बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख

Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. मणिपूर हिंसाचार : जाणून घ्या 7 प्रश्न 7 उत्तरं

काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी मणिपूरमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार पेटलेला असून येथील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 29 आणि 30 जून असे 2 दिवस मणिपूर येथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

यादरम्यान राहुल गांधी येथील बचाव शिबीरांचा दौरा करतील आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतील.

आपल्या दौऱ्यात राहुल दगांधी तुईबोंग ग्रीनवुड अकादमी ाणि चुराचांदपूरच्या सरकारी महाविद्यालयानां भेट देणार आहेत.

2. छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

1857च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर भारताच्या पश्चिमेस आणि दक्षिणेकडील प्रांतांमध्ये सामाजिक बदलांचे वारे सुरू झाले. नवे शिक्षण, नवे विचार यामुळे पश्चिम भारतामध्ये विशेषतः तेव्हाच्या मुंबई प्रांतातील लोकांनी इतर भारतापेक्षा विविध क्षेत्रांत आघाडी घेतली.

यात इंग्रजी शिक्षण, मुलींचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, विधवांचे शिक्षण अशा वेगवेगळ्या दिशांनी या भागाची पावलं पडत गेली.

लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या अनेक सामाजिक-राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या नेत्यांमुळे या प्रांताने ही प्रगती केली होती.

3. नकार, अपयशाला सामोरं कसं जायचं? तुमच्या मुलांना कसं समजवाल?

आपल्यापेक्षा दुसऱ्याला चांगली संधी मिळाली, आपल्यापेक्षा दुसऱ्याला चांगले मार्कस मिळाले, प्रेमात नकार मिळाला, तर काय करायला हवं? तो विषय तिथेच सोडून आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवं की टोकाला जाऊन दुसऱ्याला शिक्षा करायला हवी?

अशी एखादीच घटना घडते, पण ती विचार करायला भाग पाडते. समाज माध्यमांवर मतांचं पेव फुटतं. घटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर टीका केली की आपलं काम झालं... अशा घटनांना त्यांचे पालकच जबाबदार आहेत, असं म्हटलं की झालं!

वास्तविक कोणतेही पालक आपल्या मुलांना वाईट गोष्टी शिकवत नाहीत. विशेषत: मुलं मोठी झाली की तर तेच आपला मार्ग निवडतात.

4. ‘या’ देशाने कायदा आणून सर्व नागरिकांना केलं एका वर्षाने तरुण

आपण कायम चिरतरुण राहावं, आपलं वय वाढूच नये, असं कुणाला नाही वाटत? पण तसं नैसर्गिकरीत्या तरी शक्य नाही, असंच तूर्तास दिसतंय. पण दक्षिण कोरियात असा एक बदल घडलाय, ज्यामुळे तिथल्या लोकांचं वय चक्क कमी झालं आहे. सगळ्यांचं वय.

हो दक्षिण कोरियात एक कायदा संमत करण्यात आला आहे, ज्यानुसार तिथल्या लोकांचं वय एक-दोन वर्षांनी अधिकृतरीत्या कमी झालं आहे. पण कसं?

तर दक्षिण कोरियात वय मोजण्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार कुठलंही बाळ जन्मताच एक वर्षाचं असायचं, कारण त्याला गर्भातला काळही त्यात मोजला जायचा. या पद्धतीनुसार प्रत्येकाचं वय त्या-त्या व्यक्तीच्या वाढदिवसाला नव्हे तर एक जानेवारीलाच बदलायचं.

5. परदेशी शिक्षणाच्या नावाखाली एज्युकेशन कन्सल्टन्सीकडून विद्यार्थ्यांची फसवणूक होतेय का?

एमबीबीएससाठी स्पेनला जायचं स्वप्न उराशी बाळगणारी तेलुगू कुटुंबातील स्वाती बंगळुरू मध्ये राहते. प्रवेश मिळवण्यासाठी तिने दिल्लीतील अॅक्सिस कन्सल्टन्सीशी संपर्क साधला होता.

तब्बल सहा महिन्यांनंतर तिला स्पेनच्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपत्र मिळालं. स्वातीच्या वडिलांनी प्रवेश पत्राबाबत विद्यापीठाला मेल केला.

पण या प्रवेशपत्राचा आमच्या विद्यापीठाशी काहीच संबंध नसल्याचं उत्तर विद्यापीठाने पाठवलं. शिवाय त्यावर असलेली प्राचार्यांची स्वाक्षरीही खोटी असल्याचं विद्यापीठाने सांगितलं. ते प्रवेशपत्र जेव्हा निरखून पाहिलं तेव्हा समजलं की ते फोटोशॉपमध्ये तयार केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)