मात्र ते पूर्णपणे मोहित झाले. त्यांचे जवळचे सहकारी या प्रकल्पाबद्दल साशंक असले तरी त्यांच्या पत्नी, अभिनेत्री शीला या प्रकल्पासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या.

गांधी चित्रपटातील एक दृष्य
फोटो कॅप्शन, गांधी चित्रपटातील एक दृष्य

गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्यावरच्या चित्रपटासाठी भारत सरकारची संमती आवश्यक होती आणि यासाठी ॲटनबरो यांची लुई माउंटबॅटन यांच्याशी असलेली मैत्री उपयोगी पडली. मे 1963 मध्ये ॲटनबरो यांनी दिल्लीत नेहरू, माहिती व प्रसारण मंत्री बी. गोपाल रेड्डी आणि इंदिरा गांधी यांची भेट घेतली.

अकादमी पुरस्कार विजेते अभिनेते ॲलेक गिनीज यांनी गांधींची भूमिका साकारावी, अशी नेहरूंची इच्छा होती, पण आपल्यासारख्या परदेशी व्यक्तीने नव्हे, एखाद्या भारतीय अभिनेत्यानेच ही भूमिका करावी, यावर गिनीज ठाम होते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहरूंनी ॲटनबरो यांना बजावलं, "तुम्ही काहीही करा, पण त्यांना देवत्व बहाल करू नका. आम्ही भारतात तेच केलं आहे. ते इतके महान माणूस होते की त्यांना देवत्व देण्याची गरजच नव्हती."

ॲटनबरो यांना भेटण्याआधीच रॉबर्ट बोल्ट यांनी हा चित्रपट लिहावा, अशी कोठारींची इच्छा होती. ऑक्टोबर 1961 मध्ये कोठारींनी आपले वकील लॉरेन्स हार्बॉटल यांच्यामार्फत बोल्ट यांना पत्र लिहून ही इच्छा कळवली. बोल्ट त्यावेळी 'लॉरेन्स ऑफ अरेबिया'ची पटकथा लिहीत होते आणि सुरुवातीला त्यांनी नकार कळवला.

कोठारींनी नकार मान्य केला नाही. त्यांनी आणखी एक पत्र लिहिलं आणि टपालखात्याकडून होणारा विलंब टाळण्यासाठी यावेळी ते स्वतःच्या हातांनी पोचवलं. त्यात त्यांनी लिहिलं, "हा चित्रपट घडवण्यातला माझा स्वतःचा भक्तीभाव आणि बोल्ट यांनीच पटकथा लिहावी ही माझी खात्री, या दोन्ही बाबतीत मी ठाम आहे," असं कोठारी यांनी मार्गारेट रॅमसेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

गांधी चित्रपटातील एक दृश्य
फोटो कॅप्शन, गांधी चित्रपटातील एक दृश्य

दरम्यान, चित्रपटाच्या मूलभूत रूपरेषेबद्दल कोठारी आणि ॲटनबरो यांच्या मनात स्पष्टता होती. तीन तासांच्या चित्रपटात गांधींचं संपूर्ण जीवन उभं करणं अशक्य आहे, हे त्यांना ठाऊक होतं. हा चित्रपट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल असणार नव्हता, स्वातंत्र्यलढ्याबद्दलही नव्हता.

पटकथालेखकासाठी लिहिलेल्या एका चिठ्ठीत कोठारींनी गांधींच्या कार्याचे तीन पैलू अधोरेखित केले होते: "गरिबांविषयीची त्यांची आपुलकी, अन्यायाविरुद्धचा त्यांचा संघर्ष आणि इतरांना सांगण्याआधी सर्व काही स्वतः आधी आचरणात आणण्याचा त्यांचा दृढनिश्चय."

अखेर चित्रपटासाठी हॅरल्ड हॅन्ली यांनी तयार केलेला पहिला खर्डा पाच तासांहून जास्त कालावधीचा निघाला. गांधींसारख्या असामान्य व्यक्तीचं आयुष्य संक्षिप्त करून मांडणं हे नेहमीच मोठं आव्हान राहिलं आहे.

