परभणी : मोकाट डुकरं पकडायला गेले, गावकऱ्यांनी चोर समजून मारलं, एका अल्पवयीनचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
परभणीत चोर समजून तीन जणांना गावकऱ्यांनी मारहाण केली. यात एका अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यातील उखळद इथं ही घटना घडली.
अरुणसिंग टाक, किरपालसिंग भोंड आणि गोरासिंग दुधानी या तिघा जणांना परभणीच्या उखळद गावानजिक जमावानं मारहाण केली.
या घटनेत मारहाण झालेल्या इतर दोघा जणांवर परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किरपालसिंग भोंड असं मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून, तो बलसा खुर्द येथील रहिवाशी होता.
जखमीनं पोलीस तक्रारीत काय सांगितलं?
यातील गोरासिंग दुधानी यानं पोलिसांना हकीकत सांगून तक्रार नोंदवली.
गोरासिंग दुधानी यानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अरुणसिंग, किरपालसिंग आणि स्वत: गोरासिंग हे तिघेही दुचाकीवरून पिंपरी देशमुख गावात मोकाट सोडलेली डुकरं पकडण्यासाठी गेले होते.
डुकरं न सापडल्यानं हे तिघेही उखळद गावातील रस्त्यानं परभणीच्या दिशेने निघाले होते. 27 मे रोजीची पहाटेची 3 वाजण्याची वेळ होती.
हे तिघेही दुचाकीवरून उखळद गावाच्या वळणावरील ईदगाहजवळ पोहोचले असता, समोरून पाच अनोळखी लोक आले आणि त्यांनी त्यांची दुचाकी रोखली.
अरुणसिंग टाक ही दुचाकी चालवत होता. गोरासिंग दुचाकीवर मधे, तर किरपालसिंग मागे बसला होता.
अनोळखी लोकांनी या तिघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.
गोरासिंग सांगतो की, “त्यांनी आम्हाला ‘चोर चोर’ म्हणत लोखंडी रॉडनं हात, पाय, पाठ, डोक्यावर मारण्यास सुरुवात केली. आमच्या डोळ्यात चटणीही टाकली.”
किरपालसिंगच्या डोक्यात रॉडनं मार लागल्यानं तो बेशुद्ध पडला.
त्यानंतर अरुणसिंग आणि गोरासिंग यांना आरडाओरड केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले.
त्यांनी पोलिसांना फोन करून बोलावलं. त्यानंतर तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं किरपालसिंगला मृत घोषित करण्यात आलं.
एफआयर दाखल

दरम्यान, ताडकलास पोलिसांनी फिर्यादी गोरासिंगच्या तक्रारीवरून सेक्शन 154 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, 341, 143, 148, 149 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरासिंग यानं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अक्रम पटेल असं आरोपीचं नाव सांगितलं असून, आणखी पाच जणांनी मारहाण केल्याचं म्हटलंय. मात्र, या इतर पाच जणांची नावं माहिती नसल्याचं सांगितलंय.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंध कमिटीनं केला निषेध
दरम्यान, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (SGPC) या घटनेचा निषेध केला असून, आरोपींना अटक करून कठोर शिक्षेची मागणी केलीय.
SGPC चे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी म्हटलं की, “हा गुन्हा मानवतेला लागलेला कलंक आहे. दोषी कठोर शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी सर्व दोषींना अटक केली पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे.”
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परभणीच्या पोलीस अधीक्षक आर. रागसुधा म्हणाल्या, “ या प्रकरणात एकूण नऊ आरोपी आहेत. काही विशिष्ट समाजाच्या लोकांनाच अटक केली आहे या अफवेवर विश्वास ठेवू नका असंही त्या पुढे म्हणाल्या. गाववाल्यांनी संशयित चोर म्हणून पीडितांना मारहाण केली."
पोलिसांनी काय म्हटलं?
हे प्रकरण समोर आल्यानंतर परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.
घटनेबाबत रागसुधा यांनी सांगितलं, “पहाटे 2.59 वाजता उखळद गावात तीन बकरी चोरांना पकडून ठेवलं आहे, या आशयाचा कॉल 112 क्रमांकावर आला. पोलिसांचं पथक घटनास्थळी तत्काळ 03.04 वाजता पोहोचलं. यादरम्यान जखमीं झालेल्या तिन्ही व्यक्तींना सिव्हील रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच दिवशी त्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं.”
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ जखमींच्या फिर्यादीवरून कलम 302, 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
“फिर्यादीनुसार, 5 जणांनी मारहाण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण पोलीस तपासात 9 जणांची नावे समोर आली. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.”
“पोलीस तपासादरम्यान या प्रकरणात कोणत्याही विशिष्ट समाजाचे लोक सहभागी नसून संपूर्ण गावातील विविध समाजगटातील व्यक्ती सहभागी असल्याचं दिसून आलं,” असं रागसुधा आर. यांनी सांगितलं.
“काही राष्ट्रीय माध्यमांमध्ये या प्रकरणावरून चुकीच्या बातम्या दाखवण्यात येत आहेत. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये,” असं आवाहन रागसुधा आर. यांनी केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