चित्रपटाच्या निर्मितीसाठी कोठारी आणि ॲटनबरो यांनी स्वतः संचालक असलेली 'इंडो-ब्रिटिश फिल्म्स' नावाची एक खास निर्मिती संस्था उभारली. पण लवकरच या प्रकल्पाचे सर्वात मोठे पाठीराखे नेहरू 1964 मध्ये निवर्तले. त्यापाठोपाठ आर्थिक अडचणीही उभ्या राहिल्या.

सुरुवातीचे वित्तपुरवठादार असलेल्या बडोद्याच्या महाराजांशी वाटाघाटी करणे फार जिकिरीचं जाऊ लागलं आणि ब्रिटिश वित्तपुरवठादार संस्था 'रँक ऑर्गनायझेशन'ने प्रकल्पातून अंग काढून घेतलं. मग अगदी अनपेक्षितपणे जोसेफ लेव्हिन यांची 'एम्बसी पिक्चर्स' ही प्रमुख चित्रपट संस्था 'पॅरामाउंट' या मोठ्या हॉलिवूड स्टुडिओसह पाठबळ द्यायला पुढे आली.

सगळं सुरळीत होऊन 15 डिसेंबर 1964 रोजी लंडनमधील हॉटेल सॅव्हॉय इथल्या एका भव्य समारंभात पाच दशलक्ष डॉलरच्या अंदाजपत्रकाच्या या चित्रपटाची घोषणा झाली. या कार्यक्रमात कोठारी म्हणाले, "[गांधी हे] आपल्या शतकातले असे एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी स्वतःच्या आचरणातून आजच्या जागतिक समस्यांवर तोडगा निघू शकतो अशी आशा देणारी जीवनशैली दाखवून दिली."

गांधी चित्रपटातील शूटींगदरम्यानचं छायाचित्र
फोटो कॅप्शन, गांधी चित्रपटातील शूटींगदरम्यानचं छायाचित्र

एवढ्या मोठ्या अंदाजपत्रकाच्या या चित्रपटाची उत्सुकता चहूकडे असली, तरी गांधींच्या मुख्य भूमिकेसह इतर कोणत्याही कलाकाराची निवड अजून झाली नव्हती.

गांधींची भूमिका अभारतीय अभिनेत्याने करावी असं ॲटनबरो यांना अजिबात वाटत नव्हतं, तरीही त्यांनी डर्क बोगार्ड, पीटर फिंच, अल्बर्ट फिनी आणि टॉम कोर्टनी यांसारख्या नावाजलेल्या ब्रिटिश कलाकारांना गाठण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही.

कलाकारांमध्ये एकही प्रसिद्ध चेहरा नव्हता आणि पटकथेचा खर्डाही अगदीच विस्कळीत होता, त्यामुळे चित्रपट अडचणीत सापडला आणि गांधींच्या भूमिकेसाठी नामांकित अभिनेता मिळवण्यात अपयश आल्याचं पाहून 'एम्बसी पिक्चर्स'नेही चित्रपटाच्या निर्मितीतून अंग काढून घेतलं.

..तर व्ही शांतारामांनी केले असते दिग्दर्शन

रोचक गोष्ट म्हणजे रिचर्ड ॲटनबरो यांच्याकडे गांधी चित्रपटाची कल्पना घेऊन जाण्याआधीच कोठारींनी या प्रतिष्ठित प्रकल्पाची धुरा सांभाळण्यासाठी एका भारतीय चित्रपटकर्त्याचा विचार केला होता. ते होते प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम. 1961 मध्ये कोठारी त्यांना भेटले आणि गांधी चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा प्रस्ताव मांडला. शांताराम त्यावेळी 'स्त्री' या चित्रपटाचं चित्रीकरण करत होते, त्याच सेटवर ही भेट झाली.

मधुरा पंडित जसराज यांच्या द मॅन हू चेंज्ड इंडियन सिनेमात याचा संदर्भ आहे.

कोठारींनी आपली कल्पना मांडली, तेव्हा शांताराम भलतेच उत्साहित झाले. 'प्रभात फिल्म स्टुडिओ'च्या काळापासूनच शांतारामांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचं नेहमी समर्थन केलं होतं आणि आपल्या चित्रपटांतून राष्ट्रवादी भावना चित्रित करण्याचा प्रयत्न केला होता.

गांधी चित्रपटातील एक दृष्य
फोटो कॅप्शन, गांधी चित्रपटातील एक दृष्य

चित्रपट दिग्दर्शित करण्याचं मान्य करताना त्यांनी सांगितलं की गांधी प्रकल्प एका राष्ट्रीय उपक्रमासारखा मांडायला हवा आणि हा चित्रपट सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा. यासाठी आपण एक पैसाही घेणार नाही, असंही शांताराम म्हणाले.

चित्रपटाला भारत सरकारचं पाठबळ मिळवणं इष्ट ठरेल, असं शांतारामांचं मत होतं. कोठारींनी सहमती दर्शवली आणि पंतप्रधान नेहरूंशी बोलण्याचं आश्वासन दिलं. पण तीन महिने उलटूनही काहीच हालचाल झाली नाही, तेव्हा अखेर शांतारामांनी स्वतःच नेहरूंना पत्र लिहून प्रकल्पावर चर्चेसाठी भेटीची वेळ मागितली, पण त्यातूनही काही निष्पन्न झालं नाही.

कोठारी किंवा नेहरू, दोघांकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने शांताराम निराश झाले. गांधींच्या व्यक्तिरेखेचा आत्मा आपण पडद्यावर यशस्वीपणे उतरवू शकू, असा त्यांचा ठाम विश्वास होता. पुढे अनेक वर्षांनी ॲटनबरो यांचा 'गांधी' प्रदर्शित झाला, तेव्हा गांधींचं एकांगी चित्रण आणि त्यातला प्रभावी पाश्चात्य दृष्टिकोन यासाठी शांतारामांनी या चित्रपटावर कडाडून टीका केली.

झिनेमन प्रकरण

जानेवारी 1966 मध्ये नेहरूंचे उत्तराधिकारी लाल बहादूर शास्त्रीही निवर्तले, तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. पटकथा, कलाकारांची निवड आणि वित्त अशा अनेक आघाड्यांवर प्रगती खुंटली. या टप्प्यावर कोठारींना ॲटनबरो यांच्याकडून पूर्ण वचनबद्धता हवी होती, ते शक्य झालं नाही. तेव्हा दोघांनी स्वतंत्रपणे काम करत राहायचं आणि शक्य झाल्यास करार करण्यासाठी पुन्हा एकत्र यायचं, असं ठरलं.

कोठारींनी रॉबर्ट बोल्ट यांच्याशी पुन्हा वाटाघाटी केल्या आणि त्यातून सुप्रसिद्ध दिग्दर्शक फ्रेड झिनेमन या प्रकल्पात सामील झाले. बोल्ट आणि झिनेमन यांनी 'अ मॅन फॉर ऑल सीझन्स'मध्ये (1966) आधीच यशस्वी जोडी जमवली होती, त्या चित्रपटासाठी झिनेमन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अकादमी पुरस्कारही मिळाला होता.

या घडामोडीनंतर ॲटनबरो यांनी चित्रपट सोडला याबाबत त्यांनी आपल्या इन सर्च ऑफ गांधी पुस्तकात म्हटलंय, "झिनेमन खरोखरच एक महान दिग्दर्शक आहेत, किंबहुना जगातल्या सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. माझं स्वप्न सोडून द्यावं लागत असेल, तर ते पुढे नेण्यासाठी त्यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती मला सुचूच शकत नाही."

पण झिनेमन यांना कोठारींचं श्रेय आणि अधिकार मान्य नव्हते. त्यांना हा चित्रपट स्वतःच्या 'हायलँड फिल्म्स'च्या बॅनरखाली तयार करायचा होता आणि कोठारींनी स्वतःच्या आवडीचं कोणतंही पद घ्यावं, पण त्यापुढे 'निर्माता' आणि 'दिग्दर्शक' हे शब्द नसावेत, असं त्यांनी एजंट क्रिस्टोफर मान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

पण या विशाल प्रकल्पात कोठारींचं महत्त्व काय आहे, हे रॉबर्ट बोल्ट यांना पुरेपूर ठाऊक होतं. त्यांनी झिनेमन यांना पत्रात लिहिलं होतं, "भारत सरकारला काही प्रमाणात सन्माननीय पातळीवरचा भारतीय सहभाग हवा आहे. देशातल्या चित्रपटकर्त्यांवर त्यांचा विश्वास नाही; पण मोती कोठारींवर मात्र त्यांचा विश्वास आहे. कोठारींवर भारत सरकारचा विश्वास आहे, कारण ते गांधींचे एक ज्ञात अनुयायी आहेत आणि नेहरूंशी त्यांचा वैयक्तिक परिचय होता."

गांधी चित्रपट शूटींदरम्यानचे क्षण
फोटो कॅप्शन, गांधी चित्रपट शूटींदरम्यानचे क्षण

पण लीन आणि बोल्ट 'रायन्स डॉटर' या चित्रपटाच्या निर्मितीत गुंतले आणि त्याला तीन वर्षं लागली, त्यामुळे आणखी विलंब झाला. या सगळ्या अडथळ्यांदरम्यान बोल्ट मात्र कोठारींच्या क्षमतेवर आणि दृढनिश्चयावर ठाम विश्वास ठेवून राहिले.

मार्च 1968 मध्ये बोल्ट यांच्या एजंट मार्गारेट रॅमसे यांनी डेव्हिड लीन यांचे एजंट ली स्टाइनर यांना लिहिलं, "गांधींच्या कथेत असं काहीतरी आहे जे लोकांना गांधींच्या पावित्र्याचा एखादा कणतरी का होईना अंगी बाणवायला भाग पाडतं. बॉबने कोठारींना दिलेला पाठिंबा पाहता, या सगळ्या उठाठेवीच्या जनकाबद्दल त्याच्यात किती प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव आहे, हेच दिसून येतं."

धीरगंभीर स्वभावाच्या कोठारींनी वाट पाहण्याचा निर्णय घेतला, पण ते स्वस्थ बसले नव्हते. बोल्ट आणि लीन यांच्यातला पेचप्रसंग सुरू असताना आणि प्रकल्प अनिश्चित अवस्थेत असतानाच सप्टेंबर 1969 मध्ये कोठारींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर 15 जानेवारी 1970 रोजी त्यांचं निधन झालं.

चित्रपटासाठीच्या एका बैठकीत कोठारींनी पुण्यातील ज्येष्ठ मराठी चित्रपटकर्ते राम गबाले यांच्याकडे आपल्या मनातले विचार व्यक्त केले होते, "हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट घेत आहोत, पण का कुणास ठाऊक, मला नेहमी असं वाटतं की पूर्ण झालेला चित्रपट पाहण्यासाठी मी जिवंत नसेन." असा उल्लेख राम गबाले यांच्या आत्मचरित्रात आहे.

'गांधी'सारखा चित्रपट घडवण्याच्या या अतुलनीय प्रयत्नामागची खरी प्रेरणा कोणाची, हे ॲटनबरो यांनी मनमोकळेपणाने कबूल केलं आहे. ते लिहितात, "1963 साली मोती आणि मी एकत्रितपणे हा चित्रपट काढण्याचा निर्धार केला होता. ही प्रेरणा मोतीकडूनच मिळाली होती."

अखेर 1982 साली 'गांधी' प्रदर्शित झाला, तेव्हा निर्मात्यांनी हा चित्रपट मोतीलाल कोठारी, तसंच पंडित नेहरू आणि लुई माउंटबॅटन यांना अर्पण केला. 'गांधी'ला मिळालेला अकादमी पुरस्कारही ॲटनबरो यांनी मोतीलाल कोठारींना अर्पण केला.

'गांधी' अखेर पडद्यावर आला

अधूनमधून झळकणारे 'फिल्म्स डिव्हिजन'चे तुरळक माहितीपट सोडले, तर 1980 च्या दशकात गांधींवर फारसे दृश्यचित्र उपलब्धच नव्हते. भारतात दूरदर्शन आल्यानंतर 'गांधी' हा चित्रपट पाहणं अनेकांसाठी एक वार्षिक परंपराच बनली. दर 2 ऑक्टोबर रोजी, गांधींच्या वाढदिवशी, दूरदर्शन हा चित्रपट दाखवत असे आणि लोक तो पुनःपुन्हा पाहत राहत.

गांधींची भूमिका साकारण्यासाठी बेन किंग्सले यांची निवड ॲटनबरो यांच्यासाठी निर्णायक ठरली. कृष्ण पंडित भानजी म्हणून जन्मलेले किंग्सले भारतीय वंशाचे होते, पण या भूमिकेआधी त्यांनी भारतात पाऊलही ठेवलं नव्हतं. डोके भादरून घेणं आणि योगाभ्यास शिकण्यासोबतच त्यांनी शाकाहाराचा स्वीकार करत जवळपास दहा किलो वजनही घटवलं. या असामान्य अभिनयासाठी त्यांना 1983 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार मिळाला.

गांधी चित्रपटात अभिनेत्री  रोहिणी हट्टंगडी यांनी कस्तूरबा गांधींची भूमिका साकारली होती
फोटो कॅप्शन, गांधी चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी कस्तूरबा गांधींची भूमिका साकारली होती

भारतातले एक सर्वोत्तम अभिनेते मानले जाणारे नसीरुद्दीन शाह या प्रतिष्ठित भूमिकेसाठी प्रबळ दावेदार होते. नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या अँड देन वन डे या पुस्तकात म्हटलंय, "भारतीय अभिनेताच घ्यायचा असेल, तर तो मीच असायला हवा," असं त्यांना वाटायचं.

नाकारलं गेल्यावर ते खचले नाहीत, पण चित्रपट पाहिल्यावर त्यांनी मनमोकळेपणाने मान्य केलं, "बेन खरोखर अप्रतिम होते. गांधीजींचं स्मितहास्य वगळता त्यांनी बाकी सगळं जमवलं."

तरीही आपलं परखड मत नोंदवताना शाह म्हणाले, "मला वाटतं की ते अनेक गोष्टींत कमी पडले, एक म्हणजे हास्य, दुसरं म्हणजे आवाज... पण त्यांना पात्राचं सार गवसलं, हे मात्र मला मान्य करावंच लागेल."

काही वर्षांनंतर 1998 साली फिरोज अब्बास खान दिग्दर्शित 'महात्मा विरुद्ध गांधी' या अजित दळवी लिखित नाटकात शाह यांना गांधींची भूमिका साकारायला मिळाली.

गांधी चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबरो (डावीकडे), कस्तूरबा गांधींची भूमिका साकारणाऱ्या रोहिणी हट्टंगडी आणि महात्मा गांधींची भूमिका साकारणारे अभिनेते बेन किंग्सले (उजवीकडे)
फोटो कॅप्शन, गांधी चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबरो (डावीकडे), कस्तूरबा गांधींची भूमिका साकारणाऱ्या रोहिणी हट्टंगडी आणि महात्मा गांधींची भूमिका साकारणारे अभिनेते बेन किंग्सले (उजवीकडे)

कस्तुरबांच्या भूमिकेतल्या रोहिणी हट्टंगडीही तितक्याच ताकदीच्या होत्या. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'च्या या विद्यार्थिनीने अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी कस्तुरबांची भूमिका साकारली आणि नामांकित अभिनेत्री स्मिता पाटील आणि भक्ती बर्वे यांना मागे टाकून या भूमिकेसाठी निवड झाली. या संस्मरणीय अभिनयामुळे हट्टंगडींना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार मिळाला, हा सन्मान मिळवणाऱ्या त्या एकमेव आशियाई अभिनेत्री ठरल्या.

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांनी चित्रपटाची भरभरून प्रशंसा करताना लिहिलं, "हा एक दुर्मिळ महाकाव्यात्म चित्रपट आहे, अनेक दशकांचा पट यात दिसतो... आणि तरीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक मानवी धागा हाती धरून तो पुढे जातो."

चित्रपटाची पहिली चाळीस मिनिटं दक्षिण आफ्रिकेतल्या अहिंसा व सत्याग्रहातल्या यशस्वी प्रयोगांचं चित्रण करण्यासाठी वापरली आहेत.

दांडी यात्रेचं नाट्यमय मूल्य टिपणारा चार मिनिटांचा प्रसंग, पंडित रविशंकर यांचं सुरेल पार्श्वसंगीत आणि भारताचं वैविध्यपूर्ण सामाजिक व भौगोलिक रूप, हे सगळं चित्रपटाची ताकद ठरतं.

गांधी

पण अ‍ॅटनबरोंनी चित्रिकरण सुरू होण्याआधी नेहरूंनी दिलेल्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्षच केलं, असं म्हणता येतं.

"पाहा, त्यांच्यातही अनेक कमतरता होत्या, अनेक उणिवा होत्या. त्या आम्हाला दाखवा... तुम्ही काहीही करा, पण त्यांना देवत्व देऊ नका," असं नेहरूंनी सांगितलं होतं. दिग्दर्शकाने मात्र गांधींच्या कृतींचं विश्लेषण न करता सोप्या पद्धतीने कथा सांगण्याचा मार्ग निवडला.

चित्रपट इतिहासकार आशिष राजाध्यक्ष यांनी एका लेखात म्हटलंय, "हा चित्रपट त्या व्यक्तीमध्ये, किंबहुना त्या व्यक्तिमत्त्वात, रस निर्माण करतो आणि त्यातील घटना या केवळ त्या व्यक्तीचे मोठेपण उठून दिसावे यासाठी वापरलेली नाट्यमय साधने असतात."

चरित्रपट या विधेचं स्वरूपच असं असतं की चित्रपटकर्त्याला सखोल विश्लेषण टाळण्यास भाग पाडतं आणि अ‍ॅटनबरोंचा 'गांधी' त्याला अपवाद ठरत नाही. शांतारामांचा पाश्चात्य दृष्टिकोनाचा आक्षेपही याच मर्यादेकडे बोट दाखवतो.

टीकात्मक विश्लेषण बाजूला ठेवलं, तरी रिचर्ड ॲटनबरो यांचा 'गांधी' हा राष्ट्रपित्यावरचा पहिला दीर्घ चरित्रपट ठरला. एका गुंतागुंतीच्या माणसाची एक साधी कहाणी त्याने सांगितली आणि त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता यांसह तब्बल नऊ अकादमी पुरस्कार मिळाले.

अ‍ॅटनबरोंच्या 'गांधी'ने भारतीय दिग्दर्शकांनाही गांधींच्या आयुष्यातले बारकावे धीटपणे मांडण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर गांधी केंद्रस्थानी नव्हे, तर त्यांचे जवळचे सहकारी असलेल्या इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या आयुष्यावरही चरित्रपट येत राहिले, पण मोतीलाल कोठारींचं नाव मात्र या इतिहासात एका तळटीपेपुरतंच उरलं.

( हा लेख 'द महात्मा ऑन सेल्युलॉइड' या आगामी भाषांतरित पुस्तकातील आशयावर बेतलेला आहे. सदर पुस्तक 'पपायरस प्रकाशना'कडून प्रकाशित होणार आहे. मूळ लेखक: प्रकाशक मगदूम, भाषांतर: अक्षय शेलार)

संदर्भसूची

1. ॲटनबरो, रिचर्ड. (1982). इन सर्च ऑफ गांधी; लंडन: बोडली हेड लिमिटेड.

2. फिल्मफेअर. (1965, मार्च 5), पृ. 19.

3. मार्गारेट रॅमसे व मोतीलाल कोठारी यांच्यातील पत्रव्यवहार, 1961-62; हिंदुस्तान टाइम्सवरील लेख.

4. फ्रेड झिनेमन, रॉबर्ट बोल्ट व क्रिस्टोफर मान यांच्यातील पत्रव्यवहार, ऑक्टोबर 1966.

5. मार्गारेट रॅमसे यांचं ली स्टायनर यांना पत्र, 25 मार्च 1968.

6. जसराज, मधुरा पंडित. (2015). द मॅन हू चेंज्ड इंडियन सिनेमा; नवी दिल्ली: हॅ हाऊस इंडिया.

7. गबाले, राम. (2006). आत्मचरित्र; पुणे: पद्मगंधा प्रकाशन, पृ. 180.

8. शाह, नसीरुद्दीन. (2014). अँड देन वन डे;. नवी दिल्ली: हॅमिश हॅमिल्टन; आणि लेखकाने घेतलेली मुलाखत, 31 ऑगस्ट 2020.

9. एबर्ट, रॉजर. (1982). गांधी (परीक्षण). rogerebert.com.

10. राजाध्यक्ष, आशिष. (1983). गांधीअन अँड गांधीऑलॉजी; फ्रेमवर्क, खंड 22/23.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.